लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव ठेवून कामे करा – विजयसिंह पंडित

22

🔸तलवाडा येथे ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

✒️प्रतिनिधी गेवराई(नवनाथ आडे)

गेवराई(8ऑगस्ट):- तलवाडा ग्रामस्थांनी २५ वर्षांची सत्ता उखडून टाकत परिवर्तन घडवून आणले आहे. लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव ठेवून दर्जेदार विकास कामे करा, यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केवळ कागदावर करून लोकांची दिशाभूल केली होती. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी तलवाडा ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत ५० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शुक्रवार, दि.६ ऑगस्ट रोजी जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी तलवाडा ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू हात्ते, उपसरपंच अज्जूभाई सौदागर, माजी पं.स.सदस्य बाबासाहेब आठवले, बापूराव गाडेकर, भाऊसाहेब माखले, दादाराव रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, तलवाडा ग्रामपंचायतमध्ये विरोधकांच्या भ्रष्ट कारभारामुळे विकासाचा बोजवारा उडालेला आहे. त्यांच्या गलथान कारभाराला कंटाळून तलवाडा ग्रामस्थांनी मोठ्या विश्‍वासाने ग्रामपंचायत आपल्या ताब्यात दिली आहे, याची जाणीव ठेवून ग्रामपंचायतच्या पदाधिका-यानी सार्वजनिक कामासोबतच वैयक्तिक कामेही जलदगतीने करून लोकांचा विश्‍वास सार्थ करावा. सर्व कामे दर्जेदार करून विरोधक आणि आपल्यातला फरक लोकांना कळला पाहिजे, येणारा काळ महत्वाचा आहे, चांगले काम करा. माजी आ.अमरसिंह पंडित यांचे तलवाडा ग्रामपंचायतवर पूर्ण लक्ष आहे. येणा-या काळात तलवाड्यासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार केला जाईल, रस्ते, नाली आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला जि.प. शाळा इमारतीचा प्रश्‍नही लवकरच निकाली काढला जाईल.

शाळा खोली बांधकाम आणि सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून शाळेचे काम दर्जेदार करून तलवाड्याच्या वैभवात भर टाकणार आहोत. तलवाडा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले त्यांना कधी विसरू नका, अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा. ज्या पध्दतीने ग्रामपंचायत निवडणुकीत कौल मिळाला त्या पध्दतीने येणा-या जि.प.आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयाचा कौल मिळण्यासाठी कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी तलवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश महाराज कचरे, नारायण मरकड, दिगांबर पवार, सोमनाथ काळे, शहादेव साबळे, महेश शिंदे, उपसरपंच मुकेश बोराडे, साहेबराव कुर्हाडे, मोहन डोंगरे, माऊली डोंगरे, निवास मरकड यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.