गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यातील बंजारा समाजाचा शाळकरी विद्यार्थी संदिप चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन केले जाईल – बी एम पवार

25

✒️विशेष गेवराई(नवनाथ आडे)

बीड(दि.10ऑगस्ट):- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यातील बंजारा समाजाचा शाळकरी विद्यार्थी संदिप सोपान चव्हाण हत्या प्रकरणातील पाचही आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसी आरक्षण कृती समितीचे बी एम पवार यांनी दिला आहे.

या संदर्भात बीड चे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यातील बंजारा समाजाचा शाळकरी विद्यार्थी संदिप सोपान चव्हाण हा सात आॅगस्ट रोजी आपल्या घराशेजारी असलेल्या भेंडटाकळी येथील लोंढे यांच्या शेतातील खाण्यासाठी उस तोडला, या मुलांना वेळोवेळी सांगुन सुद्धा ऐकत नाहीत याचा राग मनात धरून त्याला विजेचा शाॅक देऊन मारले आणि तो मयत झाला याची खात्री पटल्यावर गावातील चार सहकारी लोकांना सोबत घेऊन त्या बालकाला शेतातुन उचलुन एका तलावात फेकुन देण्याचे नियोजन करीत असतानाच आपला मुलगा कसा येत नाही यासाठी मयत संदीप ची आई आणि लहान भाऊ तपास करत असताना त्यांना हा भयानक प्रकार दिसला.

कवडीमोल किंमत असलेल्या एका ऊसासाठी एका निष्पाप लेकराचा बळी घेतला गेला ही बाब खूप चिंताजनक आणि गंभीर असून माणुसकिला काळीमा फासणारी घटना आहे.
सदरिल घटना घडून दोन दिवसाचा कालावधी झाला होता तरी तलवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता परंतु समाजबांधव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसल्यामुळे काल रात्री उशीरा पाच आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सदरील घटना ही लोकशाहीला आणि माणुसकिला काळीमा फासणारी घटना आहे, एका शाळकरी मुलाला विजेचा शाॅक देऊन मारताना या नराधमांना थोडी तरी दया यायला हवी होती परंतु पाषाणाचे काळीज असलेल्या या नराधमांना थोडी सुद्धा लाज शरम वाटली नाही,संदिप चव्हाण हत्या प्रकरणातील पाचही आरोपींना आठ दिवसाच्या आत अटक झाली नाही तर बंजारा समाज बांधव रस्तावरती येऊन आंदोलने करेल. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार, सरपंच सर्जेराव जाधव आणि युवा नेते अण्णासाहेब राठोड यांनी दिला आहे.