माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

23

✒️सोलापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सोलापूर(दि.31जुलै):- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (94) यांची शुक्रवारी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासुन सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता, काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. अकरा वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे.

गणपतराव देशमुख (आबा) हे बहुतांशी काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले, तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा ते मंत्रिमंडळात मंत्री होते.
अकरा वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार व मंत्री राहून सुद्धा त्यांचे वर्तनात कुठल्याही प्रकारचा बदल होऊ दिला नाही, कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर आपले राजकारण असल्याची जाणीव ठेवून कार्यकर्ता कसा मोठा होईल, याबाबत ते काळजी घेत असत.

चांगल्या अधिकारी वर्गाची ते आस्थेने विचारपूस करीत असल्याने त्यांचे भागात अनेक विकासाची कामे झालीत.
शासकीय व सार्वजनिक निधीची उधळपट्टी होऊ नये ,याबाबत ते नेहमीच दक्ष राहिले.दर महिन्याला आपल्या कार्यालयातील कागदपत्राची छाननी करून आऊटडेटेड कागदाची रद्दी विकुन ती रक्कम शासकीय कोषागार कार्यालयात जमा करायचे.असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले होते

—–
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन हे पुरोगामी चळवळी करीता अत्यंत दुःखद आहे.त्यांना पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.