ज्ञानदानाची पंधरा वर्षे सेवा पूर्ण करणारे आदर्श शिक्षक – श्री.हरिभाऊ शेळके सर

34

मनापासून केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही.तसेच चांगली केलेली सुरुवात शेवट गोड करते या म्हणीनुसार सध्या तालुका फलटण,जि.सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री.शेळके हरिभाऊ शिवदास यांच्या ज्ञानदान कार्याची पंधरा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आष्टी,जि.बीड येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी घेतलेला आढावा….श्री.हरिभाऊ शेळके सर हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढरी या गावचे रहिवासी आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी येथे पूर्ण झाले.त्यांचा अभ्यासाचा प्राथमिक पाया श्री.पद्मनाथ गर्जे सर व श्री.ढेरे सर यांनी मजबूत केला.

तद्नंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण हे यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी,ता.आष्टी या ठिकाणी पूर्ण केले.याच विद्यालयात आष्टी येथील बी.एड.कॉलेजचे शिकाऊ विद्यार्थी शिक्षक पाठ घेण्यासाठी शाळेत दरवर्षी येत असत व मार्गदर्शन करत असत.त्याच वेळी शेळके सरांची खरी उमेद जागृत झाली की,आपण पण चांगला अभ्यास करून असेच शिक्षक होऊन ज्ञानदान करायचे.शाळेतील मुख्याध्यापक श्री.आजबे सर नेहमी एक सुविचार सांगायचे की,ज्ञानाचा दिवा,घरोघरी लावा.याच शाळेतील आदर्श शिक्षक श्री.विधाते सर,श्री.सुनील शेळके सर,श्री.बनकर सर,श्री.हजारे सर,श्रीमती गवसणे मॅडम,श्री.वनवे सर,श्री.जगताप सर,श्री. राऊत सर यांचे त्यांना सखोल मार्गदर्शन मिळाले.माध्यमिक शिक्षण चालू असताना त्यांना कऱ्हेवडगाव येथील त्यांचे आजोबा श्री.हौसराव खांडवे व मामा मंडळींचे खुप सहकार्य लाभले तसेच तेथील मित्र परिवार यांचेही खुप चांगले मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

इयत्ता दहावी मध्ये चांगले गुण घेऊन पास झाल्यामुळे आष्टी येथील हंबर्डे कॉलेज मध्ये क्रॉप सायन्स ला ॲडमिशन मिळाले,परंतु त्यावेळी सर्वात जास्त महत्त्व या पदवीला असल्यामुळे ते त्यांनी पूर्ण केले.त्यांचे आई-वडील श्री.शिवदास धोंडीबा शेळके व सौ सुशिलाबाई शेळके हे पारंपरिक शेती करत असल्यामुळे शेतीतून शिक्षणासाठी पैसे पुरवणे कठीण जात होते.त्यांना माहीत होते की,आपल्या घरात पैसे नाहीत व बँकेत तर खातेच नाही मग कसे शिक्षण करायचे.पण मनात विचार यायचा त्यावेळी आई,वडील एकच सांगत असत तू शिक.तू जर शिकून चांगले गुण घेऊन काहीतरी करत असतील तर पैशाचा विचार करू नको.आम्ही काबाडकष्ट करुन पैसे देवूत.अशा वेळी त्यांना धिर मिळायचा व अभ्यास करण्यासाठी आधार मिळायचा व ते अभ्यासात मग्न रहायचे.
इयत्ता बारावी ला चांगले गुण मिळाले.पण याच वेळी श्री.मडके सर यांच्या मार्गदर्शनाने जीवनाला टर्निंग पॉईंट मिळाला,ते म्हणाले,आता तुला जर डी.एड.करायचे असेल तर इंग्लिश माध्यमातून कर,कारण भविष्यात इंग्रजीला फार महत्त्व असेल.सरांच्या म्हणण्यानुसार इंग्रजी माध्यम डी.एड.ला फॉर्म भरला.डि.एड.अँडमिशन प्रोसेस व कॉलेज सुरू होण्यासाठी २४ महिने वेळ लागणार होता.म्हणून त्यांनी या वेळेत ऑगस्ट २००६ रोजी त्यांच्या घराच्या जवळ असणाऱ्या अमराई वस्तीवर लहान मुलांचे शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली.रोज सायंकाळी त्या मुलांचा ते अभ्यास घेऊ लागले व त्याच वेळी त्यांची शिक्षक होण्याची यशस्वी सुरुवात झाली.नंतर योगायोगाने आष्टी येथे इंग्रजी माध्यम डी.एड.कॉलेजला अँडमिशन मिळाले.

पुढे कॉलेज चालू असताना रूम खर्च भागवण्यासाठी सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये श्री.लिमकर सर यांच्यासोबत काम चालू केले तसेच शिक्षणाच्या इतर खर्चासाठी त्यांचे बंधू भरत शेळके,दाजी लक्ष्मण शिंदे,दाजी ब्रह्मदेव मगर यांचे आशीर्वाद व डेव्हलपर्स जामखेड यांचे खूप सहकार्य मिळाले.डी.एड.पूर्ण झाल्यानंतर सकाळ व सायंकाळी सक्सेस कोचिंग क्लासेस मध्ये काम करून व मधल्या वेळेत टाईम पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल मिरजगाव येथे काही दिवस काम करून त्यांनी ज्ञानदान केले.डी.एड.सीईटी २०१० मध्ये पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण घेऊन जिल्हा परिषद सातारा येथे त्यांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली.नंतर त्यांनी सेवांतर्गत बी.एस.सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले व सध्या ते कार्यरत शाळेत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून खुपच चांगले काम करत आहेत.त्यांनी शैक्षणिक यूट्यूब चँनल तयार करून अनेक शैक्षणिक व्हिडिओ तयार केलेले आहेत.तसेच शैक्षणिक ब्लॉग तयार करून त्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.तसेच त्यांनी माजी विद्यार्थी व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यांना मार्गदर्शनपर मेसेज देतात.तसेच अनेक शैक्षणिक ग्रुप तयार केलेले आहेत.त्यामधून ते शैक्षणिक माहितीची देवाण-घेवाण करत आहेत.

अशा आदर्श शिक्षकाच्या शैक्षणिक कार्याला त्यांच्या मित्रांकडून व नातेवाईक यांच्याकडून सततच प्रेरणा मिळत आहे.अशा सर्वगुणसंपन्न आदर्श शिक्षकाच्या शैक्षणिक कार्यास मनस्वी हार्दिक शुभेच्छा….!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड,आष्टी,जि.बीड(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)मो.९४२३१७०८८५