पोळा : महाराष्ट्राचा शेतीशी संबंधित सण!

24

(बैलपोळा सण विशेष)

यंदाच्या सन २०२१ साली कोरोना महामारीच्या मृत्युतांडवात शेतकरी राजाचे प्रियजन दगावले. पावसानेही ऐनवेळी दगा दिल्याने कोरडा दुष्काळ डोक्याच्या वर घिरट्या घालत आहे. मनीमानसी नाराजीचे सावट असले तरीही तो आपल्या खऱ्या सोबत्यास सजवून पोळा साजरा करणारच! पूर्वापर चालत आलेली कृतज्ञ भावाची परंपरा एकाएकी तो कसा काय मोडित काढेल? कोरोनाचे सर्व नियम पाळत यंदाही राजा-सर्जास नमन करण्यास सांबसदाशिव अगदी उत्सुक आहे, तेही झडती ठोकत!

“वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,
महादेव रडे दोन पैश्यासाठी।
पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,
देव कवा धावल गरिबांसाठी?”
एक नमन गौरा परबती हर बोला, हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..!

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा या सीमावर्ती भागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा’ होय. म्हणून आनंदाने गाणे गातात-

“अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला।
कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला।।”

हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण-आवतण देण्यात येते. पहाटेला त्यांना नदीवर वा ओढ्यात नेऊन आंघोळ घालून देतात. नंतर चरू देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला- मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला ‘खांद शेकणे’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल- पाठीवर घालायची शाल पांघरून घालतात. बैलांच्या सर्वांगावर भांड्याने गेरू, हळद व कुंकवाचे गोल ठिपके मारतात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा बांधतात. त्यास नवी वेसण, नवा कासरा- आवरायची दोरी, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या बलकी वा बैलकरी- घरगड्यास नवीन कपडे शिवून दिले जातात. झडती अभ्यासू-

“पोया रे पोया, बैलाचा पोया!
तुरीच्या दायीन, मारला हो डोया!
कांद्याने आमचे, केले हो वांदे!
ऊसवाला बाप, ढसा ढसा रडे!”

एक नमन कवडा पारबती हर बोला, हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..!
या सणाला शेतकऱ्यांमध्ये खुप उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतात, आखरावर, शिवालयासमोर किंवा मुख्य चौकात आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस झडत्या व पोळ्याची गीते म्हणण्याची पद्धत आहे-

“आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा!
हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा!
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार!”
(पैशाचिक सन : बहिणाबाई चौधरी.)

त्यानंतर मानवाईक- ज्याला गावात मान आहे तो, गावचा पाटील वा श्रीमंत जमीनदार ते तोरण तोडतो व पोळा फुटतो. नंतर बैलांना मारुतीच्या देवळास प्रदक्षिणा घालावयास नेतात व नंतर घरी घेऊन जातात. घरी गेल्यावर त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास ‘बोजारा’ म्हणून पैसे देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो आतिव उत्साहाने गीत गात साजरा करण्यात येतो-

“शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली.
चढविल्या झुली, ऐनेदार।
सण एक दिन, बाकी वर्षभर.
ओझे मर मर, वाहायाचे!”
(सण एक दिन : कवी यशवंत.)

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो. सांप्रतकाळी बळीराज आधुनिक यंत्रेतंत्रे वापरत आहे. बैलांचा त्रास कमी करत आहे. त्यामुळे गाईगुरांची संख्या कमी होत आहे. पुढे तो ट्रॅक्टरपोळा जरी साजरा करू लागला तरी त्याला बैलांची आठवण उद्विग्न- बेचैन करेल, हे मात्र नक्की!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
[भारतीय सण-उत्सवांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व मराठी साहित्यिक]मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.ता. आरमोरी, जि. गडचिरोली.मधुभाष- ७७७५०४१०८६