माझ्या पापणीतील ओढ कळली असेल तर…

27

प्रिये,
ब-याच दिवसांनी तुला पत्र लिहित आहे त्याबद्दल मला माफ करशील…तू करशील ना गं मला माफ…तू कशी आहे? हे मी विचारू शकत नाही. कारण आता तेवढा अधिकार राहिलेला नाही, जेवढा आधी होता. तरी पण मला माहितच आहे तू कशी आहे तर? तू माझ्यापेक्षाही खूप गुणवंत आहे आणि तेवढीच समजदार…या गोष्टींचा जेवढा आनंद आहे तेवढंच दु:ख पण…परंतु ब-याच गोष्टींचा अजूनपर्यंत उलगडा झालेला नाही. मी उलगडण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. मी जसजसा प्रयत्न केला तसा अधिकच त्या कोड्यात गुंतत गेलो; पण कोडं सुटण्याचं काही नाव घेईना…

बरं असो! मी ब-याच गोष्टीत चुकलो. तुला काही गोष्टींची संधी दिली नाही आणि काही गोष्टींचं स्पष्टीकरण…त्याविषयी पण मला माफ करशील. अगं रडूबाई रडतेस कशाला? मी थोडी ना तुला दोष देत आहे. मला माहिती आहे ना माझ्या नशिबाचे वर्तुळ..! मग, मी का म्हणून माझ्या नशिबाचे दोष तुझ्यावर थोपवू…तुला एक गोष्ट सांगू..! तुझ्याप्रमाणे ब-याच लोकांनी माझ्याकडे पाठ फिरवली. त्यात माझे काही मित्र आणि माझ्या काही मानलेल्या बहिणी पण…काहिंनी तर मला गोष्टीही मारल्या की, मी स्वत:ला ग्रेट वगैरे समजतो म्हणून…माझ्या जवळच्या लोकांनी पण…खरं सांगू मी कधीच स्वत:ला ग्रेट समजत नाही आणि पुढच्या व्यक्तीला कमी पण लेखत नाही. उलट मीच कमीपणा मानतो. माझ्या शांततेचा आणि परिस्थितीचा ब-याच लोकांनी फायदा घेतलाय गं..!

आपल्या अबोल ‘रिलेशनशिप’ ला ब-याच दिवसांचा कालावधी लोटला गं..! किती छान दिवस होते गं ते? दिवसच काय तर रात्रही कशी जायची ते कळत नव्हतं? ते दिवस आठवले की, आपसुकच डोळे ओलावतात..! कारण त्या प्रत्येक दिवसातील प्रत्येक अनमोल क्षण आजही माझ्या ह्रदयात जशाचा तसा जपून आहे…तू मला एकदा प्रश्न केला होता की, माझ्या मनात या भावना निर्माण होण्यासाठी मी एकटीच जबाबदार आहे? पण मी कधीही तुलाच जबाबदार ठरविले का? ज्या काही भावना निर्माण झाल्या होत्या त्याला सर्वस्वी आपण दोघेही सारखेच जबाबदार आहोत ना गं..! अगं रडूबाई, असं एकाएकी अबोला धरून काय साध्य झालं गं…तूच विचार करून बघ ना…तुला जर तुझे स्वप्न पूर्ण करायचं होतं तर तसं मला सांगायला हवं होतं. मी तुझ्या स्वप्नांच्या आड आलोच नसतो. कारण आपण बोलत असतो तर तुझं अभ्यासात मन लागलं नसतं.

अभ्यासात मन लागलं नसतं तर साहजिकच तुझ्या स्वप्नांच्या आड अडचणी निर्माण झाल्या असत्या…आताही दु:ख वाटत असलं तरी ते दु:ख थोडं बाजूला सारलं तर तू तुझं स्वप्न साकार करते आहे. या आनंदाची एक हलकीशी झुळूक मनाला स्पर्शून जातं. कधी-कधी असाही विचार मनात येतो की, जे झालं ते चांगलंच झालं. कारण आपली परिस्थिती हलाखीची, त्यामुळे कशाला तुझं भविष्य उद्ध्वस्त करायचं?
कधी काळी असं वाटत होतं की, एका वडील नसलेल्या मुलीचा आपण आयुष्यभरासाठी आधारकर्ता बनलं…तिला वडिलांची उणीव भासू दिली नाही तर कधीतरी, कुठेतरी देवाची मर्जी आपल्याला लाभेल…म्हणजे यात कसलाही स्वार्थ नाही तर एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून निदान कृपाप्रसाद तरी लाभेल बस एवढंच…आपली परिस्थिती जरी हलाकीची असली तरी आपण खूप प्रेम तर देऊ शकतो…शिवाय आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं सुख…पण, म्हणतात ना स्वप्न ही कितीही आपुलकीने रंगविली तरी ती कधीच आपली होत नसतात. ते खरं आहे…अगं ए! तू परत रडते आहेस. हे बघ! मला प्रत्यय आला म्हणून मी सांगत आहे. मला तुला रडवायचं नव्हतं गं! आधी तू तुझ्या डोळ्यांत आलेले अश्रू थांबव बरं…तरंच मी पुढे बोलेन…नाहीतर मी इथेच थांबणार आहे. गुड! तू एकदा असंही म्हटलं होतं की, आपल्या दोघांचेही मार्ग वेगळे आहेत…मागिल काही दिवसांचा आढावा घेता खरंच तसंच आहे; पण त्यानंतर तू असं पण म्हटलं…
काही बंधने तर
काहीसं अंतर आहे
ध्येयाची कास नि
वळणावर साथ हवी आहे
हे बघ! आपल्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे जरी असले तरी तुझ्या प्रत्येक वळणावर मी साथ देईल. फरक एवढाच राहील की, नातं बदललेलं असेल. म्हणजे यदाकदाचित तू तुझा संसार थाटला असेल किंवा थाटणार असेल तेव्हा मला तुझा प्रियकर म्हणून साथ देता येणार नाही…तर एक मित्र म्हणून नक्कीच साथ देईन. त्यानंतर लगेच तू असंहीY म्हटलं होतं…

माझ्या पापणीतील ओढ कळली असेल तर माझ्याजवळ येण्याची वाटही खुली आहे..!रडूबाई, एकदा तुझ्या मनालाच विचारून बघ ना! तुझ्या पापणीतील ओढ मला कळली नसेल का? कळणार नाही असं कधी झालंय का? राहिला प्रश्न तुझ्याजवळ येण्याचा तर मला माहित आहे तुझ्याजवळ येण्याची वाट माझ्यासाठी मोकळी आहे; पण मी चौफुलीवर उभा आहे…त्यामुळे मला नेमकी वाट गवसत नाही आहे. कारण तू कोणत्या वाटेवर आहे? हा एक संभ्रम आहे ना! म्हणून इच्छा असूनसुध्दा येऊ शकत नाही. नाही तर मी कधीचाच आलो असतो.आता शेवटचं हं! माझा जास्त विचार करू नको? माझी काळजी करू नकोस? मी अगदी मजेत आहे…तू फक्त स्वत:कडे लक्ष दे..! आणि खूप मेहनत कर नि यशाचं उंच शिखर गाठ…जेणेकरून सर्वजण तुला प्रणाम करतील. मू त्याच क्षणाची वाट बघत आहे. कारण त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होईल…जर असं झालं तर निश्चितच तुला माझ्यापेक्षाही चांगली व्यक्ती जीवनसाथी म्हणून मिळेल. तुला तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी नि भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली, यवतमाळ)भ्रमणध्वनी-7057185479