द्वितीय रघुजीराजे भोसले आणि तान्हापोळा!

[तान्हापोळा बालानंद पर्वणी विशेष]

हल्ली तान्हापोळा विविध मनोरंजक खेळ, स्पर्धा व कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होऊ लागला आहे. त्यातील काही ठळक- नंदीबैल पूजन, नंदीबैल सजावट स्पर्धा, बालक रंग व वेशभूषा स्पर्धा, नृत्य व गायन स्पर्धा आदी आहेत. मात्र वैदर्भीय बालकांना कोरोना प्रादुर्भावामुळे मागील सन २०२० व यंदा २०२१ या दोन वर्षांत कला कौशल्यवर्धक अभिव्यक्तिंना मुकावे लागले. याचे शल्य मनाला बोचत आहे. तान्हापोळा उत्तरोत्तर असा बालप्रिय होत आला, यावरील हा काही नूतन झडत्यासह विशेष लेख…_

“आम्ही करतो पऱ्हाटीची शेती, पऱ्हाटीवर पडली बोंड अळी।
नागोबुढा म्हणते बुडाली शेती, पोरगा म्हणते लाव मातीले छाती।”

एक नमन गौरा पारबती हर बोला, हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..!
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्र व त्यातल्या त्यात विदर्भात पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते. लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौसमजेसाठी ‘तान्हापोळा’ साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेला नंदीबैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच त्यांचा पोळा साजरा करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो. तान्हापोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. या सणाबाबत फारसा उल्लेख दिसत नाही. लहाने मुले या दिवशी लाकडी किंवा मातीच्या बैलांना सजवून देवळासमोर वा चौकात घेऊन येतात. तेथे झडत्या म्हणतात व शेवटी शंकराची आरती करून तान्हापोळा फोडला जातो. तेच नंदीबैल घेऊन मुले घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केला जातो. यामुळे लहान मुलांनाही बैलांविषयी कृतज्ञता आणि पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन होऊ लागते. एक खुसखुशीत झडती-

“जो तो जाये कॉन्व्हेंटकडे, मराठी वाचतानी अडखळे।
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे, अगाऊ कामानं मास्तर होये वेडे।
त्यायलेच पहा लागते खिचडीतले कीडे, कोणत्याही कामात मास्तरलेच वढे।बिनाकामाच्या कामानं मोडे कंबरडे।।”
एक नमन गौरा पारबती हरबोला हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..!

त्या साली यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय व उद्योगास लागली होती. इ.स.१८०६च्या काळात रघुजीराजे भोसले द्वितीय राजगादीवर होते. ते काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीला लागले होते. ते तसे शेतीला जीव लावणारे राजे होते, शेतकऱ्यांवर अपार माया करणारे होते. कलाप्रेम व सर्जनशिलतेचा गौरव हे त्यांच्यातील विशेष गुण होते. याच रसिकतेतून त्यांनी नागपूर शहरात तेलंगखेडीसारख्या अनेक बागा फुलविल्या. शेती व शेतकरी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीकडे ते केवळ व्यवसाय किंवा उद्योगच म्हणून पाहत नव्हते. तर ती त्यांच्यासाठी एक परंपरा व संस्कृती होती. ही परंपरा व संस्कृती नव्या पिढीनेदेखील जोपासली पाहिजे, असा त्यांचा आग्रह व प्रयत्न असायचा. चटकदार झडती-

“चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा!
पवनगडाहून आणली माती, थे दिली गुरूच्या हाती!
गुरूने बनविली चकती, दे माझ्या बेलाच्या झाडा!
मग जा आपल्या घरा…!”
एक नमन गौरा पारबती हर बोला, हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..!

यातूनच हा मुलांच्या आनंदोत्सवाचा सण तान्हापोळा उदयास आला. शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी तन, मन, धनाने समर्पित होऊन शेतात आपले श्रम व समाधान रुजवत होते. त्या काळी शेती ही श्रेष्ठच होती. या देशात अनेक उत्सव पिकांसारखे शेतीतूनच फुललेत. मोठी माणसे मातीला जीव लावत असत. शेतीशी जुळलेले सर्वच घटक त्यांचे जीव की प्राण असायचे. त्यातील एक म्हणजे बैल, गाय व वासरू होय. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सणदेखील याच शेतीपरंपरेतूनच आलेला आहे. रघुजीराजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकराजे होते. नव्या पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्याप्रती आस्था व रुची वाढावी म्हणून त्यांनी सन १८०६ सालीच तान्हापोळा सुरू केला. श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात पोळा साजरा होतो. भारतभर विविधपद्धतीने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात. खरेखुरे मोठमोठाले बैल घेऊन शेतकरी हा सण आजही साजरे करतात. यात लहान मुलांचा यत्किंचितही सहभाग नसतो. ते बिचारे फक्त बघेच असतात. महाराजांना यातून एक कल्पना सुचली. त्यांनी लगेच ती अमलातही आणली व ती यशस्वी करून दाखविली. लहान मुलांसाठी त्यांनी तान्हापोळा सुरू केला. मोठा बैल लहान लेकरांना सांभाळणे जीवावरचे असते.

मग काय करायचं? तर त्यांनी लाकडाचा बैल तयार करवून घेतला. नागपूरातील तेव्हाचे काष्ठशिल्पकार कायरकर यांच्याकडून खऱ्या बैलांएवढा लाकडाचा बैल त्यांनी बनवून घेतला. जसा मोठ्या बैलांना घेऊन पोळा साजरा करतात, तसाच हा उत्सव त्यांनी सुरू केला. या लाकडी बैलांना चाके लावली. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. समोर मशाली घेतलेले घोडे होते. अर्थात तेही लाकडाचेच बरं का? मोठ्या पोळ्यातील सर्वच गोष्टी तान्हापोळ्यात सुरू केल्यात. जशी ही झडती-

“अबार गडगडे, शिंग फडफडे।।
शिंगास पडले किडे, तुझी माय तै काढे।।
तेलातले वडे, तुझा बाप खाये पेढे।।”
एक नमन गौरा पारबती हर बोला, हरहरऽऽ.. महादेवऽऽऽ..

बैलांची पूजा वगैरे झाल्यावर ‘’पोळा फुटला’ अशी दवंडी दिली जायची. पोळा फुटल्यावर पुन्हा मिरवणूक काढली जायची. हा उत्सव खास लहान मुलांसाठी असायचा. मग महाराज लहान मुलांना मिठाई व भेटवस्तू देत असत. त्यामुळे मुलांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच ठरली आहे. मात्र ही पर्वणी मागील सन २०२०पासून कोरोनारूपी राक्षसाने पळवून लावली आहे, हे विशेष!

!! समस्त लाडक्या चिमुकल्यांची ‘तान्हापोळा’ ही आनंदोत्सव पर्वणी चिरायु होवो !!

✒️संकलक व शब्दयोजना:-श्री एन. के.कुमार जी(से.नि.प्राथ.शिक्षक).मु. पोटेगावरोड, पॉवर हाऊसच्या मागे, गडचिरोली.जि. गडचिरोली- ४४२६०५.फक्त व्हा. नं.९४२३७१४८८३.

मनोरंजन, महाराष्ट्र, लेख, सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED