पाया पडण्याची जबरदस्ती…..

24

विवाह’; आयुष्यातील एक महत्वपुर्ण घटना, ज्यात दोन व्यक्तीच नव्हे तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच एकमेकांसोबत जोडले जाते. नवीन नाती तयार होतात. ज्यात कोणालातरी नाते तयार व्हावे म्हणून अपत्यच व्हावे लागेल अशीही अट नसते. ही नाती अगदी सहज जोडली जातात. कोणी सासू, कोणी सासरा, कोणी ननद, आणि नवरीबाई तर एकाच वेळेला बायको, सून, भावजयी, जाऊबाई अशी कित्येक पात्रे रंगवत असते. कागदाला गिरवून काळे करणे नाही किंवा रंगीबेरंगी करणे इतके सोपे नाही ते. ही नाती, हे सर्व संबंध रोज जगावे लागतात. मग तुम्ही त्या-त्या नातेवाईकांच्या संपर्कात रहा की न रहा, तुमचे नाते त्या व्यक्तीशी जोडले गेले ते कायमचेच!

इतका ऊहापोह करण्याचे कारण हे, की यातले ‘सून’ नावाचे पात्र हे जास्त गाजलेले असते, कुठे-कुठे तर गांजलेले आणि गंजलेलेही असते, ही गोष्ट वेगळी. त्या संबंधित स्त्रीला कोणाचीतरी बायको असण्याची इतकी काळजी नाही जितकी सून असण्याची आहे. कारण ही सून असल्यामुळेच इतर बऱ्याच जणांचे तिच्यावर सो कॉल्ड जन्मसिद्ध असलेले अधिकार चालत असतात. ही सुन तिची कर्तव्य व लोकांचे तिच्यावर चालणारे अधिकार याने कायम गुंफलेली असते. गुंफलेली कशाची बांधलेलीच म्हणा की एकप्रकारे!

लोक एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करतात नाहीतर वेगवेगळे प्रणाम! नमस्कार हा आदर व्यक्त करतोच असे नाही, ती फक्त बोलण्याची एक सुरुवात असते ज्यातून संभाषण सुरळीत पार पडण सोयीचे होते. मग कोणी नमस्कार करतो तर कोणी नाही. याचा अर्थ त्या-त्या व्यक्तीला त्या विशिष्ट व्यक्तीला बोलण्यात रुची नसते म्हणून तो नमस्कारही करत नाही अन् कुठला चमत्कारही! मग त्याच्याबद्धलचा तो राग असेल नाहीतर दोघांत काहीतरी बिनसले असेल कदाचित! एकमेकांना ते चुकूनही म्हणत नाहीत की तू मला नमस्कार केला नाही!वैगरे! कारण त्यांना त्यामागचे कारण अचूक माहिती असते.

घरचे लोकं एकमेकांना नमस्कार रोज उठून करतात हे माझ्यातरी ऐकिवात नाही. शुभ प्रभात ( गुड मॉर्निंग) करत असतील तर ती बाब वेगळी; आणि यांच्यात काही भानगडी झाल्या तर शुभ प्रभात तर सोडून द्या, ते एकमेकांचे तोंडही पाहणे पसंत करत नाहीत. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसा इथेही आहेच! जर सुनबाईचे सासुबाईशी बिनसले असेल तर ती मी यांच्या पाया पडणार नाही असे ती म्हणू शकत नाही. तिला नमस्कार म्हणून सासुबाईच्या, मामाजीच्या पाया या पडाव्याच लागतात. रोज नाही म्हटलं तरी सणवार, वाढदिवस, घरगुती कार्यक्रम नाहीतर बऱ्याच दिवसाने सुनबाई माहेरून परतली असेल तर घरी असतील त्या सर्वांच्या पाया खाली वाकून, गुडघे टेकून पडाव्या लागतात. हात जोडून नमस्कार नाही तर पाया पडायच्या म्हणतोय मी. मग, ननद आली असेल तर तिच्या आणि कुठेकुठे तर ननदेचे मुले-मुली यांच्याही पाया पडाव्या लागतात. मग ती मुले शेम्बडी आणि खरकटी असली तरीही चालतात, नव्हे चालवली जातात. तो त्यांचा मान असतो म्हणे; आणि हा मान जबरदस्तीनेच घेतला जातो. समोरच्याची इच्छा विचारण्याचा तर प्रश्नच नाही हो!

‘ननदबाई'( या पात्रावर वेळ काढून एका दिवशी स्पेशल लेख लिहितो!) नावाचे जे पात्र असते ते अत्यंत मानाचे आणि सन्मानाचे असते. मानही हा ती मागूनच घेते. तो मानही उसनाच असतो आणि सन्मान मिळाला हे सुद्धा तीच गावभर गाजावाजा करून सांगत असते. ही आल्यावर, गेल्यावर आणि घरी उगाच्या उगा राहिल्यावर कधीही आपल्या भावजयीकडून पाया पडून घेऊ शकते. ते तिला आवडते म्हणून नाही, किंवा तिला मान मिळावा म्हणून नाही तर एका स्त्रीलाच दुसऱ्या एका स्त्रीला असे कमी लेखून, स्वतःसमोर नाक घासवून अघोरी-असुरी आनंद मिळत असतो. हे करण्यात तिला मजा वाटते; आणि भावासाठी बहिणीचे कर्तव्य पार पाडले हे तिलाच वाटायला लागते. जेव्हा हीच ननद दुसऱ्या कोणाचीतरी भावजयी होते तेव्हा तिने केलेल्या छळाचा तिला पूर्ण विसर पडतो, हे सेटिंग नेमकी कशी काय जमते बुवा हे तर अजून मलाही कळलेले नाही.

मोठया लग्नकार्यात नवरीची भावजयी ओळखणे खूपच सोप्पे आहे. ज्या बाईच्या कपाळाला पावभर कुंकू असेल आणि जी सारखी हैराण,परेशान, घामागर्द दिसेल तीच बाई नवरीची भावजयी/वहिणी समजून घ्यायची. प्रत्येक लग्नात ही बाई अशी असते की ती दिसेल त्याच्या पाया पडत फिरते. तिला माणसांची तोंडे कमी पायच जास्त दिसतात. दिसला पाय की पडल्या पाया. पाया पडतानाही बोनस देतात तसे पुढच्या बाईला हळदी-कुंकू लावण्याचे अतिरिक्त काम करावेच लागते. एवढया गर्दीत जर ती एखाद्या बाईच्या पाया पडायला विसरली तर ती संबंधित बाई पाया पडणाऱ्या बाईच्या सासूच्या जवळ जाऊन “तुमची सून लई रग्गेल हाय माय!” म्हणायला अजिबात विसरत नाही. मग हिने दिवसभर 100 जणींच्या पाया पडल्या त्याचे बक्षीस तर सोडून द्या, ती एक बाई कशी विसरली याची चौकशी लागते. यात पुरुषांचा सहभाग हा नगण्य असतो. हा खेळ खेळायला स्त्रियांनाचा जास्त आवडतो, आणि त्या राबवतात कोणाला तर दुसऱ्या एका स्त्रीलाच! पुरुषांचा दोष काय तर ते दिसून दुर्लक्ष करतात इतकेच. कारण हे क्षेत्र आपले नाही म्हणून गप्प बसण्यातच ते समाधान मानतात.

नवरापण या महाकार्यात नक्कीच मागे नसतो. त्याला संधी मिळेल तेव्हा आपल्या बायकोकडून तो पाया पडून घेतो. हक्काने पाया पडवुन घ्यायचे असेल तर जगातील एकमेव बाई नाहीतर व्यक्ती ही त्याची बायकोच असते. इतर ठिकाणी यालाच लोकांचे पाय पडून कसे कामे करवून घ्यावी लागतात हे चांगलेच ठाऊक आहे. मग तिथे याच्या पाया कोण पडेल!

पाया पडण्याचे महत्व, आणि आपल्या जीवनातील त्याचे स्थान सांगणारे, असे बरेच लेख- काव्य माझ्या वाचनात आले. स्वतःला लेखक/कवी म्हणवून घेणाऱ्यांची मलाही कीव आली. यातून काय साध्य केले तर निव्वळ फालतू उदाहरणे-दाखले देऊन त्यांची पांचट कलाकृती पूर्ण केली इतकेच! स्त्री-पुरुष सारखेच म्हणायचे आणि बाईने याच्या पाया पडाव्यात, बाईने त्याच्या पाया पडाव्यात म्हणायचे. स्त्रीला सर्वोच स्थान देतो न आपण! मग हे स्थान काय पायावरच का? तिला ठरवू द्या न कोणाच्या पाया पडायच्या अन् कोणाच्या नाही ते. मग म्हणा! स्त्रीला आम्ही मान देतो म्हणून! पुरुषाला गळाभेट आणि बाईला थेट पायच! काय ही मानसिकता! याच गोष्टीला नको तिथे जोडून भावनेशी खेळत राहायचे, आणि कधी संपवूच न द्यायचं! आपलीच लेक, सून यांनाच छळायच, काही अर्थ आहे का या गोष्टीला?

मुळात पाया पडल्याने कुणी मोठे होत नाही, आणि कोणी लहानही! विषय आहे तो मर्जीचा! मर्जीचा,नामर्जीचा! वाडवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत, ही आपली संस्कृतीच सांगते. पण, वाडवडील हे काही वयाने मोठे झाले म्हणून वडीलधारे नाहीत, तर त्यांच्या अनुभवाने, अनुभवातून आलेल्या वैचारिकतेने आणि सामंजस्य भावनेने होतात; आणि नुसते केस पिकले म्हणून ते रुबाब दाखवून राबवत असतील तर ते फक्त म्हातारे झालेत! यापलीकडे काहीच नाही.

इज्जत कमवावी लागते, ती विकत मिळत नाही. भले अपमान फुकटात मिळेल पण फुकटात मिळालेला मान हा उसना असतो जो परत करावयाचा असतो; आणि जवळ ठेवला तरी तो क्षणभंगुरच असतो.

तुमच्या प्रेमाने वागण्याने, आपलेपणाच्या भावनेने मान-सन्मान मिळेल. तोही फुकट आणि कायमचा! मग सुनबाई पाया पडेल नाहीतर मोकळेपणाने हसेल. पण एवढं नक्की की तिचे हसणे,व नुसतेच तुमच्यात असणे तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.

पाय जोडून बसल्याने

काहीच मिळत नाही

मानही खाली झुकूनच राहतो

आपली तिला करून पहा कधी

तेव्हा…

अपमान तुमचा द्वेष करतो….

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी,नांदेड)मो:-8806721206