उमरखेड येथील काही पुढार्‍यांना लोकनेते स्व. भाऊसाहेब माने यांच्या कार्याचा विसर

28

🔸पुसद रोड वरील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स ला ‘आपला जिन प्रेस’ चे संस्थापक अध्यक्ष स्व. भाऊसाहेब माने यांचे नाव देण्यास टाळाटाळ

✒️सिध्दार्थ दिवेकर उमरखेड(तालुका प्रतिनिधी)मो.9823995466

उमरखेड(दि.16सप्टेंबर):- विभागाचे माजी आमदार लोकनेते स्व.भाऊसाहेब माने यांनी सहकार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि शेती आदी क्षेत्रांमध्ये दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले असून उमरखेड भागाच्या विकास कार्यात शेतकरी व शेतमजूर केंद्रस्थानी ठेवून ‘आपला जिन प्रेस’ या सहकारी संस्थेची स्थापना केली होती.

या सहकारी संस्थेमार्फत उमरखेड – पुसद रोड वर नव्याने बांधण्यात आलेल्या व्यवसाय संकुलाला स्व. भाऊसाहेब माने यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून आणि शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली असतांना आजचे काही पुढारी भाऊसाहेबांचे नाव देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

स्व. भाऊसाहेब माने आणि स्व.जेठमलजी माहेश्वरी यांनी वसंतरावजी नाईक साहेबांना उमरखेड येथे जिनिंग अँड प्रेसिंग प्रकल्प उभारण्याकरिता योजना सांगितली होती. त्यांनी ही त्यास लगेच होकार दिला.

भाऊसाहेबांनी गावागावात फिरून लोकांना सविस्तर समजावून सांगून ‘आपला जीन प्रेस’ उभारणीकरिता शेतकऱ्यांना शेअर्स देऊन सभासद केले तसेच कापूस प्रक्रियेसाठी जागा निवडली.

आपला जिन प्रेस ची उमरखेड येथे स्थापना करून स्व. भाऊसाहेब माने यांची संस्थेच्या तत्कालीन सर्व सभासदांनी एकमताने संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड केली होती.

सन 1964 मध्ये जिनप्रेस परिसरातच कॉटर मध्ये राहून जीनचे काम पाहणारे ते पहिले अध्यक्ष होते. परंतु त्यांच्या या सर्व कार्याचा आणि त्यागाचा विसर काही पुढाऱ्यांना आणि सध्याच्या काही जिनप्रेस सदस्यांना पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुसद रोड वरील नव्यानेच बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल ला खरे हक्कदार असणारे स्व. भाऊसाहेब माने यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी करीत आहेत .

उमरखेड परिसरातील शेतकरी सुखी व्हावा यासाठी 25 फेब्रुवारी 1964 रोजी स्व. भाऊसाहेब माने यांनी उमरखेड तालुका जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची स्थापना लोकनेते स्व. जेठमलजी माहेश्वरी, स्व. अमानुल्लाह जागीरदार, स्व. नारायणराव पाटील वानखेडे, स्व. मुडे गुरुजी, स्व. नरवाडे गुरुजी व इतर मान्यवरांच्या सहकार्याने केली.

या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष होऊन या संस्थेच्या झालेल्या विकास आणि विस्तारामध्ये ज्या भाऊसाहेबांनी आपल्या सर्वांचे नाव ‘आपला जिन प्रेस’ हे नामकरण केले त्या भाऊसाहेबांचे नाव नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स ला देऊन त्यांनी केलेल्या दीपस्तंभासारख्या कार्याच्या ऋणातून उतराई करावी असे आवाहन स्व.भाऊसाहेब माने गौरव कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.