ग्लोबल वार्मिंग आणि आयसीपीसी चे भाकीत

मागील काही महिन्यांपासून पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात निसर्गाची विविध रौद्ररूपे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, चक्रीवादळ, दरडी कोसळणे, भूस्खलन तर काही ठिकाणी भीषण दुष्काळ, भयानक उष्णता, तापमानवाढ, भीषण पाणी टंचाई, वणवे, जंगलांना लागणाऱ्या आगी अशा घटना एकाच वेळी घडत आहेत. यासर्वांचे एकच कारण आहे ते म्हणजे पृथ्वीचे वाढते तापमान अर्थात ग्लोबल वार्मिंग. या संदर्भात वैज्ञानिक सत्य नोंदवणारा ‘इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ ( आयपीसीसी ) या संस्थेच्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग नुकताच प्रसिद्ध झाला. हा अहवाल तयार करण्यासाठी जगभरातील ७५० विविध शाखेतील संशोधक सहभागी होते आणि या सर्वांनी हवामान आणि पृथ्वीची स्थिती आदी मुद्द्यांवर १४ हजारांहून अधिक वैज्ञानिक प्रबंधांचा अभ्यास केला. या अहवालात पुढील दशकात हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यावर अनेक भाकिते केली आहे. या अहवालानुसार पुढील दशकभरात पृथ्वीचे तापमान दीड ते दोन अंशाने वाढेल आणि त्यामुळे हिमखंड वितळतील, दुष्काळ पडतील, अतिवृष्टी होईल, महापूर येतील असे अनेक भाकिते व्यक्त केली आहेत. आयपीसीसी च्या प्रथेप्रमाणे असे अहवाल तयार करणारे तीन गट असतात.

पहिला गट – तापमान वाढ आणि वातावरणीय बदलाचे विश्लेषण करतो दुसरा गट – हा पहिल्या गटाने सादर केलेल्या भाकितांचे वास्तविक परिणाम, त्यास बळी पडू शकतील असे अशक्त जनसमूह यांचा अभ्यास करतो.
तिसरा गट- हे सारे टाळण्यासाठी आणि टळू शकत नसेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काय उपाय आहे हे सुचवतो.हा अहवाल जगातील सर्व देश, सामाजिक, स्वायत्त संघटना आदींसाठी त्यांच्या कारभाराची दिशा ठरवण्याकामी महत्वाचा असतो. म्हणून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. पुढील दशकभरात जगासमोर काय वाढून ठेवले आहे हे या अहवालात विस्तृतपणे मांडून ठेवले आहेच पण त्यातही बराच मोठा भाग भारताविषयी आहे. या अहवालात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक प्रदूषणकारी आणि कार्बन उत्सर्जन करणारे देश आहे. प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे त्याचा फटका हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांना बसेल आणि त्यांच्या वितळण्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पूर येतील असे भाकीत या अहवालात आहे. त्याची प्रचिती आताच येऊ लागली आहे.

हा अहवाल भारताने गंभीरपणे घ्यायला हवा कारण आपली भौगोलिक परिस्थिती. आपला देश हिमालयाच्या सावलीत आहे. उत्तरेला बर्फाच्छादित हिमालय पर्वत तर पुर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. याचाच अर्थ आपल्या देशाला तीन बाजूने समुद्राने वेढले आहे तर चौथी बाजू ही हिमालयाच्या सावलीत आहे. म्हणजेच आपल्या देशाच्या चारही बाजूंना तापमानवाढीच्या दुष्परिणामांचे संकट आहे. हिमालयातील बर्फाच्छादित हिमखंड वितळून पूर येणार आणि ते वाढलेले पाणी पुढे समुद्रात जाऊन त्याची पातळी वाढणार. म्हणजे परत किनारी प्रदेशास धोका. समुद्रातील पाणीपातळी दरवर्षी साडेतीन मिमी ने वाढत असल्याचे आपल्याला माहीतच आहे म्हणजे जी वाढ पूर्वी दशकांत होती ती आता वर्षाला होत आहे. पृथ्वीचे तापमान असेच वाढत राहिले तर ती दिवसांवर येईल. त्याचा मोठा फटका समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना बसणार हे उघड आहे त्यामुळेच पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्यासाठी आतापासूनच ठोस प्रयत्न करायला हवेत.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED