नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत अध्यासन प्रमुखांची आदर्श गाव राजगड ला सदिच्छा भेट….

26

🔹आदर्श राजगडचे कार्य प्रेरणादायी – डाॕ. पाखमोडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):-राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत अध्यासनाचे प्रमुख डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी नुकतीच आदर्श गाव राजगड ला सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांंनी आदर्श राजगड येथील वृक्षलागवड , बागबगीचे , सार्वजनिक सभागृह , अंगणवाडी , स्वच्छतागृहे ,सौर उर्जेतून गरम पाण्याची व्यवस्था , विद्यार्थ्यांची अभ्यासिका, ग्रामपंचायत विश्रामकक्ष आदी ठिकाणाची पाहणी करून ग्रामस्थांकडून केल्या गेलेल्या विकास कामाचे मनापासून कौतुक केले. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता ग्रंथानुरूप लोकसहभागातून केल्या गेलेल्या आदर्श ग्रामरचनेचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे राजगड चे शिल्पकार चंदू पाटील मारकवार यावेळी म्हणाले.

याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीबोली साहित्य मंडळ मुल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथींचा शाल व ग्रामगीता देऊन चंदू पाटील मारकवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यासन प्रमुख डाॕ. पाखमोडे यांचा परिचय बंडोपंत बोढेकर यांनी करून दिला . विद्यापीठाच्या अध्यासनाचे वतीने राजगड प्रमाणे आदर्श गावे घडविण्याच्या दृष्टीने नवयुवकांना प्रेरणा देण्याचे तसेच ग्रामीण युवक लघु उद्योग – स्वयंरोजगाराकडे वळावे यादृष्टीने कार्य हाती घेण्यात येईल असे डाॕ. पाखमोडे म्हणाले .

राजगड हे गाव २००२ -०३ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले होते. तसेच २००६ साली केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार, २०११ साली राष्ट्रपतीच्या हस्ते पर्यावरण संतुलित विकास रत्न पुरस्कार ह्या गावांनी स्वकर्तुत्वाने प्राप्त केलेला आहे. ग्रामसभा, लोकसहभाग आणि श्रमदान या त्रिसुत्रीने गावाने आजवर कार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि सत्र २०१६ -१७ मध्ये केंद्र शासनाचा दिनदयाल उपाध्याय पंचायती राज सशक्तीकरण पुरस्कार राजगड ला मिळालेला आहे, हे विशेष.