सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची “स्वावलंबन”कडे वाटचाल ; अतिरिक्त सीईओ धोत्रे यांनी पहिल्याच बैठकीत दिल्या इतक्या मंजुरी

✒️नागेश खूपसे(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.9सप्टेंबर):-कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी एकूण 1135 शेतक-यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर व इतर बाब करीता निवड झालेली आहे.कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतक-यांना त्यांचे मागणीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यानुसार पात्र शेतक-यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण 18 नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे 09, वीज जोडणी आकार 03 कामे व विद्युत पंपसंच 15 असे एकूण 45 शेतक-यांना रक्कम रुपये 52.80 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण 04 नवीन विहिर मागणी केलेल्या शेतक-यांना रक्कम रुपये 10.00 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील 01 विहिर दुरुस्ती कामांकरीता रक्कम रुपये 0.50 लाख असे एकूण 50 लाभार्थी करीता रक्कम रुपये 63.30 लाख रक्कमेस दिनांक 06/09/2021 रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे..जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी वरील सर्व योजनाकरीता एकूण 36 शेतक-यांना रक्कम रुपये 69.70 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे. आज अखेर एकूण 86 शेतक-यांना रक्कम रुपये 133.00 लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे.

कृषि विभागाकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शंतक-यांना विविध बाबीकरीता लाभ देण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध असून मंजूरी मिळालेल्या शेतक-यांनी तात्काळ कामे सुरु करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, सदर योजना अंतर्गत लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या 345 शेतक-यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावी, जेणेकरुन जिल्हा स्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोईचे होईल. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या अन्य गरजू शेतक-यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, व कृषि विभाग जिल्हा परिषद, सोलापूर यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED