नाशिकात पूरसदृष्य स्थिती दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गोदावरीला आला पूर

🔸प्रशासन चा नागरिकांना सर्तकतेचा इशारा

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.14सप्टेंबर):-गोदावरी नदीला वर्षातला पहिला पूर आला आहे. सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारपर्यंत पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहचले होते. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के, दारणा धरण 97 टक्के, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प 93, कश्यपी 73 टक्के आणि मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे आजही पूरसदृष्य स्थिती आहे पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स पाणी सोमवारी (13 सप्टेंबर) आठ वाजता सोडण्यात आले. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला पूर आला आहे.

रामकुंड, गोदाघाटवरील दुकाने हलविली

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले आहे. त्यामुळे गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

वालदेवीच्या पुरात एक जण वाहून गेला

पावसाने वालदेवी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाढेगाव येथील वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय 45) हे वाहून गेले आहेत. ते सायंकाळच्या सुमारास पुलावरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. येथून दाढेगाव, पाथर्डी, व पिंपळगाव खांब येथील नागरिकांची ये-जा सुरू असते. नदीचे पाणी वाढल्यास दाढेगावकडे जायचा मार्ग बंद होतो. त्यामुळे येथे नवा पूल उभारावा. तो उंच असावा, अशी मागणी तिन्ही गावातल्या गावकऱ्यांकडून होत आहे.

आज पावसाची शक्यता

नाशिक जिल्ह्यात सोमवार (13 सप्टेंबर) आणि मंगळवारी (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच खान्देशमध्येही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत विदर्भासह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED