शहिदांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

21

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.17ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा ऑगस्ट 1942 मध्ये चिमूर (जि. चंद्रपूर) आणि आष्टी (जि.वर्धा) ही गावे तीन दिवस स्वतंत्र होती. मात्र इंग्रजांनी दडपशाहीचा अवलंब केला आणि नागरिकांना घरात कोंबून ठेवले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी चिमूरमध्ये 16 ऑगस्ट 1942 रोजी 16 वर्षीय बालाजी रायपूरकर हा तरुण इंग्रजांना समोरा गेला व छातीवर गोळ्या झेलत शहीद झाला. या शहिदांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे मत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

शहीद स्मृती दिनानिमित्त येथील शहीद स्मारकाला अभिवादन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार श्री. कोवे, न.प.मुख्याधिकारी गजानन भोयर, पोलिस उपअधिक्षक नितीन बगाटे, ठाणेदार श्री. शिंदे, जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे,धनराज मुंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, नागभीड तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जिल्हा सहकारी बँकचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, प्रा राम राऊत, भीमराव ठवरी, खेमराज मरस्कोले आदी उपस्थित होते.

9 ऑगस्ट 1942 ला क्रांती दिनी महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोनलाचा बिगुल फुंकला. 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंतांच्या विचारातून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली आणि चिमूर स्वतंत्र झाले. मात्र इंग्रजांनी तीन दिवस नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. इंग्रजांची दडपशाही रोखण्यासाठी बालाजी रायपूरकर व इतर नागरिक बाहेर पडले. यात बालाजी रायपुरकर शहीद झाले.

इंग्रजांच्या पारतंत्र्यात असतांना देशातील स्वतंत्र होणारे पहिले गाव म्हणून चिमूरचा इतिहास लिहिला गेला. विशेष म्हणजे बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा रेडीओद्वारे केली. इंग्रजांच्या जुलमी अत्याचारा विरुध्द लढण्याचे धाडस चिमूर आणि आष्टी या गावांनी केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले असून त्यांच्या सांडलेल्या रक्तामुळे आज आपण स्वातंत्र उपभोगत आहोत.

या शहिदांचे स्मरण करून त्यांचा त्याग, बलिदान, समर्पित भावना आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. चिमूर क्रांतीचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अजरामर पर्व आहे. त्याचे विस्मरण होता कामा नये. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि 16 ऑगस्टचा क्रांती दिन कायमस्वरुपी लक्षात ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी त्यांनी अभयंकर मैदानावर स्मारक परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

——

उपजिल्हा रुग्णालयात रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन

चिमूर क्रांती दिनानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम, वैद्यकीय अधिक्षक गो.वा. भगत, डॉ. अगडे, डॉ. गेडाम, डॉ. चौधरी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
——

🔸युवकांनी राजकारणात बदल घडविण्यासाठी सहभागी व्हावे-शिवानी वडेट्टीवार

 

स्वातंत्र्य चळवळीत काम करताना तत्कालीन युवकांनी जात-धर्म बाजूला सारून देशप्रेमाने प्रेरित होऊन काम केले, सद्या केंद्रातील सरकार जात व धर्माला प्रथम स्थान देऊन देशात अराजकता निर्माण करीत आहे, लोकशाही धोक्यात आणून धर्म धोक्यात असल्याचे सांगितले जाऊन युवकांची डोके भडकली जात आहे, युवक काँग्रेसचे माध्यमातून राजकारणात बदल घडवून आणला जावा असे वाटणाऱ्या युवकांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी आधार बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.

चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे वतीने आयोजित कार्यक्रमात मंचावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जि.प.सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे,धनराज मुंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, नागभीड तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जिल्हा सहकारी बँकचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, प्रा राम राऊत, भीमराव ठवरी, खेमराज मरस्कोले आदी उपस्थित होते.

चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप कावरे यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांग व विधवा महिलांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला,प्रवेश करणाऱ्यांची यादी बघितले तर भाजप कार्यकर्ते बहुसंख्येने स्पष्ट दिसून येते, यावेळी धनराज मुंगले, प्रा राम राऊत, गजानन बुटके, कृष्णा तपासे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माजी प्राचार्य सुधीर पोहनकर यांनी केले, कार्यक्रमातील नागरिकांची उपस्थिती लक्षवेधक होती.