बीड जिल्ह्याला पावसाने झोडपले

48

🔹नद्यानाल्यांना महापूर,पिकांचे मोठे नुकसान

✒️बीड,विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6सप्टेंबर):- तालुक्यात शनिवार रात्री म्हणजे ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून जवळपास सर्वच तलाव भरले आहेत.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.शिराळ येथे नदीला अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याचे तर धानोरा येथे ही कांबळी प्रकल्प पूर्णपणे भरला आहे.गेल्या दोन दिवसापासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.या पावसामुळे आष्टी तालुक्यातील सर्व तलाव तुडुंब भरले असून सर्व नद्यांना पूर आला आहे.देवी निमगाव हा तलाव शंभर टक्के भरला असून नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठच्या काही कुटुंबाच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बीड,आष्टी,पाटोदा,गेवराई,माजलगाव,केजसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प भरले आहेत.अनेक गावांचा संपर्क तूटला गेला.अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नदी-नाले तुडुंब भरल्यामुळे पाणीप्रश्न या वर्षी तरी सुटणार आहे.सोयाबीन,तूर,उडीद यासारखी पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.शनिवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी देखील होत असल्यामुळे आणखी किती नुकसान होईल हे सांगणे अवघड झाले आहे.पावसाने पून्हा एकदा गेवराई तालुक्यातील विविध भागाला अक्षरश झोडपून काढले असून,शनिवार ता.४ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे.तालुक्यातील राज्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात झाली होती.पाण्याचा विसर्ग वाढल्याने वाहनधारकांना रात्रभर मुसळधार पावसात रात्र जागून काढावी लागली.

रस्त्यावरचे पूल वाहून गेलेत.त्यामुळे,रविवार ता.५ रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद होती.सहा लघू प्रकल्प पूर्णपणे भरून वाहत आहेत.अनेक गावांचा संपर्क तुटला असून,शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे.ऐन भरात आलेली पिके पाण्यात बुडून झोपी गेल्याचे विदारक चित्र आहे.शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती.सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता.काही वेळातच पावसाने जोर धरला आणि रस्त्यावर पाणीच पाणी झाले.नदी,नाले,ओढे खळखळून वाहू लागले.पावसाच्या रौद्ररुपाने गेवराई तालुक्यातील सातही लघुप्रकल्प तुडूंब भरले असून नदी,नाले तसेच अमृता नदी,गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे.राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर पाण्याखाली गेले आहे.भोजगाव येथे अमृता नदीचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

गोदावरीला आपेगाव-हिरपुरी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.तालुक्यातील नद्यातून जाणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे.यामुळे गोदाकाठी असलेल्या राजापूरला पुन्हा एकदा पाण्याने वेढा घातला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.जनजीवन विस्कळीत झाले असून,सखल भागात शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे,गेल्याच आठवड्यात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.शनिवारी पून्हा पावसाने जोरदार हजेरी लावली.धोंडराई ता.गेवराई येथील अमृता नदी दुथडी भरुन वाहत आहे.येथील पुलावरून पाणी वाहिल्याने रात्री अकरा वाजल्यापासून रहदारी बंद होती.नदीकाठावरील अनेक गावात पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेवराई-शेवगांव महामार्ग हा अमृता नदीच्या पुरामुळे बंद झाला आहे.पुलावरून सात ते आठ फुट पाणी वाहत असल्याने रात्रीपासून हा मार्ग ठप्प आहे.रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या आहेत.तालुक्यातील लहान मोठ्या नदी,नाल्यांना पूर आला आहे.तालुक्यातील भोजगाव – राजापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला असून,गेवराई – शेवगांव राज्य मार्गावरील वाहतूक रविवारी सकाळ पर्यंत बंद होती.वाहनांच्या दुतर्फा रांगाच – रांगा लागल्या होत्या.गेवराई शहरा व परिसरातील पाझर तलाव एकाच रात्रीत तुडुंब भरून वाहत होते.