प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

केएस फाउंडेशन, नाशिक (MS) तर्फे दिल्या जाणाऱ्या परफॉर्मिंग आर्ट्स-ड्रामॅटिक्स, थिएटर फील्ड अँड थिएटर रिसर्च क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार यंदा श्री. पंडीतगुरु पार्डिकर महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतात तसेच परदेशात परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये कार्य करणाऱ्या संशोधकांना आणि अभ्यासकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे हे नाव आज नाट्यक्षेत्रात सर्वांना परिचित आहे. प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातून नाट्यशास्त्र विषयात मास्टर डिग्री संपादन करून सुवर्ण पदक मिळविले. पुढे नाट्यशास्त्र विषयात पी. एच. डी. सुद्धा प्राप्त केली. पी. सी. सी, डिप्लोमा, बी. डी, एम. ए. इंग्लिश, एम. डी. असे विविध नाट्य विषयक शिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केले.

सध्या प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे श्री. पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा ता. परळी वैजनाथ, जि. बीड. येथे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरथ आहेत. शिवाय नाट्यशास्त्र विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून देखील ते कार्य करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र अभ्यास मंडळ व परीक्षा विभागाचे ते सदस्य आहेत. उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद (तेलंगणा) येथील परीक्षा विभागाचे ते सदस्य आहेत. डॉ. गंगुबाई हंगल परफॉर्मिंग आर्ट्स युनिव्हर्सिटी म्हैसूर, परफॉर्मिंग आर्ट्स डिपार्टमेंट, बंगलोर युनिव्हर्सिटी, श्री रामकृष्ण देवराय युनिव्हर्सिटी, बल्लारी, कर्नाटक आदींशी ते कनेक्टेड आहेत. ह्यापूर्वी नाट्य क्षेत्रात बजावलेल्या कामगिरी बद्दल सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा २०१० साली त्यांना रंगभूमी फेलोशीप प्रदान करण्यात आली आहे. नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१३ साली जिजामाता पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं. तसेच स्व. जवाहरलाल दर्डा व नृसिंह देशपांडे पारितोषिकाने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे, डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी नाट्यशास्त्र विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. शिवाय अनेक एकांकिका आणि नाट्य विषयक अभ्यास ग्रंथ लिहिले आहेत. जयपूर, अजमेर, बँगलोर, इत्यादी ठिकाणी विविध राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात त्यांचा सहभाग राहिला आहे.

अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत इत्यादी विषयांवर आयोजित कार्य शाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून त्यांना आग्रहाने आमंत्रित केलं जातं. विविध विभागीय व राज्यस्तरीय एकांकिका तथा नाट्यस्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियत कालिकात त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. चंद्रशेखर कणसे यांचा ‘स्वातंत्र्योत्त्तर काळात मराठी रंगभूमीवर पाच्यात्य रंगभूमीचा झालेला प्रभाव’ हा ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक असा ठरला आहे. त्याव्यतिरिक्त ‘थीरुमल नायकर’, ‘लोकरंग कला : निर्माण, स्वरूप और अवधारणा’. इत्यादी पुस्तके देखील विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या ‘न्यू चॅलेंज’, ‘वादळ’, ‘तर मग ठरलं’, ‘अ बीट ऑफ चान्स’ इत्यादी प्रायोगिक एकांकिका प्रकाशित झाल्या आहेत. प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी नाट्यशास्त्र विषयावर अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत तसेच विपुल प्रमाणात संशोधन देखील केले आहे. केएस फाउंडेशन, नाशिक (MS) तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी यंदा मराठवाड्यातील एका अभ्यासू व्यक्तिमत्वाची निवड करण्यात आली आहे. हा मराठवाड्याच्या मातीतील कलावंताचा मोठा सन्मान आहे…!

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED