✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-9637357400
“कोणत्याही पिढीतील लोकांपुढे त्यांच्या काळातील जे महत्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न स्वतंत्रपणे विचार करून सोडविण्याचे स्वातंत्र्य त्या लोकांना असलेच पाहिजे.जो समाज पारतंत्र्यात जखडला गेला असेल त्या समाजाने स्वातंत्र्यासाठी अहर्निश लढा दिला पाहिजे.:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खंड १८ भाग २ पा. न .५३७
१५ आँगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला .पारंत्र्याच्या गुलामी श्रृखंला तटातटा तुटल्या .७४ वर्ष स्वातंत्र्याला झाले असले तरी अजूनही हे स्वातंत्र्य सर्वांच्या घरापर्यंत पोहचले नाही.ते पोहचू नये यांचे कटकारस्थान करण्यात आले.ब्रिटीशाच्या हातातील सत्ता उच्चवर्णीय समाजाच्या दावणीला बांधली गेली.आपलाच माणूस आपलेच शोषण करू लागला.संविधान २६ जानेवारी १९५० पासून देशात अमलात आले असले तरी अनेक समुहाना त्यांचे मुलभूत अधिकार मिळाले नाही .हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.आज मनुव्यवस्थेची नवी संहिता देशावर मनोविकृत भावनेनं वागत आहे.स्वातंत्र्य व गणराज्य अंधाऱ्या काळोखात ठेचाळत ठेचाळत चालत आहे.भांडवलदारवृत्ती ,अभीजनवादीवृत्ती,सत्ताकेंद्रीवृत्ती,टकलू गँगवृत्ती , धार्मिक कट्टरवृत्ती देशावर अक्राडविक्राड रूप घेऊन राजरोशपणे फिरत आहे.भारताचे स्वातंत्र्य शेवटचा श्र्वास घेत आहे.सारे सरकारी सेवाक्षेत्र व उपक्रम श्रीमंताच्या हवाली केले जात आहे.
सचिव पदावरील लँटलरभर्तीने युपीएससी विद्यार्थीचे खच्चीकरण केले जात आहे.लोकशाही आपली शेवटची घटका मोजत असतांना आपण सारे उत्सवप्रीय होऊन सण साजरे करतो.पण यावर गंभीर चर्चा करत नाही.स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व गमावले ते देशोधडीला लागले आहेत.तर जे स्वातंत्र्य आंदोलनात सामील नव्हते ते देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत आहेत.अशा बनावट कावेबाजापासून देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे सर्व भारतीयांते परम कर्तव्य आहे.
आज देशात देशभक्ती व देशद्रोही यांची ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे.अनेक विचारवंत,लेखक,कलाकार,तरूण ,समाजसेवक,विद्यार्थी यांच्यावर चूकिच्या केस करून त्यांचे जीवन उध्दवस्त केले जात आहे.फसव्या मायावी साम्राज्यवादातून देशावरील संस्थावर हल्ला केला जात आहे.देशात भक्तमंडळीचे भरघोस पीक आले आहेत.ते नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत.आपल्या आई- बहिणीची विटंबना होत असतांना हा भक्त नपुसंक बनला आहे.त्याच्यातील क्रांतीत्व नतभ्रष्ट झाले आहे.देश गुलाम करणाऱ्या पुनरुज्जीवनवादी तत्वांना ते सहकार्य करत आहेत.शेतकरी आंदोलन करत असतांना त्या आंदोलना देशद्रोही म्हणून हिणवल्या जात आहे.कामगार , शेतकरी,मागासवर्गीय,वंचित,शोषित,विद्यार्थी यांचे आयुष्य बरबाद केले जात आहे.
दोन लोकांच्या कल्याणासाठी सारा भारत देश अंधकारमय आभासीयुगात नेल्या जात आहे.मोबाईलच्या फ्री डाटाने , तरूणाईची ऊर्जा कमकुवत केली जात आहे.हजारो एकर जमीनी कवडीमोलभावाने श्रीमंताच्या घशात टाकल्या जात आहेत.राष्ट्रपती , प्रधानमंत्री नामधारी दिसतात .सारे कार्यकारी अधिकार भांडवलदारांच्या हाती दिले आहेत . देशातील दलित ,शोषित ,कामगार,आदिवासी,शेतकरी या घटकावर अन्याय अत्याचार होत असतांना देशाचे प्रधानमंत्री व राष्ट्रपती मुग गिळून गप्प आहेत.देशात आज स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार सुरू आहे. खैरलांजी,हाथरस ,दिल्ली ,जवखेडा, हे प्रकरण सातत्याने घडून येत आहेत.कायद्याचे भय नसल्याने स्त्रीवरील अन्याय वाढला आहे.ऑलम्पिक मध्ये महिला हॉकी मँच हारल्यावर वंदना कटारीया या मुलींच्या घरासमोर जातीवाचक अवाच्य शीवी दिला जाते. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला आज कसे विषमतवादी वातावरणात राहावे लागते हे एक जळजळीत वास्तव आहे.
आजही देशात जाती व धर्म यावरून भेदभाव केला जात आहे.खरचं आज देश स्वातंत्र्यात आहे का ?१६ ऑगस्ट १९४७ अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढून साऱ्या भारतीयांना आव्हान केले होते की,”यह आजा़दी झुठी है। देश जनता भूखी है।”ही भूमिका आजही सत्यात दिसून येत आहे.
अरे स्वातंत्र्या ! तू कामगार,शेतकरी ,गरीब,वंचित,शोषित,आदिवासी,भटके विमुक्त,यांच्या घरी केव्हा येशील .डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याविषयी लिहितात की,”क्षत्रियांनी राज्य करावे . ब्राम्हणांनी ज्ञानदान करावे.वैश्यांनी व्यापर करावा व शूद्र व अतिशुद्रांनी सेवा करावी अशी तत्वे होती.वैश्यांनी आता राजकारणाचाही व्यापार सुरू केला आहे.पण शुद्रांच्या दर्जात्मक फरक झाला नाही.या अन्यायविरूद्ध माझे रक्त उसळते . सामाजिक ,आर्थिक व धार्मिक वर्चस्वाच्या जोडीला राजकिय वर्चस्व घालण्याचा मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाने विरोध करीन.स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य व आमच्यावर अधिराज्य असा कधीच होऊ शकत नाही.”हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.
तुझ्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्यांना कधी उजेड देशील.की फक्त श्रीमंत व उच्चवर्णीय बंगल्यातच तू बंदिस्त झाला आहे.स्वातंत्र्य़ा आता तूला मुक्त व्हावेच लागेल.आता तू लपू नकोस काळ्या दगडाच्या आत .तू बिनतीवरती घे धाव .जाळून टाक तुला गुलाम करणाऱ्या माथेफिरूना.सारे तथ्य कोसळवून टाक तुझ्या हिमऊर्जेनं.नवंमूल्यमंथनाचा नवा आविष्कार घडवून आण.तुझ्या नावाचा जयजयकार झोपडीझोपडीत सुरू आहे.
नव्या उमेदीची नवी महाऊर्जा घेऊन नव भारताच्या स्वप्नासाठी ये.सांग स्वातंत्र्य तू कुठे आहे..?तुला मोकळे करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.तुझा अंधकारमय पिंजरा आम्हीच तोडणार आहोत.ये स्वांतत्र्या आमच्या घरी तुला नवा परिवर्तनशील देश घडवायचा आहे.तूर्ताश थांबतो..!