गणेशोत्सव : गणेश-अनंत व्रत उत्सव!

[गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी विशेष]

गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्राह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा- लोकांचा ईश्वर-अधिपती आहे व तीनही लोक त्याच्यात सामावलेले आहेत, असे त्यात म्हटले आहे. या देवतेसह लोकांचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले, असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. अनंत चतुर्दशी हा अनंत- विष्णू पूजा व व्रत करण्याचा दिवस असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सन १८९४ साली झाली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. यावर हा प्रकाशझोत टाकणारा बापू ऊर्फ श्रीकृष्णदास निरंकारी यांचा महत्वाचा मार्गदर्शनपर विशेष लेख…_ – संपादक.

“गजानना श्री गणराया।
आधी वंदू तुज मोरया।।”

गणेश चतुर्थी: भारतीय सौरवर्षातील भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशीच श्रीगणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. श्रीगणेशाच्या या रुपामागे गहन अर्थ दडलेला आहे. श्रीगणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणपती अवतारांपैकी श्रीगणेश-जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. याच दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा ‘शिवा’ असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. म्हटले जाते की, श्रीगणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. त्याला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच या दिवशी त्याला मोदक व लाडू अर्पण केले जातात. गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते-

“सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती।।”
(समर्थ रामदास स्वामी विरहित.)

श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे. ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे. आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठराविक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो. ठराविक दिवसांनंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीतच नाही, तर तो आपल्या हृदयातही स्थित आहे. अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रुपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे. गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे. श्रीगणेश हा आपल्यातील अनेक चांगल्या गुणांचा देव आहे.

आपण जेंव्हा त्याची पूजा करतो तेंव्हा ते गुण आपल्यातही खुलू लागतात. जिथे जडता असेल तिथे ना ज्ञान असते ना बुद्धी असते ना प्रगती! त्यामुळे चेतनशक्ती जागृत करणे आणि तिचा अधिकार जाणणे म्हणजेच गणेश होय. आपल्यातील हीच शक्ती जागृत व्हावी म्हणूनच प्रत्येक पूजेच्या आधी गणेशाची पूजा केली जाते, त्यास श्रीगणेशा म्हणतात. म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने ग्रंथारंभी लिहिले-

“ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।
देवा तूचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी।।”
(पवित्र सार्थ श्रीज्ञानेश्वरी : अध्याय पहिला : ओवी क्र.१ व २.)

अशाप्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा व ध्यान करण्याने आपल्याला हृदयस्थ गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेशतत्वाला जागृत करणे, हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.गणेशोत्सव: गोव्यातील गणेश चतुर्थी- गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करतात. तिचे सोळोपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जित करावी, असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी, अशी यामागची धारणा आहे. तर कोकणातील गणेशोत्सव म्हणजे याच चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्यास विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात, ज्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करत हे मंत्र उच्चारतात-

“यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च।।”

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमा-महेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून ती मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच, सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचेही असते.अनंत चतुर्दशी: भाद्रपद शुद्ध-१४ म्हणजेच अनंत चतुर्दशी हा विष्णूच्या व्रताचा तसेच उत्सवाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्यव्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करत हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते. पांडवांना द्यूतात हरल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला, अशी आख्यायिका आहे.

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात. त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात. कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील जळाला यमुना म्हणतात. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात. अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. जुन्या दोऱ्यांचे विसर्जन करतात. वडे व घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात. या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो. हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेत पूजा करतात व हातात ‘अणत’ बांधतात. संतोक्ती साद देते-

“विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।”

लो.बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू करून त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करतात. बुद्धिजीवी मानवाचे पाय जमिनीवर स्थिर असावे, त्याने नाक, तोंड व जीभेला नियंत्रणात ठेवावे आणि समाजात नातेसंबंध अबाधित राखत मर्यादापूर्वक वागावे. हे शिकविण्यास निराकार ईश्वराने कोरोनास धाडले आहे, असे वाटते. ॐ गणं गणपतेय नम:!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंतच्या धार्मिक उत्सवांच्या अनंत हार्दिक शुभेच्छा !!

✒️लेखक:-श्री कृष्णदास (बापू) निरंकारी,(भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक व सारस्वत)मु. एकता चौक- रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, मोबा. ९४२३७१४८८३.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com

गडचिरोली, धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED