गणेशोत्सव

“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”

हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने,उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो.त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते.प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस,कुठे पाच दिवस,कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.

श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे.शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातिच्याच मुर्तीचा आग्रह धरावा.काही सण असे असतात की, ते मराठी माणसाला अगदी जिवापाड आवडतात.असाच जिवापाड असणारा मराठी माणसांचा सण म्हणजे “गणेशोत्सव ” होय.आपल्या महाराष्ट्रात धर्मांच्या सिमेपलीकडे जाऊन खूप सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.जसे दिवाळी,होळी,दसरा,दहीहंडी (जन्माष्टमी),गणेशोत्सव,ईद आणि अगदी क्रिसमस सुद्धा.यापैकी मराठी माणसाला गणेशोत्सव सगळ्यात जास्त आवडतो.पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे.

गणपती म्हटलं की,सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे,किती दिवस सुट्टी आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते.पाऊस नुकताच संपलेला असतो,वातावरण अगदी प्रसन्न,हिरवेगार आणि आल्हाददायक असते.अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते.प्रत्येक जण आपल्या समस्या,भांडणे विसरून जातात.कळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत असते.किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर,सर्व किती मस्त असेल.गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी,सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते.घरातील लहान मुले,मोठी माणसे अगदी उत्साहाने तयारीला लागतात.या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची,कैलाश पर्वत,गड की आणखी वेगळं काही,ही चर्चा खूप मजेशीर असते.कोणी म्हणत पूर्ण सजावट घरच्या घरी बनवू,कोणी म्हणत बाजारातून विकत आणू ही हुज्जत ही खूपच छान असते.गणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर,अंगण साफ करायला घेतात,घरातील सगळे अगदी उत्साहानं यात भाग घेतात.कितीही दिवस अगोदर तयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते.

सजावट करणे,पताका चिकटवणे,दिवे,पणत्या,समई शोधून स्वच्छ करून ठेवणे,या सर्व धावपळीत ही खूप मजा येते.बरेच जण सुट्ट्या काढून घरी येतात व गणेशाची स्थापना करतात.लहान मुले तर खुपच दंगामस्ती करतात.मोठयांच्या गप्पा-टप्पा,छोट्यांच्या खोड्या आणि खेळांनी घर,आंगण अगदी प्रसन्न होऊन जाते.गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे लवकर उठतात,फटाफट स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.आई,आजी प्रसाद, नैवद्य आणि मोदकांच्या तयारीसाठी लागतात.बाबा आणि घरातील सारी लहान मुले गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातात.नाचत – वाजवत गणपती बाप्पांना घरी घेऊन येतात.अंगणात बाप्पा आल्यावर आई पूजा करते,आरती करते आणि मग गणेश भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ होतात.थोड्या वेळाने आरती होते,ढोलकी,टाळ,टाळ्यांच्या आवाजाने घर दूम – दूमून जाते.मोदकांचा नैवद्य दाखवला जातो,आरती फिरवली जाते,प्रसाद वाटला जातो.त्यादिवशी दुपारी सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.कोणाच्या घरी गणपती बाप्पा दिड दिवस तर कोणाकडे ५,७ किंवा १०,११ दिवस वास करतात.गणपती बाप्पांसोबत त्यांच्या मातोश्री,गौरी सुद्धा येतात.घरातील स्त्रिया खूप भक्ती भावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात.बघता बघता गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्व आनंदीत होतात.

गणेशोत्सव हा मराठी माणसांचा आवडता सण आहे कारण या सणात सर्व घराचे,समाजाचे सदस्य एकत्र येतात.आपले वाद – विवाद,रुसवे – फुगवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात.विविध धर्माचे लोक सुद्धा धार्मिक सीमा पार करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतात.ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आपण आज पाहू शकतो.भारतात नाना प्रकारचे धर्म,जाती आहेत.देशाच्या उन्नतीसाठी हे सगळे एकत्र आणि आनंदात राहणे खूप गरजेचे आहे.गणेशोत्सव हा सण सर्वांचा आवडता आहे कारण हा सण घरच्यांना,समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.
भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे.मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना,याकडे मात्र लक्ष देण्याची नक्कीच वेळ आली आहे.गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले.कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेण्याची आवश्यक आहे.

गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे.यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे.प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.
आज आपण पर्यावरणाविषयी अधिक जागरुक झालो आहोत.त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे.अगदी आज पासून सुरु होणारा गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा,कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे.पर्यावरणाची काळजी घेऊन आपण सर्वांनी गणेशोत्सव साजरा कररावा हीच मनोमन अपेक्षा.
अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं.दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं.तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो.

पावलं जड होतात.लहानं बच्चेकंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत असतो.आणि पाठमोरी बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.जो उत्साह त्याच्या आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो त्याचा लवलेशदेखील त्याला निरोप देतांना आढळुन येत नाही.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला होता आज तो उद्देश पुर्ण होतांना पहायला मिळत नाही.सगळीकडे मोठया आवाजात डी जे वाजवणे,बिभत्स नाचगाणी,मंडपात चित्रपट गितं वाजवणे,मोठमोठे मंडप बांधुन रोषणाई करून या पारंपारिक उत्सवाला ज्या पध्दतीने मेगा ईव्हेण्ट चे स्वरूप यावयास लागले आहे ते पाहाता लोकमान्यांना या उत्सवातुन नक्कीच हे अभिप्रेत नव्हते हे आपल्या लक्षात येते.सामाजिक एकोपा वाढवुन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करणे,गरजवंताना सहाय्य करणे,वक्र्तृत्व स्पर्धांचे आणि इतर स्पर्धा आयोजित करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे.तेव्हांच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सफल होईल !!!

चला तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वंजण सर्वधर्म समभाव संकल्पना राबवू या.तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करु या.गणपती बाप्पांना प्रार्थना करु या कोरोना महामारीचे आलेले संकट दूर होवू दे.शेवटी मनोभावे म्हणू या….गणपती बाप्पा मोरया।।।

✒️लेखक:-राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)

धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED