सुरेश डांगे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

10

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6सप्टेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ तीन दशकांपासून झाडीपट्टीतील कवी,लेखकांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध करुन देऊन सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.नवोदित तथा प्रतिथयश साहित्यिकांचे साहित्य सर्वदूर पोहचविण्याचे महत्कार्य झाडीबोली साहित्य मंडळ करित आहे.झाडीबोलीच्या उत्थानासाठी कार्यरत झाडीबोलीतील साहित्यिक शिक्षकांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार या वर्षीपासून सुरु करण्यात आला.जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून प्रत्येकी एका शिक्षक साहित्यिकाची झाडी शब्दसाधक पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.चिमूर तालुक्यातून कवी,लेखक सुरेश डांगे यांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

सुरेश डांगे यांची पुस्तके प्रकाशित असून झाडीबोली साहित्य मंडळ,शिक्षक साहित्य संमेलन संस्था,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण या संस्थांच्या माध्यमातून अनेक कविसंमेलनांचे आयोजन केले आहे.पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे चिमूर येथे आयोजन करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.गोंदिया येथे संपन्न झालेल्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक शिक्षक साहित्यिकांना संधी उपलब्ध करुन दिली.त्यांनी काही ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. झाडीबोलीच्या प्रसारासाठी त्यांनी झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत.शिक्षक भारती या संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

मूल येथील पंचायत समिती सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती सदस्य बंडोपंत बोढेकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे,अध्यक्ष डॉ.गुरुप्रसाद पाकमोडे,मूल नगरपरिषद अध्यक्षा रत्नमाला भोयर यांचे हस्ते सुरेश डांगे यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी गट विकास अधिकारी डॉ.मयूर कळसे डॉ.चंद्रकांत लेनगुरे,सुनिल शेरकी,विलास निंभोरकर, शशिकला गावतुरे,अरुण झगडकर,लक्ष्मन खोब्रागडे आदी उपस्थित होते.