माणसाला माणूसकीकडे घेऊन जाणारे थोर सामाजिक व्यक्तिमत्त्व कै. दिगंबररावजी धर्माधिकारी बरबडेकर

37

पवित्र ते कुळ पावन तो देश ! जेथे हरीचे दास जन्म घेती !! या न्यायाने गोदावरी तीरावर वसलेल्या बरबडा या गावात कै. दिगंबरराव ज्ञानोबाराव धर्माधिकारी यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मातोश्री लक्ष्मीबाई धर्माधिकारी तर वडिलांचे नाव ज्ञानोबाराव धर्माधिकारी हे होते. त्यांच्या अडनावामध्ये धर्म आणि अधिकारी हे दोन शब्द येतात म्हणूनच त्यांना धर्माधिकारी ही पदवी पूर्वीच्या काळी बहाल केली होती. दिगंबररावजी यांचं प्राथमिक शिक्षण बरबडा येथे झाले. माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले.

दिगंबररावजी यांना बालवयातच सामाजिक व समाजसेवा करण्याची आवड होती. त्यांनी त्यांचे मोठे बंधू स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्याकडून त्यांना बालवयातच समाजकारण व राजकारणाचे धडे मिळाले त्यांच्या मध्ये जिज्ञासूवृत्ती, विनयशीलता, विश्वास, मित्रत्व, प्राणीमात्रावर दया, शिस्तबद्ध, धैर्य, काटकसर, जिद्द व चिकाटीपणा हे गुण त्यांच्या अंगी बाणलेले होते. पाटोदा त.ब. नगरीचे ते जवळपास 25 वर्ष बिनविरोध सरपंच म्हणून कार्य केले. सेवा सहकारी सोसायटीचे सलग 30 वर्ष चेअरमन म्हणून राजकिय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. नांदेड लोकसभेसाठी त्याना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती पण अपक्ष उमेदवार धनगे यांच्या निधनामुळे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.

काय सांगू आता संतांचे उपकार ! मज निरंतर जगविती !! बरबडा येथे नवरात्र महोत्सव सुरुवात करून त्यात हभप मारोती महाराज दस्तापुरकर, हबप ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरिकर, हभप विद्यावाचस्पती दादा महाराज मनमानडकर, हभप मामासाहेब मारतळेकर, हभप किशनदेव महाराज बरबडेकर, हभप सुरजखेडंकर महाराज, जागतिक कीर्तीचे मृदंगाचार्य शंकर बापू अपेगावकर, हभप किशन महाराज साखरे आळंदीकर व समाजसेवक अण्णा हजारे इत्यादि थोर संतमहात्म्याच्या पदस्पर्शाने बरबडा नगरी पुनीत करण्याचे व जनतेला ज्ञानामृत पाजण्याचे महान कार्य त्यानीं केले. तसेच माता रत्नेश्वरी देवी संस्थान वडेपुरी चे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्वतःच्या मालकीची दहा एकर जमीन त्यानी दान दिली आणि वडेपुरी येथे हभप डॉ विश्वनाथराव कराड साहेब यांच्या एम आय टी या संस्थेस वैधकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी स्वतःच्या मालकीची तीस एकर जागा दान देऊन नांदेड जिल्ह्यात एका नवीन संकुलाची भर पाडली.
ते जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती संचलित बरबडा चे संस्थापक सदस्य होते व 1989 साली ते अध्यक्ष झाले व त्यांच्या काळात शैक्षणिक प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला. व स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या निधनानंतर ते नांदेड येथील महिला महाविध्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. आणि त्यानी लावलेल्या ज्ञानदानाच्या रोपट्याचा आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. इवलेसे रोप लवियेलें द्वारी ! त्याचा वेलू गेला गगनावरी !!

सतत हसतमुख चेहरा, प्रसन्न व रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे त्यांचा प्रभाव इतरांवर ताबडतोब पडत होता. एखादं काम कसं करून घ्याव ही कसब त्यांच्यात होती आणि काम करताना अडथळे अपयश आले तर ते स्वतः कधिही खचून गेल्यासारखे दिसत नव्हते. कुशाग्र बुद्धिमत्ता व विनोदी स्वभाव यामुळे जनसामान्यांना त्यांची ओढ होती. दया करणे पुत्राशी ! तोचि दासा आणि दासी !! अस त्यांचं व्यक्तिमत्त्व होत. तुका म्हणे एका मरणेची सरे ! उत्तमची उरे कीर्ती मागे !! त्यांच्याबद्दल एव्हढच सांगावेसे वाटते माणसाने सोन होऊन जगण्यापेक्षा परिस होऊन जगावे कारण सोन हे फक्त हातात घालता येत गळ्यात घालता येत किंवा कपाटात ठेवता येत पण जर परिस झालं तर ज्याच्या संगतीत जावं त्याच सोन करावं असं परिसासम जीवन जगणारे कै दिगंबरराव धर्माधिकारी होते.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती ! तेथे कर माझे जुळती !!
आज दिगंबरराव धर्माधिकारी आपल्यात नाहीत हे खरे वाटत नाहीत पण त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा आजही आम्हाला सदैव प्रेरणा देतो. मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-एन एम तिप्पलवाड (एन टी सर)सांस्कृतिक विभाग प्रमुख,जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा,ता नायगाव जि नांदेड