भारतीय समाज क्रांतीच्या विद्रोही जननायीका–क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

24

✒️भीमटायगर पंजाबराव कांबळे(यवतमाळ)मो:-9850342588

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी पुण्यापासून सुमारे ५० कि.मी.दुर पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळपासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या नायगांव या ठिकाणी झाला.सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या जेष्ठ कन्या होत.सन १८४० मध्ये जोतीराव फुले यांच्याशी विवाह झाला तेंव्हा सावित्रीबाईंचे वय १०वर्ष तर जोतीरावांचे वय १३ वर्ष होते.जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनविले.२२ नोव्हेंबर १८५१ च्या ‘बाॅंम्बे गार्डीयन’ या वृत्तपत्रातील बातमीवरून सावित्रीबाईच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी)यांनी घेतली.सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नाॅर्मल स्कुलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते.

सावित्रीबाई केवळ वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षक बनल्या, त्यामुळे सावित्रीबाई ह्याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत हे तत्कालीन दस्तावेजांवरुन स्पष्ट होते.त्यांनी शिकविण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रिच्या ‘सार्वजनिक जीवनाची’ सुरूवात होय.म.फुले यांनी चालविलेल्या कार्याचा प्रचंड प्रभाव सावित्रीबाईंवर होता.चुलीतल्या लाकडी निखा-यांच्या मंद ज्वालांवर जशी भाकर पाचविली जाते,त्याप्रमाणे जोतीरावांच्या जडणघडणीत सावित्रीने स्वत:ला तावून-सुलाखून, पतीसोबत हालपेष्टा भोगल्या,शिव्याशाप सहन केले, दगड व शेणांचा मारा निमूटपणे गिळंकृत करून त्या समाजपरिवर्तनाच्या लढाईमध्ये कणखरपणे,निर्भयतेने कार्य करू लागल्या.

हजारों वर्ष धर्ममार्तंडांनी मनुस्मृतीला शिरोधार्य मानून येथील स्त्रि व शुद्रातिशुद्र माणसाला माणूसपण नाकारले होते,स्त्रिदास्यत्वाने कळस गाठला असतांना अशा परिस्थीतीत दिडशे वर्षापुर्वि सावित्रीबाईंने जोतीरावांसोबत व्यवस्थेविरूध्द अक्षरशः बंड करून आपल्या ज्ञानार्जनातून येथील स्त्रिला, दलीत-शोषितांना अज्ञान अंधकारातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याची स्वाभीमानी शिकवण दिली. सावित्रीबाईचे या देशात आदर्श समाजनिर्मिती करण्याचे व या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्तम सकारात्मक टाकलेले पहिले पाऊल एका नव्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीपर्वाची सुरुवात होती.त्यांचे कार्य समग्र सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे होते. व्यवस्थेने लादलेल्या स्त्रिदास्यत्वावर प्रचंड वज्रप्रहार करून त्या घराबाहेर पडल्या व दलीत-मुस्लीमांतील मुला-मुलींना क्रांतीसन्मुख असे शैक्षणिक बाळकडू पाजले. हा त्यांचा व्यवस्थेविरूध्दचा आक्रोश आणि विद्रोहच म्हणावा लागेल..!

मुळातच सावित्रीबाईंचा जन्म शंभर-दिडशे घर असलेल्या शिरवळजवळच्या नायगांवसारख्या खेड्यात शिक्षणाचे संस्कार नसलेल्या एका गरिब निरक्षर असलेल्या शेतकरी कुटुंबात दुष्काळाची चटके खात झाला.अशा बिकट परिस्थितीत जन्मलेली-वाढलेली,गरिबीची जाणिव असलेली सावित्री जोतीरावांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे गिरवत शिक्षक-प्रशिक्षण घेते आणि ज्ञान संपादन करून ज्ञानयोगिनी बनते.ही देशातील दोन हजार वर्षाच्या इतिहासात जिथे मनुस्मृतीसारख्या पुरूषसत्ताक विकृत धर्मग्रंथाद्वारे स्त्रिला केवळ उपभोगाची वस्तू मानून तिला फक्त चुल आणि मुल यापुढे तिचं अस्तित्व ना मानणा-या मनुस्मृती समर्थक धर्ममार्तंड्याशी जीवघेणा संघर्ष करते. जोतीरावांनी अपार प्रेम असलेल्या आपल्या सहचारिणीला म्हणजेच सावित्रीबाईंचा शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा मेंदू सशक्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या सदृढ बनविले होते. हे कार्य केवळ महापुरूषच करू शकतात ते जोतीरावांच्या सकारात्मक सामाजिक कार्यशैलीतून आपणास स्पष्ट होते हे मात्र नक्की.

फुले दांपत्याने १८४८ ते १८५२ या चार वर्षाच्या कालावधीत पुणे व पुण्याच्या ग्रामीण परिसरात एकूण अठरा शाळा काढल्या आणि त्या यशस्वीपणे चालविल्या,परंतू शाळांची जाळी विणत ते बसले नाहीत तर या शाळा चालविण्यासाठी त्यांनी दिवस पाहिला नाही की रात्र पाहीली नाही,तहानभूक विसरून या दांपत्याने ह्या परोपकारी कृत्यांचा पिच्छा न सोडता लोकांचा त्रास सहन करीत हा ज्ञानदानाचा यज्ञ अहोरात्र प्रज्वलित ठेवला,लोकांना माणूस बनविणे,ताठ स्वाभीमानाने जगण्यासाठी उभे राहायला शिकविणे,आपणही माणूस आहोत माणसानं माणसासारखं वागून माणसाबद्दल प्रेम निर्माण करण्यास शिकविणे,केवळ साक्षर करण्यासाठी त्यांना शिक्षण द्यावयाचे नव्हते तर त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाज जाग्रृती करावयाची होती कारण शिक्षणच हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे हे ते दोघेही जाणून होते.एवढा शिक्षणविषयक व्यापक दृष्टिकोन जोतीरावांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सावित्रीबाई च्या मनात ठसला होता.

सामान्य लोक जनावरांसारखं जीवन जगत असतांना त्यांच्यात रूजविल्या गेलेल्या जुनाट रूढी-परंपरा, अंधश्रद्धा,भोळ्या समजूतीचा नायनाट करण्यासाठी व त्यांच्यामध्ये माणुसकीची जाणीव करून द्यावी याचा विचार सावित्रीबाई नी केला होता.सन १८५४ साली लिहीलेल्या ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहात शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात,

“शुद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा।
शिक्षणाने मनुष्यत्व,पशुत्व हटते पहा।।”

माणसाला माणूसपण मिळविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा मुलभूत विचार दिडशे वर्षापुर्वि मांडणा-या सावित्रीबाई फुले ह्या भारतातील थोर शिक्षणतज्ञच नव्हे काय!“शिक्षणातून जीवनातील ‘खरेखोटे’ निवडण्याची क्षमता आली पाहिजे.” मुला-मुलींची स्वतंत्र प्रतिभा मुक्तपणे प्रकट व्हावी यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असत,त्यांना त्यात मिळालेले यशही लक्षणीय आहे.त्यांच्या शाळेतील एका चिमुरड्या मुलीला पारितोषिक स्विकारण्यासाठी विचारपिठावर बोलवण्यात आले तेंव्हा ती चिमुरडी अध्यक्षांना उत्स्फूर्तपणे म्हणाली,”सर,मला बक्षीस म्हणून खाऊ-खेळणी नकोत.आम्हाला शाळेचे ग्रंथालय हवे आहे.” ही चिमुरडी दररोज रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यासातबुडून जात असल्याची गोड तक्रार तिच्या पालकांनी केली.

सावित्रीबाई च्या मुक्ता साळवे नावाच्या मातंग समाजातील एका विद्यार्थीनींने स्वत:चे आत्मकथन करणारा निबंध लिहिला होता.१८५५ साली १४ वर्षाची मुक्ता लिहीते *,”लाडूखाऊ ब्राम्हण लोक तर म्हणतात की,वेद ही आमचीच मत्ता आहे.ब्राम्हणेत्तरास वेदांचा अधिकार नाही.यावरून जर आम्हास धर्मपुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे? हे भगवाना,तुजकडून आलेला कोणता धर्म आम्ही स्विकारावा ते लवकर कळीव म्हणजे तेणेप्रमाणे तजविज करता येईल!”* अशी भेदक मांडणी करणारा हा निबंध त्या मुलीकडून ज्ञानोदयच्या संपादकांनी ऐकला आणि ते चकित झाले,हा निबंध म्हणजे आधुनिक दलित साहित्याची ती सुरूवातच मानायला हवी.

अशारितीने सावित्रीबाई फुले यांनी व्यवस्थापरिवर्तनाचा विद्रोही विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवून त्यांना क्रांतीसन्मुख शिक्षण दिले व त्या यशस्वीही झाल्यात. जोतीरावांप्रमाणेच सावित्रीबाईंना अज्ञान अंधकारात चाचपडणा-या शुद्रातिशुद्रांना ज्ञानी करण्याचा कसा ध्यास लागला होता याची यावरुन कल्पना येते.आणि म्हणूनच त्या आपल्या काव्यात म्हणतात *,”ज्ञान नाही,विद्या नाही तयास मानव म्हणावे का?* असा प्रश्न विचारून
*”लिहीणे-वाचणे शिकून घ्या रे। छान वेळ आली।।”* असा उपदेशही करतात.

*”दु:खितांच्या वेदनांच्या कळा उरात आमच्याही”* ही जाणीव अंत:करणात सदैव ठेऊन अस्सल अनुभूतींचे प्रामाणिक चित्रण सावित्रीबाईंनी आपल्या कवितेत केली आहे.त्यामुळे सावित्रीबाईंची काव्य रचना म्हणजे सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील क्रांतीच होय,हे मान्य करावे लागेल. जिवनाच्या अंतापर्यंत निस्वार्थ समाजसेवा,’उद्योग’,’विद्यादान’,’सदाचारण’,’व्यसने’,’कर्ज’ या ज्वलंत विषयावर आपल्या विद्रोही विचाराने शोषितांचे मेंदू साफ केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम..!

जय ज्योती🙏जय सावित्री🙏जय भीम🙏