मी ‘म्हातारा’ झालो म्हणून….!

19

श्रावणातील सोमवार एकामागून एक संपत गेले
वाट पाहिली ते कधी सम्पतील याची
या म्हाताऱ्या बैलाने खुट्ट्यावर पडून
वर्षातले 364 दिवस गेले असेच काठावर
बैल पोळा येईल या एकाच आशेवर…

खुट्ट्यालाही मी जरा जडच झालो
हालत नाही म्हणे दिवसभर कसाच
खुट्टाच जाग्यावर बसून आळसावला
इतका तोही मंद झाला..

दातही आले किडीला
सांध इतकी पडली त्यात
आरपार दिसणारा दुर्बिणीचा
गोल घेरा जसा…

चारा खायला कुठे उरतो पहिल्यासारखा
हिरवे खावे म्हटले कधीतरी
कोरडा चुराडाच माझ्या नशिबाला

खांदे झिजले माझे
जिंदगीभर माल तुमचा वाहून
ढिले पडले इतके
बसली माशी दिवसभर जरी त्यावर
हालत नाहीत कसेच
हिसका द्यायची रगच गेली सरून…

मालक येता जाता 
रोज पाहतो माझ्याकडे
जागा भरून असली तरी
रिकामीच दिसते त्याला गडे…

म्हातारा होऊन अनुभव घेतले असतील खूप
मुकाच मी! बैल थकलेला..
कोणाला काय अन् कसे सांगू…

डॉक्टर येतात पाहायला कधी मधी
नातवंडांना माझ्या….
नवी आशा, नवी उमेद 
आहेत न घरधन्याचे ते…
आमच्याकडे पाहतेच कोण आता
उरलेले मोजके दिवस जाताहेत खुट्ट्यावर पडून
काम होत नाही म्हणून काय झाले
मलाही सहन होत नाही हे
दुर्लक्षित करते माझेच लेकरू..

बैलपोळा आल्यावर नैवेद्य गोड येईल खायला
रात्र होता अंधार पडता
364 दिवसाचे कारागृह माझे पुन्हा सुरू…

✒️अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:-8806721206)