जन्मापूर्वीच वडील गमावलेली अभागी गौरी

नुकलताच गौरीचा सण झाला..गौरी ही समृद्धी संपत्तीचे प्रतिक आहे परंतु अनाथ विधवा झालेल्या कुटुंबात आज एका अभागी गौरीची भेट झाली. अश्विनी गिरी या महिलेच्या पतीचे कोरोनात निधन झाले. मे महिन्यात ६ महिन्याची गरोदर होती.२ ऑगस्टला तिला मुलगी झाली. जन्मापूर्वीच तिचे कोरोनाने पितृछत्र हरपले. मे महिन्यात बाळाची वाट पाहणाऱ्या अश्विनीला नवऱ्याचा मृत्यू बघावा लागला. त्या दुःखात तिने अडीच महिने काढले.मी कवी असूनही तिने गरोदरपणात शेवटचे दिवस कसे काढले असतील ? त्यातही तिला बीपी असल्याने सीझर करावे लागले. तीस हजार रुपये खर्च आणि नवर्‍याच्या आजारपणात सात लाख रुपये खर्च झाला..

गिरी कुटुंब भटक्या विमुक्त जमातीतील. शेतीही इनामी जमीन. अतिशय अल्प उत्पन्न. मुलगा कसा तरी पुण्यात एका कंपनीत नोकरीला लागला आणि ७ लाखाचे कर्ज करून कोरोनात आत्ता मृत्यू झाल्यामुळे पुणे सोडून आता गावाकडे यावे लागले.. अगोदरचा एक सहा महिन्याचा मुलगा आणि आता बाळंतीण होऊन झालेली ही अभागी गौरी

त्या महिलेला मुलीच्या जन्माचा आनंद घेता आला नाही. या मुलीच्या भवितव्याचे काय ? याचेच काहूर तिच्या चेहऱ्यावर भेसूरपणे मला दिसत होते. सिझर झाल्याने आता ती कामही करू शकत नाही.

तिची वृद्ध आई आज मजुरी करते. आमच्यासमोर नुकतीच ती कामावरून आली होती. तिची आजीही अजून जिवंत आहे. आजी आई आणि मुलगी तिघीही विधवा होऊन एकाच घरात राहत आहेत आणि कसेतरी घर चालवत आहेत.. अश्विनी ची आई सांगत होती तिचा मुलगा अडीच वर्षाचा असताना नवरा वारला आणि तिने शेतात मजुरी करून अश्विनीला पतीच्या भावाला बहिणीला वाढविले. मुलगा शिकवला मुलगी ही शिकवली आणि आज मुलींची लग्न झाली तर पुन्हा मुलीच्याही नशिबी तेच आले हे सांगताना तिचं मन भरून आलं…कोरानाने अनेक मृत्यू दाखवले परंतु कोरोनात कुटुंबातला हा जन्म बघून अधिकच वेदना झाल्या की त्या जन्माचे स्वागत करण्याच्या कोणीच मन:स्थितीत नाही फक्त ती गौरी मात्र या साऱ्या दु:खात अनभिज्ञ असल्याने आनंदाने हसत खेळत होती. तिचे ते हसणे सुद्धा गलबलून टाकत होतं

गौरी च्या भवितव्याची समाज म्हणून आपण जबाबदारी घेऊ या केवळ तिच्या नावावर एक विशिष्ट रक्कम तरी आपण सर्वांनी मिळून टाकली तरी सुकन्या योजनेत तिच्या नावाने पैसे गुंतवता येतील व किमान एका कुटुंबातील एका मुलीच्या जगण्याला आपण आधार देऊ शकतो… गौरीच्या भवितव्यासाठी आपण मदत करू इच्छित असाल तर माझ्या 9270947971 या google pay वर आपण जरूर पैसे पाठवा.. मी सर्व रकमेचा हिशोब सादर करीन. यावेळी सोबत माझे मित्र नितीन जोशी व श्रेयस जोशी होते..अडीच कोटी कुटुंबे असलेल्या महाराष्ट्रात ही २०,००० कुटुंब सावरणे नक्कीच कठीण नाही.

✒️लेखक:-हेरंब कुलकर्णी(मो:-8208589195)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED