कार्यालयीन वेळेत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-937896949

नायगाव(दि.16सप्टेंबर):-कार्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार उभी असून त्याबाबत नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री फांजेवाड यांनी कसलीही पूर्वसूचना न करता गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की नायगाव पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी कार्यालयांमध्ये सातत्याने हजर नसतात याबाबतच्या बातम्याही अनेक वेळा वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या होत्या त्या अनुषंगाने नायगाव पंचायत समिती कार्यालयातील कामास कुचराई करणारे कर्मचारी श्री वसमते, श्री पवळे, श्री कवठेकर व श्री धुळेकर यांना नायगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री फांजेवाड यांनी याआधी अनेक वेळा कार्यालयीन वेळेत गैरहजर राहता कामा नये अशा सूचना दिलेल्या असताना.

14 सप्टेंबर रोजी त्यांच्या पाहणी निरीक्षणानुसार वरील कर्मचारी महाशयांनी कसल्याही पद्धतीच्या वरिष्ठांना सूचना न देता व हालचाल रजिस्टरला कसलीच नोंद न करता कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांबद्दल त्यांना गट विकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. कारणे दाखवा नोटीसीत सदर अनुपस्थिती कारणास्तव 24 तासात खुलासा देण्याचे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे नायगाव पंचायत समिती कार्यालयात सूचना न देता अनुपस्थितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED