समस्याचे मुळ शोधणारा पत्रकार- जयंत पवार

▪️भावपूर्ण श्रद्धांजली

असंघटीत कष्टकरी कामगारांच्या समस्यावर सतत लिहणारा, शोध पत्रकारिता करणारे संवेदनशील लेखक, पत्रकार, नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्या आत गेले. शिक्षण आणि नोकरी असा संघर्षमय प्रवास करणारे अनेक लोक असतात. पण जे गोरगरिबांना न्याय,हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी लढणाऱ्यासोबत उभे राहु शकत नाही.ते आपली लेखणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चालवतात. गिरणगावात राहून गिरणी कामगारांचे जगणे उघडया डोळ्याने पाहत असतांना संवेदनशील मनाचे जयंत पवार त्यांची नोंद घ्याला सुरवात करतात. शिरोडकर शाळा आणि महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळामध्ये त्यांनी लेख,कविता,एकांकिका लिहायला सुरुवात केली होती.

त्यांच्या ‘निनाद’ या एकांकिका संग्रहातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळाले. जवंत पवार यांनी गिरणीमध्ये काम करत व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. लोअर परळ येथील बालपण, गिरणीमधील कामाचा अनुभव त्यांच्या साहित्यामध्ये उमटला. गिरणीमध्ये त्यांनी फार काळ नोकरी केली नाही. पदवी शिक्षण आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सुरू केली. ‘चंदेरी’ पाक्षिक हा त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासातील पहिला टप्पा. त्यानंतर आपलं महानगर, सकाळ, लोकसत्ता दैनिकांमध्येही त्यांनी नोकरी केली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोबत त्यांचा प्रवास सर्वात दीर्घ ठरला. ‘मटा’ मधून ते २०१८ मध्ये निवृत्त झाले. ‘मटा’ मधून प्रसिद्ध होणारे त्यांचे ‘चौथी भिंत’ हे नाट्यसमीक्षण विषयक सदर नव्या-जुन्या रंगकर्मींसाठी अभ्यासनीय होते.

असंघटीत कष्टकरी कामगारा बाबत त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणनू खूप कळवला होती.म्हणूनच ते असंघटीत कष्टकरी कामगारांचे जीवनमान समजून घेण्यासाठी समस्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत होते.यामुळे त्यांनी माझा शोध घेतला.मी मुंबईतील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या असंघटीत कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचा प्रमुख होतो.त्याच बरोबर असंघटीत कामगारासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनाची कृतीसमिती होती तिला आम्ही असंघटीत कामगार सुरक्षा परिषद हे नांव दिले होते. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६,THE BUILDING AND OTHER CONSTRUCTION WORKERS’ (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT,19961.बिल मजूर झाले.

त्याची अंमलबजावणी २००८ पर्यत सुरु झाली नव्हती.त्या करिता अनेक संघटनेनी संघर्ष केला आहे.त्यात मी माझी सत्यशोधक कामगार संघटना १९८२ पासून मुंबईतील नाक्या नाक्यावर असंघटीत कामगारांना संघटीत करण्याचा संघर्षशील प्रयत्न करीत होतो.त्याची मान्यताप्राप्त दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांनी नोंद घेतली होती. प्रभाकर नारकर,प्रतिमा जोशी यांनी अधूनमधून दखल घेऊन बातम्या देत होते,पण जयंत पवार यांनी जी दखल घेतली ती लक्षवेधी प्रेरणादायी होती.त्यावेळी त्यातील समस्याचे मुळ शोधणारा पत्रकार पाहायला मिळाला, मुंबईतील अनेक नाक्यावर हजारो नाका कामगार सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत कामाच्या शोधत नाक्यावर उभे असतात.जयंत पवार यांना ते कोण आहेत?.कुठून आले आणि कुठे राहतात?. यांची माहिती हवी होती.त्यासाठी प्रत्येक्षात त्यांना भेटून चर्चा करायची होती. त्यासाठी त्यांना योग्य माणूस हवा होता,नाक्यावर कोणी माहीत देत नाही,ते घाबरतात किंवा खोटी माहिती देतात,त्यासाठी त्यांनी अनेकांना संपर्क केला, नाक्यावरील कामगारांनी त्यांना संघटनेच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यास सांगितले.

त्यावेळी अनेकांच्या तोडून एकच नांव सांगितल्या गेले ते म्हणजे सत्यशोधक कामगार संघटनेचे सागर तायडे,आजच्या सारख्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल नव्हता, त्यावेळी पत्ता शोधून भेट घ्यावी लागत होती. कार्यकर्त्यांचे भेटण्याचे ठिकाण दादरचे छबिलदास शाळा हे संध्याकाळी सहा वाजता ठरलेले होते.तेव्हा जयंत पवार यांनी माझी भेट दादरला घेतली. त्यांना नाका कामगारांना भेटून ते कुठे राहतात,गांव कोणते,सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी भेटायचे होते.आमची भेट झाली मी त्यांना लक्षवेधी नाके व झोपडपट्टी दाखविण्याचे ठरविले. मी प्रथम त्यांना खार नाक्यावर सकाळी सात वाजता बोलावले, ते खार रेल्वे स्टेशन पश्चिम वर तिकीट घरा जवळ उभे राहिले तेव्हा त्यांना पंधरा वीस मिनिटात शेकडो कामगारांनी असे प्रश्न विचारले की ते गांगरून गेले,मी भेटल्यानंतर त्यांचा जीवतजीव आला,तेव्हा ते म्हणाले सागर मी हे प्रथम वेळ हे चित्र पाहतो.मी सोबत उभा राहिला तेव्हा एक एक कार्यकर्ता पुढे येऊन हात मिळवत होता.मग मी त्यांना आंध्रप्रदेश,कर्नाटक, तामिळनाडू यांच्या गटाच्या कामगारांना भेटवून चर्चा करून दिली, मग राजस्थानी, गुजराती,बंगाली, मराठवाडा,विदर्भ प्रत्येक भागातील वेगवेगळ्या प्रकाराचे काम करणाऱ्या कुशल अकुशल कामगारांना भेटून दिले.

खार नंतर मालाड स्टेशन पश्चिम,मालवणी, कांदिवली नाका,भाबरेकर नगर नाका व एक ते तीन नंबर नगर झोपडपट्टीत घरकामगारांच्या घरी महिलांची विचारपूस केली.श्रीमंता घरी होणारे आदरतीर्थ आणि गरिबांच्या झोपडीत होणारे आदरतीर्थ मान्यताप्राप्त पेपरच्या मान्यताप्राप्त पत्रकारांना खूपच वेगळा वाटला.नाका कामगार व घरकामगारांचे विविध प्रकार त्यांनी समजून घेतले. अनेक ठिकाणी फिरल्या नंतर सागर आता बस झाले यावर मी लिहतो नंतर आपण फिरू त्यावेळी एका मान्यताप्राप्त भांडवलदारांच्या पेपरचा मान्यताप्राप्त पत्रकार मी नाक्यावर फिरवल्यामुळे दोन गोष्टीचा फायदा झाला,स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली आणि कार्यकर्त्यात जोश वाढला लढण्याची इच्छाशक्ती वाढली.त्यावेळी त्यांनी घरकामगार नाका कामगारांवर अनेक लेख लिहले.पण महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंकात शेष कामगार एक स्पेशल स्टोरी प्रसिद्ध केली. त्यामुळेच समस्याचे मुळ शोधणारा पत्रकार मनाला भावला. असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर पोटतिडकीने लिहणारे पत्रकार आज शोधून सापडणार नाहीत.म्हणूनच जयंत पवार हे असंघटीत कामगारांच्या समस्याचे मूळ शोधणारे पत्रकार होते. बदलत्या काळाशीही त्यांच्या लेखनाचे असणारे अतूट नाते असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देणारे होते हे विसरता येणार नाही. जयंत पवार हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्थापनेपासून पाठीराखे होते. विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादातून आणि विद्रोहींच्या अनेक कार्यक्रमातून त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून महत्वाचे विचार मांडले होते. बुलडाण्याच्या विद्रोही साहित्य संमलेनाचे ते अध्यक्ष होते. गेली काही वर्षे पवार यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सातत्यपूर्ण भूमिका घेतली. सामाजिक जाणिवेबाबत संवेदनशील असणाऱ्या पत्रकारांचे निधन हे सांस्कृतिक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने खूपच हानीकारक आहे. मुंबईतील असंघटीत कष्टकरी कामगारांची जाणीवपूर्वक दखल घेऊन त्यावर लिहणारे पत्रकार अशी त्यांची ओळख होती.प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचितांचे जगणे नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड फुकारणारे जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या तमाम असंघटीत कष्टकरी कामगारांची मोठी हानी झाली आहे. त्यांना सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

✒️लेखक:-सागर तायडे(कामगार नेते)भांडुप,मुंबई(मो:-99204 03859)

महाराष्ट्र, मुंबई, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED