पिंगाली वेंकय्या आणि आपला राष्ट्रीय ध्वज !

42

(पिंगाली वेंकय्या जयंती सप्ताह विशेष)

आपला राष्ट्रध्वज अतिशय अर्थपूर्ण आहे. असा ध्वज निर्माण करणाऱ्या पिंगाली वेंकय्या यांना मात्र देशाने स्मृतिआड केले आहे. ज्याने आपल्याला आज हा राष्ट्रीय तिरंगा ध्वज दिला त्याचा विसर आपल्याला का पडावा? आजही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी त्यांच्याबद्दल एक उद्गार देखील काढले जात नाही. आजही युवा पिढी सर्रास प्लास्टिकचा ध्वज घेतात व मिरवून झाले की फेकून देतात. बघणारेसुद्धा नुसते बघत राहतात. आज आपण जो ध्वज रस्त्यावर सहज फेकून देतो ना? त्याच ध्वजाला सन्मानाने फडकविता यावे, म्हणून पिंगाली वेंकय्या यांच्यासारखे सळसळत्या रक्ताचे हजारो देशभक्त रस्त्यावर उतरले होते. अशा माणसांची तरी जाण व त्यांच्या कार्याची कदर आपण नक्कीच ठेवली पाहिजे.
भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौद्ध असे अनेक जातीय व धर्मीय विविधता असणारे लोक राहतात. प्रत्येक जाती-धर्माच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती एकमेकांहून कितीतरी भिन्न आहेत. तरीही वर्षातून येणाऱ्या दोन दिवशी ते सर्वधर्मीय एकाच जल्लोषात व आदराने आपले जात, धर्म, पंथ, वय, लिंग, वर्ण आदी विसरून एकत्र येतात.

त्यातील एक दिवस आहे २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन आणि दुसरा आहे १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन या दोनही दिवशी लहान मोठ्यांच्या छातीवर भारताच्या तिरंग्याचे छोटे प्रतीक झळकत असते. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला आपल्या तिरंग्याखाली आपण भारतीय म्हणून गर्वाने उभे ठाकतो. बाकी दिवशी आपण भारतीय आहोत, याचा विसर आपल्याला पडत असला तरी प्राणप्रिय तिरंगा मात्र आपल्याला याची जाणीव करून देतो. हा तिरंगा म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज. तो हवेत स्वतंत्रपणे उंचच फडकत रहावा यासाठी अनेकांनी आपले प्राण हसत-हसत गमावले. याच सर्वांच्या बलिदानावर आज हा तिरंगा स्वतंत्रपणे भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्वातंत्र्यवीरांची आठवण काढतांना आपण जरा वेगळ्या वाटेवर जाऊया. पिंगाली वेंकय्या नाव फारसं परिचित नसावं बहुदा! पण या नावाने केलेले काम न विसरण्यासारखे आहे. आज आपण जो प्राणसखा तिरंगा फडकवतो, त्याचेच आद्य रचनाकार म्हणजेच पिंगाली वेंकय्या होय.

आंध्र प्रदेशातील भटलापेनुमारू मछलीपट्टणम येथे दि.२ ऑगस्ट १८७६ रोजी पिंगाली वेंकय्या यांच्या जन्म झाला. ते भूशास्त्र व शेती या विषयात उच्चशिक्षित तसेच शिक्षणतज्ञ देखील होते. मछलीपट्टणम येथे त्यांनी स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. गावातूनच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील उच्चशिक्षणासाठी कोलंबो गाठले. त्यांनी जर्मनी व उर्दू भाषांचा देखील खूप अभ्यास केला. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत प्रवेश केला. आफ्रिकेतील युद्धात सुद्धा सामील झाले. भारतात त्यांनी काही काळ रेल्वेमध्ये सुद्धा काम केले होते. आफ्रिकेत असतानाच त्यांची भेट म.गांधीजी यांच्याशी झाली. त्यांच्यासोबत ते भारतात आले व स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.आज आपण जो तिरंगा पहातो, तो काही एका प्रयत्नात तयार झाला नाही. त्याचाही रंजक इतिहास आहे. ब्रिटिशांनी इ.स.१८५७मध्ये एक राष्ट्र एक ध्वज असावा म्हणून भारतामध्ये त्यांनी रचना केलेला ध्वज फडकविला.

या लाल ध्वजावर ब्रिटिशांच्या युनियन जॅकचे सुद्धा छोटे स्वरूप होते. यानंतर अनेक वेळा, अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या व्यक्ती व संघटनांनी विविध प्रकारचे ध्वज फडकावले. यात स्वामी विवेकानंद यांच्या अनुयायाने तयार केलेला ध्वज, मादाम कामा यांनी तयार केलेला ध्वज असे अनेक प्रकार समाविष्ट आहेत. कधी ध्वजावर चंद्र, सूर्य, तारे, कधी बंगाली भाषेत वंदे मातरम, कधी पिवळा रंग, कधी भगवा तर कधी लाल असे अगणीत बदल झाले. तरीही भारत देशाचा स्वतःचा अधिकृत असा ध्वज नव्हताच. गांधीजी व काँग्रेससोबत काम करताना वेंकय्या यांना सारखे वाटत होते की आपल्या राष्ट्राचा एक स्वतंत्र ध्वज असावा. त्यांना गांधीजी आणि अनेकांनी प्रोत्साहित केले. सलग काही काळ त्यांनी अनेक देशांच्या ध्वजांचा अभ्यास करून स्वतः त्याची रचना केली. त्यानुसार ध्वजावर दोन रंग होते. एक होता हिरवा- मुस्लिम धर्माचे प्रतीक तर दुसरा होता लाल- हिंदू धर्माचे प्रतीक आणि यासोबत मध्यभागी एक चरखा होता. त्यांत हिंदू-मुस्लिम प्रतिनिधित्व आले. परंतु इतर धर्मांचा उल्लेख त्यात येत नसल्यामुळे गांधीजींनी त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पट्टी असावी, असे सुचविले. त्यानुसार वरती पांढऱ्या रंगाची जोड मिळाली व ध्वज तयार झाला. तो सन १९२१च्या काँग्रेस सभेमध्ये फडकविला होता.

यानंतर सन १९३१मध्ये वेंकय्या यांनी ध्वजात अजून बदल केले. यामध्ये भगवा रंग सर्वात वरती, त्यानंतर पांढरा आणि मग हिरवा रंग दिला गेला. मध्यभागी चरख्याला स्थान दिले. या ध्वजाला ‘स्वराज्य ध्वज’ असे नाव दिले. हा ध्वज इंडियन नॅशनल काँग्रेसने अधिकृतपणे स्वीकारला.भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी म्हणजे दि.२३ जून १९४७ रोजी एक समिती स्थापन झाली. या समितीमार्फत भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा असेल? हे ठरविले गेले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू असे अनेक दिग्गज नेते या समितीमध्ये होते. या सर्वानी एकमताने असे ठरविले की सन १९३१मध्ये पिंगाली वेंकय्या यांनी रचना केलेला ध्वज हाच योग्य असून यामध्ये थोडे बदल केले जावेत. त्यानुसार राष्ट्रध्वजाचा आकार, लांबी, रुंदी, कापड इत्यादी बाबी ठरविल्या गेल्या. त्याप्रमाणेच रंग ठेऊन फक्त चरखा काढून त्याजागी अशोकचक्र बसविले.

यानुसार ध्वजामध्ये सर्वात वरील पट्टी भगव्या रंगाची- हिंदू धर्म व क्रांतिकारकांच्या बलिदानाचे प्रतीक, मधली पट्टी पांढऱ्या रंगाची- भारतातील शांततेचे आणि इतर सर्व धर्मांचे प्रतीक, तिसरी पट्टी हिरव्या रंगाची- इस्लाम धर्माचे व भारतीय समृद्धीचे प्रतीक. या सगळ्यांमध्ये २४ आरे असलेले अशोकचक्र- २४ तास प्रगतीकडे वाटचाल, धर्म व कायद्याचे प्रतीक अशा अर्थाने आपला तिरंगा तयार झाला. दि.१५ ऑगस्ट १९४७मध्ये जेव्हा स्वतंत्र भारतात पहिल्यांदा हा तिरंगा फडकविला गेला तेव्हा प्रत्येकाला आपण भारतीय आहोत, ही जाणीव प्रकर्षाने झाली. याच स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतीकारकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली. भारतभूमी धन्य झाली. आजही रक्त सांडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा विसर पडल्यामुळे सामान्य नागरिक गाफील असला तरी या तिरंग्यासाठी भारताचे सैनिक आपल्या प्राणांचीही बाजी लावतात. या ध्वजाखाली आपण सगळे भारतीय म्हणून एकतेने नांदू शकू. यासाठीच तर सैनिक तिरंगा रक्षणार्थ आपले सर्वस्व पणाला लावतात. भारतीय राष्ट्रध्वजाची प्राथमिक रचना करणारे शिल्पकार पिंगाली वेंकय्या यांचे दि.४ जुलै १९६३ रोजी निधन झाले. भारत माता की जय!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंतीनिमित्त त्यांना व राष्ट्रध्वजाला अभिमानाने वंदे मातरम !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.C/o श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, मु. रामनगर, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com