वाघाच्या हल्ल्यात मुडझा येथील गुराखी जखमी

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19ऑगस्ट):-ब्रम्हपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मुडझा येथील जंगल परिसरात बोडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 216 मध्ये वाघाने एका गुराख्याला जखमी केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.यामध्ये मोना आत्माराम धानोरकर (वय 55) असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. मुडझा येथील मोना धानोरकर हा गुराखी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर अचानक हल्ला करून जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक नागोसे तसेच मुडझा येथील वनरक्षक पी.डब्ल्यू. दाते. व मने यांनी आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह जखमी गुराख्याला आरमोरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.मंगळवारी 17 आँगस्ट रोजी डोर्ली येथील गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र तयार झाले आहे.