गोदावरी आलेल्या पूराने गंगाखेड शहरासह तालुक्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान

35

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8सप्टेंबर):-दिनांक ७ ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरासह तालुक्यावर आभाळच फाटले. त्यातच गोदावरीस आलेल्या महापुरामुळे गोदेचे पात्र ही फुटले आहे. यामुळे शहरासह तालुक्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी आणि शहरातील आपदग्रस्तांना पंचनामे न करता सरसगट आर्थीक मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे.

जोरदार पाऊस, गोदावरीचा महापूर यामुळे सर्वच हवालदील झाले आहेत. या परिस्थितीची पाहणी आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे यांनी केली. गोदापात्रासह पुराचे पाणी घुसलेल्या विविध भागांना त्यांनी भेटी दिल्या. शेती आणि घरे- रस्त्यांच्या दुरावस्थेची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आपदग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी गोविंद यादव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचेकडे केली आहे.

गोदावरी नदीवर नियुक्त असलेले केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी – कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुराच्या संभाव्य धोक्याची माहितीही गोविंद यादव व सखाराम बोबडे यांनी घेतली. तसेच नागरिकांच्या स्थलांतरणा संदर्भात नगर परिषदेच्या ऊप मुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांच्याशी चर्चा केली. शहरातील १५ कुटुंबीयांना गोदावरी मंगल कार्यालयात हलवण्यात आले असून या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शहरातील बरकत नगरात पुराचे पाणी घुसून वीटभट्ट्या, बेकरी व ईतर ऊद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपदग्रस्तांनाही गोविंद यादव यांनी दिलासा देत शासकीय मदत मिळवून देण्याची हमी दिली आहे. या प्रसंगी हाजी अहेमद भाई, सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, लोकश्रेय मित्र मंडळाचे गंगाखेड तालुकाध्यक्ष शेख सोहेल आदिंची ऊपस्थिती होती.

‘साहेब, गंगाखेड तालुक्यावर शब्दशः आभाळ फाटले आहे. गोदेचे पात्र ही फुटले आहे. यामुळे शेतकरी पुर्णतः ऊध्वस्त झाले आहेत. म्हणून पंचनाम्यांचे सोपस्कार पार पाडत न बसता थेट सरसगट आर्थिक मदत जाहिर करावी,’ अशी मागणी ट्विट द्वारे गोविंद यादव यांनी शासन-प्रशासनाकडे केली आहे.