चंद्रपुरात पार पडला सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा

🔸दोन्ही नवदांपत्यांनी घेतला नेत्रदानाचा संकल्प

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):-लग्न म्हटलं की सर्व रुढी परंपरा पार पाडल्या जातात मात्र, चंद्रपूर शहरात लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने एक अनोखा लग्न सोहळा पार पडला.मंगलाष्टक ऐवजी फुलांच्या अक्षता, पुस्तकांची भेट,साऊ जोती असा आगळा वेगळा विवाह चंद्रपूर शहरात संपन्न झाला.समाजहिताचे उपक्रम राबवुन समाजाला नेत्रदान वृक्षारोपण, तसेच नागरिकांना कोविड-19 काळातील जनजागृती याबद्दलचे महत्व कळावे म्हणुन एक आगळा वेगळा विवाह सोहळा चंद्रपूर शहरात पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रोशन भास्कर रावेरकर आणि चंद्रपूर येथील श्वेता दिनेश कोवे यांचा विवाह निश्चित झाला, पण हा विवाह सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय दोन्ही नवदांपत्यांनी घेतला. या उच्चशिक्षित जोडप्यांनी सर्व रुढी परंपरांना बाजूला सारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मार्गाने नव्या संसाराची सुरुवात करत पोलीस सभागृह, चंद्रपूर येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला.

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आदिवासीचे जननायक बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके व राणी हिराई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून लग्न विधीच्या कार्याला सुरुवात झाली. दोन्ही नवदांपत्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. वृक्षारोपण तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने पत्रके वाटून कोरोना जागृतीचा सामाजिक संदेशही देण्यात आला.यावेळी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. जि.एल.दुधे, नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके, आॅफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, धिरज मेश्राम, अनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED