आपण अनुभवलेल्या दुनियेची नोंद घेता आली पाहिजे : कवी लोकनाथ यशवंत

30

🔸आपण जे पाहतो,जे अनुभवतो त्याची नोंद घेता आली पाहिजे

🔹चिमूरात साहित्य रसिकांसोबत साधला संवाद

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10सप्टेंबर):-आपण जे पाहतो,जे अनुभवतो त्याची नोंद घेता आली पाहिजे.एक माणूस दुस-या माणसाला मूर्ख बनवतो.सिमेवरील सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी हातात संगिन घेतो,बेडकांना मारण्यासाठी नव्हे.देशात लाखो लोक मेले याचं कोणाला काही सोयरसूतक नाही.असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांनी केले.ते येथे साहित्य रसिकांसोबत संवाद साधताना बोलत होते.

कविता आपल्याला कशी भेटली हे सांगताना ते पुढे म्हणाले,मी सुरुवातीला कथा लिहून पाहिली.पण कथा लिहिणे जमले नाही. मग कवितेकडे वळलो. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी ओळींत कवितेतून बरंच काही सांगता येतं. मग मी कवितेलाच सर्वस्व वाहिलं. दहा – बारा ओळी लिहिल्या की कविता प्रकाश देऊन जाते. मी सुरुवातीला देशातल्या सर्वच साहित्यिकांच्या कविता वाचल्या. पण मला त्यात माझे काहीच दिसले नाही.बाबुराव बागुल, नारायण सुर्वे यांच्या साहित्यात मला माझ्या मनाचे प्रतिबिंब दिसले.माझ्या कविता महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच विद्यापिठांत अभ्यासक्रमात अभ्यासायला आहेत.एवढेच नव्हे तर पाकिस्तानातील विद्यापिठात कविता अभ्यासक्रमात आहे.मी जगभर फिरलो.ही सर्व कवितेची किमया आहे. कवितेसाठी तीन प्रमोशन आपण नाकारल्याचे लोकनाथ यशवंत यांनी याप्रसंगी सांगितले.अनेक आठवणी याप्रसंगी त्यांनी सांगितल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर नागदेवते यांनी लोकनाथ यशवंत यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. सुप्रसिद्ध चित्रकार संजय मोरे, प्रा.डॉ.हरिश गजभिये यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रसिद्ध कवी प्रल्हाद बोरकर यांनी केले.संचालन हरी मेश्राम तर आभारप्रदर्शन सुरेश डांगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुलाब गणवीर,शिवराम मेश्राम, नत्थूजी वाघमारे,परमानंद राऊत,पुष्पा राऊत,रामदास राऊत, किशोर नागदेवते, अनिल गेडाम, काकाजी वाघमारे,शालिक थुल,रामकृष्ण ताकसांडे,रशूहर मेश्राम, खापर्डे, ज्ञानेश्वर खोब्रागडे, मेश्राम,खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.