उत्सवकाळात नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई कारवाईसाठी विविध ठिकाणी भरारी पथके- जिल्हाधिकारी पवनीत कौर

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.10सप्टेंबर):-गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही स्वयंशिस्त व कोरोना प्रतिबंधक दक्षता पाळण्याचे आवाहन करतानाच, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसा आदेशही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांच्याकडून आज जारी करण्यात आला.

तिसऱ्या लाटेकरिता अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा प्रशासनामार्फत सर्व खबरदारी घेतली जात आहे. उत्सवकाळात बाजारपेठेत गर्दीची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले आहेत.

आदेशात नमूद आहे की, आगामी काळामध्ये मोठया प्रमाणात सण, उत्सव येत आहेत. या उत्सव कालावधीमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होऊ
शकतो. आरोग्य विभागाने कोविड-१९ बाबत तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तविलेली असून काही भागामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सुध्दा दिसून येत आहे तसेच केरळ राज्यामध्ये ओनम सणानंतर रुग्णसंख्या वाढल्याचे निर्दशनास आले आहे. अशा वेळी याबाबत आवश्यक त्या उपायोजना तात्काळ करुन कोविड-१९ ची रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी सुसंगत जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे अत्यावश्यक असून वेळोवेळी हाताळण्यात येणाऱ्या उपकरणांना हाताळण्यापूर्वी सॅनीटायजरचा वापर करावा, असे आदेशात नमूद आहे.

एकाचवेळी बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासन, आयुक्त मनपा, तहसीलदार, नपा मुख्याधिकारी, पंस गट विकास अधिकारी यांनी त्यांचे स्तरावरुन नियोजन करावे. कोविड नियमांचे पालन करण्याबाबतचे फलक आदी जनजागृती करावी. आगामी येणाऱ्या सर्व सण उत्सवाच्या वेळी कोविड-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन होईल यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन त्याबाबतची अंमलबजावणी करावी, असे आदेश आहेत.

महसूल, पोलीस विभाग, नगर परिषद, महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, यांनी संयुक्तपणे कारवाई
करण्याकरीता भरारी पथक (Flying Squad) स्थापन करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत.