३०० शेतकरी व सर्जा राजा यांचा झाला सन्मान…

28

🔹बैलपोळा साजरा करण्याची “विकल्प” ची अभिनव संकल्पना…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.6सप्टेंबर):– आज बैलपोळा सणानिमित्त शेतकरी व सर्जा राजा सन्मान सोहळा २०२१ अतिशय उत्साहात संपन्न झाला. विकल्प ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे आयोजित हा कृतज्ञता सोहळा श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी यांच्या अनमोल सौजन्याने संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव शहरात बैलपोळा सणाचे औचित्य साधून विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या तर्फे आयोजित शेतकरी व सर्जा राजा सन्मान सोहळा २०२१ अतिशय थाटामाटात संपन्न झाला. भारतीय कृषीव्यवस्थेचा मूलभूत आधार म्हणजे शेतकरी आणि या शेतकऱ्यांचा खरा साथीदार सर्जा राजा म्हणजेच बैल यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बैलांना खापर वरील पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. तसेच बैलजोडी चे मालक म्हणजेच शेतकरी बांधवांना बागायतदार रुमाल (गमछा), टोपी, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एवढंच नव्हे तर सत्काराचे साहित्य ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांची देखील वितरण व्यवस्था करण्यात आली होती. बैलपोळा सणानिमित्त असा अनोखा कृतज्ञता सोहळा शहरात पहिल्यांदाच होत असल्याची भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.

या कृतज्ञता सोहळ्यात ३०० जोडी बैल आणि ३०० शेतकऱ्यांना सन्मानित करून बळीराजा व सर्जा राजा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “ईडा पिळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” या उक्तीला सार्थ ठरविण्यासाठी शेतकरी व सर्जा राजा यांचा सन्मान कृषी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, अध्यात्म, उद्योग, वाणिज्य व व्यापार, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी व न्याय, क्रीडा, कला, साहित्य, मनोरंजन, श्रमिक व कष्टकरी, कायदा व सुव्यवस्था, शासन – प्रशासन इ. नानाविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने पीकपाणी जोमात आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. या सर्व प्रसन्न वातावरणात विकल्प तर्फे आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काही सांगून जात होता.

या दरम्यान वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिक जास्त प्रमाणात खुलून आला. विकल्प ऑर्गनायझेशन कडून हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जाणार असून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा संस्थेचा मुख्य मानस आहे त्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन येत्या काळामध्ये केले जाणार आहे.अतिथी मान्यवरांमध्ये श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी चे संचालक नयनशेठ चिमणलाल गुजराथी, जिवनसिंह कडुसिंह बयस, सुरेश सिताराम चौधरी (माजी नगराध्यक्ष धरणगाव), यांच्या हस्ते शेतकऱ्यांना व सर्जा राजाला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ राजकीय नेते डी जी पाटील देखील उपस्थित होते.

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचाही संस्थेचा वतीने सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी एपीआय गणेश अहिरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुआप्पा चौधरी, पांडुरंग मराठे (मोठा भाऊ), मोहनआण्णा पाटील, लोकमत चे पत्रकार आर. डी. महाजन, पूनमचंद बाविस्कर, चंदन पाटील, आराधना हॉस्पिटल चे डॉ. धिरज पाटील, नाना महाराज, नामदेव मराठे, प्रफुल्ल पवार, परशुराम पाटील, राजू पाटील (फोटोग्राफी), जगदंबा टेंट अँड डीजे चे गोकुळ पाटील, दादू पाटील, हिम्मत महाजन, नितीन मराठे, गोलू भाचा, गणेश पाटील, संदीप गायकवाड, किरण अग्निहोत्री, गजानन साठे, इ. मान्यवर तसेच विकल्प ऑर्गनायझेशन चे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यासाठी श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी, धरणगाव यांचे अनमोल सौजन्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिवलाल मराठे, सचिव नरेंद्र सुभाष पाटील, उपाध्यक्ष अमोल सखाराम महाजन, सहसचिव गणेश चुडामण चौधरी, कोषाध्यक्ष योगेश निंबाशेठ सोनार, कार्यक्रम समन्वयक लक्ष्मण प्रभाकर पाटील आदींनी परिश्रम घेतले.