पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17सप्टेंबर):-येथील साई सेवा प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थे मार्फत प्रशासनाच्या सहयोगातून या वर्षीही गणपती मुर्ती दान ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीतील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळे, घरगुती गणेश भक्तांनी या ऊपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.गंगाखेड शहरातील गणेश विसर्जन कार्यक्रमासंदर्भात एसडीएम कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत श्री पाटील बोलत होते.

गंगाखेडचे तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर, उपनिरीक्षक घोगरे, साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, न. प. उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, कार्यालयीन अधिक्षक सुरेश मणियार, स्वच्छता निरीक्षक वसंत वाडकर आदींची यावेळी ऊपस्थिती होती. या बैठकीत शहरातील गणेश विसर्जन कार्यक्रमासंदर्भात नियोजन करून निर्णय घेण्यात आले.

गंगाखेड शहरातील नामांकीत श्री साईसेवा प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेच्या वतीने या वर्षीही गणपती मुर्ती दान ऊपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहीती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी या बैठकीत दिली. यावर्षी हा ऊपक्रम ऐच्छीक ठेवण्यात आला असून आपली गणेश मुर्ती दान करू ईच्छीणारांनी प्रतिष्ठाण ( 942154 1111 ) अथवा तहसील, न. प. प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी गोविंद यादव यांनी केले. शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी या ऊपक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धन मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत बोलताना ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.

शहरातील सर्व गणेश मूर्ती संकलीत करून नगर परिषदेच्या वतीने त्यांचे यथोचीत विसर्जन केले जाणार असल्याची माहिती यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सर्वच मिरवणूकांवर बंदी असल्याने सार्वजनीक मंडळे, नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.