मानवतेला काळिमा फासणारी घटना

28

देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. पुण्यातील या घटनेने मानवतेला काळिमा फासला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना मानव तरी कसे म्हणावे ? या हैवानांनी दुराचारी राक्षसांना देखील मागे टाकले आहे. या निमित्ताने देशातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामूहिक बलात्काराची पुण्यातील ही घटना देशातील पहिली घटना नाही. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत.

२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भया हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला होता. २०१३ साली मुंबईतील शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्काराचा भयाण प्रकार घडला होता. २०१४ साली बदायू येथे असाच प्रकार घडला होता. २०१६ साली नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेत तर मानवतेनेच खाली घातली. २०१७ साली उन्नाव आणि हैद्राबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराने देश हळहळला. त्यानंतर उत्तरप्रदेश मधील हातरस, महाराष्ट्रातील हिंगणघाट येथेही अशाच सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटना घडल्या. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत चालली आहे. मागील दहा वर्षात सामूहिक बलात्काराच्या घटनांत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत खटल्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. ही चिंतनीय बाब आहे. देशातील अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचेच हे लक्षण आहे.

देशात आज कोणतीच महिला सुरक्षित नाही, मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की साठ वर्षाची आजी. दररोज वर्तमानपत्रात महिला अत्याचाराची एक तरी बातमी वाचायला मिळतेच. महिला ही फक्त उपभोगण्याची वस्तू आहे ही पुरुषी मानसिकता या वाढत्या घटनांना कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. आपण काही केले तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही, अशीही काही आरोपींची मानसिकता झाली आहे. या आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी. जोवर आरोपींना फाशी होणार नाही तोवर अशा घटना कमी होणार नाहीत.

✒️लेखक:-श्याम ठणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५