पर्यावरणाचा-हास करत मानस तलावात बेकायदेशीरपणे उत्खनन सुरु आंग्रेवाडी, भुकूम व भुगाव येथील शेतकरी हवालदिल

🔸उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे नाव वापरून मिळवला अनधिकृत परवाना

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4सप्टेंबर):- उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे नाव वापरून अनधिकृत परवाना मिळवून मानस तलावात उत्खनन करत बेकादेशीरपणे भराव टाकला जात आहे. पुणे जिल्ह्यातील भुकूम व भुगाव येथील ग्रामस्थांची व शासनाची शिवाजी पाडाळे नामक व्यक्तीने भुगाव ते आंग्रेवाडी रस्ता बांधकाम व बेकायदेशीर परवान्याचा घेवून मानस तलवामध्ये अनधिकृतपणे उत्खनन करत भराव टाकून रस्ता करत आहे. सदरील व्यक्तिने फसवणूक करून अजित पवार व खा सुप्रिया सुळे यांची नावे सांगून दबाव तंत्राचा वापर केल्या संदर्भात भुकुम ग्रामपंचयत या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेस भुकुम गावच्या सरपंच रेखा वाघ, भूगावच्या सरपंच निकिता सणस, उपसरपंच सचिन आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हगवणे, निलेश ननवरे, अंकुश खाटपे, सुवर्णा आंग्रे, अर्चना सुर्वे, शेतकरी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

भुकुम गावच्या सरपंच रेखा वाघ या वेळी बोलताना म्हणाल्या की दुष्काळी परिस्थितीत सन 1972 साली भुकुम व भूगाव परिसरातील नागरिकांनी श्रमदानातून हा जलाशय तलाव तयार केला आहे . तो सध्या मानस तलाव या नावाने ओळखला जातो. या मानस तलावाच्या आजूबाजूला भुकूम ,भुगाव व आंग्रेवाडी ही गावे वसलेली असून तलावाचा पाणीपुरवठा या गावांना केला जातो गावची लोकसंख्या 35 ते 40 हजार असून भुकम गावची लोकसंख्या दहा ते पंधरा हजार आहे. सध्या येथे शहरीकरण वाढत आहे. भुगाव, भुकुम व आंग्रेवाडी दळणवळण करण्यासाठी ग्रामस्थांनी भुगाव ते आंग्रेवाडी जाण्याकरता या तलावाला वळसा घालून रस्ता तयार केला असून सर्व ग्रामस्थ या रस्त्याचा येण्या-जाण्यासाठी वापर करत आहेत .या रस्त्याची देखभाल दोन्ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद करत आहे. या ग्रामस्थांना त्यामुळे भुगाव ते आंग्रेवाडी येथे येण्या-जाण्यासाठी कोणत्याही पर्यायी रस्त्याची आवश्यकता नाही. त्या पुढे म्हणाल्या की शिवाजी मुरलीधर पाडाळे या व्यक्तीने भुकूम गट नंबर 313 व 338 येथे वादाअंकित क्षेत्र असून त्यांना त्यांच्या खाजगी क्षेत्रामध्ये येण्या-जाण्यासाठी या तलावाच्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात नसलेला रस्ता अस्तित्वात असल्याची खोटी माहिती सादर करून भुगाव येथील ग्रामस्थ व शासनाची फसवणूक केली आहे .या बेकायदेशीर प्राप्त केलेल्या परवान्याच्या आधारावर शिवाजी मुरलीधर पाडाळे यांनी या निसर्गरम्य मानस तलावांमध्ये दिनांक 5 मे 2021 रोजी बेकायदेशीरपणे मुरमाचा भराव करून निसर्गाचा ऱ्हास करावयास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

भुकुमचे उपसरपंच सचिन आंग्रे याबाबत बोलताना म्हणाले की गेल्या पाच वर्षापासून दोन्ही ग्रामपंचायतींनी गाळ काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. शिवाजी पाडाळे यांनी तलावातून रस्ता नेण्यापेक्षा ग्रामपंचायात व जिल्हा परिषदेने तयार केलेला रस्ता वापरावा अशी दोन्ही ग्रामपंचायतींची मागणी आहे. शिवाजी पाडाळे यांनी तलावांमध्ये करीत असलेल्या बेकायदेशीर भरावामुळे शेतक-यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.या बेकायदेशीर कृत्यामुळे तलावांमधील पाणी अडवून पाण्याची पातळी वाढविण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो व प्रसंगी जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व जलसंपदा विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन बांधकामाचा परवाना संदर्भ क्रमांक 5 अन्वये स्थगित करण्यात आला होता.

मात्र हा सदरील रस्ता बांधकाम व नाला पूल बांधकाम हे बेकायदेशीर व ग्रामस्थांच्या जीवितास धोकादायक असले बाबत जिल्हा परिषद व जलसंपदा विभाग यांच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून देखील जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शिवाजी मधुकर पाडाळे यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यास बांधकामाची परवानगी देत आहेत. आम्हाला न्याय नाही मिळालातर आम्ही आंग्रेवाडी, भुकूम व भुगाव या दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत.

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED