तर्पण फाउंडेशन १८ वर्षावरील अनाथ मुलामुलींना आधार देणार

🔸तर्पण फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक पदी संजय गजपुरे यांची नियुक्ती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):-तर्पण फाऊंडेशनच्या विदर्भातील विविध जिल्ह्यातील संचालक व समन्वयक यांची बैठक नुकतीच हॉटेल तुली इंपीरियल, नागपूर येथे पार पडली. या बैठकीला तर्पण फाऊंडेशनचे प्रबंध संचालक श्रीकांत भारतीय व विदर्भाचे प्रभारी तथा प्रसिद्ध अभिनेता निर्देशक संचित यादव उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्रीकांत भारतीय यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक प्रतिनिधींची घोषणा केली. यावेळी चंद्रपूर जिल्हा समन्वयक पदी सामाजिक कार्यकर्ते व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांची घोषणा करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .

श्रीकांत भारतीय यांनी उपस्थितांसमोर तर्पण फाउंडेशनची भूमिका विशद केली. तर्पण फाउंडेशन चा मूळ उद्देश वय वर्ष अठरा च्या वर होणाऱ्या अनाथ मुला मुलींना आधार देणे हा होय असे सांगितले व यामागील सामाजिक आशय श्री भारतीय यांनी स्पष्ट केला. वय वर्ष १८ पर्यंत अनाथालय व बालगृह अशा शासकीय व्यवस्थेत या अनाथ मुलांमुलींची सोय होते , मात्र नेमके पौगंडावस्थेत पदार्पण करताना त्यांना शासकीय व्यवस्थेतून बाहेर पडावे लागते आणि या काळात त्यांना मानसिक, भावनिक,शैक्षणिक व आर्थिक आधाराची गरज असते. याच नेमक्या प्रश्नावर उत्तर म्हणून तर्पण फाऊंडेशनचे कार्य चालते. तर्पण फाऊंडेशनचे या घडीला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी असून तर्पण परिवाराच्या माध्यमातून या कार्याला सहकार्य करणारे व फॉलो करणारे आठ हजार नागरिक आहेतनव्या शैक्षणिक वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ५१३ अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक कार्य चालू राहावे याकरिता त्यांचे शैक्षणिक शुल्क तर्पण भरणार असून या विद्यार्थ्यांमध्ये एमएससीआयटी, आयटीआय अशा कोर्स पासून ते एमबीबीएस पर्यंत सर्व विद्यार्थी अंतर्भूत आहेत. याच्या योग्य अंमलबजावणी करीता तर्पण फाउंडेशन व महिला व बाल विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आवश्यकतेनुसार अशा अनाथ मुलामुलींच्या निवास व आवश्यक सेवेची व्यवस्था तर्पण परीवारा तर्फे करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण घेऊ इच्छिणारे अनाथ मुला मुलींची यादी व त्यांना कोणते शिक्षण घ्यावयाचे आहे याबाबतचा तपशील सर्व प्रतिनिधींना देण्यात आला. यानुसार अनाथ विद्यार्थी ज्या वसतिगृहात सध्या आहे त्या ठिकाणी संपर्क करून तर्पण चे संचालक व जिल्हा समन्वयक त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी मदत करणार आहेत.तर्पण चे नागपूरचे समन्वयक प्रतिनिधी मनीषजी केवलीया यांनी या बैठकीचे यशस्वी आयोजन केले.

या बैठकीसाठी मुंबईहून संचालक संचित यादव, सुनील पाठक अमरावती, संदेश खंडेलवाल अकोला, अविनाश देव वर्धा, मकरंद देशपांडे नागपूर,संजय गजपुरे चंद्रपूर , गोविंद सारडा गडचिरोली, प्रा. डॉ. हेमंत देशमुख भंडारा , राजू पडगिलवार यवतमाळ , अभय सावंत गोंदिया , हर्षल जोशी बुलढाणा हे सर्व समन्वयक हजर होते.तर्पण फाउंडेशन चे संचालक संचित यादव यांनी तर्पण परिवाराच्या वतीने सर्व प्रतिनिधींचे व बैठकीचे संयोजक मनीषजी केवलीया यांचे आभार मानले.
============

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED