मुक्तीसंग्राम लढ्याचे साक्षीदार असलेल्या १०३ वर्ष वर्षाचे भगवानबापु बोडखे यांच्या हस्ते सराटेवडगावचे ध्वजारोहन

24

🔸मराठवाड्याच्या अस्मितेसाठी झगडणाऱ्या युग पुरुषांचा अभिमान – प्रा.डॉ.राम बोडखे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21सप्टेंबर):-स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र आणि त्यात मराठवाड्याच्या मातीचा सुगंध सदैव दैवत राहिला आहे.येथील संतसाहित्य आणि पराक्रमाची जाज्वल्य राष्ट्र अभिमानाची ज्वलंत परंपरा यादृष्टीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्यासाठी यशस्वी केलेला लढा अंगावर रोमांच उभा करणारा आहे.या मातीच्या अस्मितेसाठी निकराचा लढा देत झगडणा-या असंख्य युगपुरुषांचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे अशा शब्दात सरपंच प्रा.डॉ.राम बोडखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथे मराठवाडा मुक्तीदिनाचेनिमित्त सकाळी येथील ज्येष्ठ नागरिक तथा मुक्ती संग्राम लढ्याचे साक्षीदार वय वर्ष १०३ वर्षाच्या भगवानराव दशरथ बोडखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रा.डॉ.राम बोडखे मनोगत व्यक्त करत होते.यावेळी उपसरपंच महादेव शिंदे यांच्यासह ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.सराटेवडगाव हे धार्मिक,सामाजिक,वैचारिकदृष्ट्या एक प्रगल्भ गाव आहे.येथे राष्ट्र अभिमानाच्या संदर्भातील विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.१७ सप्टेंबरच्या अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी या मातीचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो क्षण उभा करण्यासाठी त्या लढ्यातील एक साक्षीदार असलेल्या खुद्द १०३ वर्षाच्या भगवानबापु बोडखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन केले.तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा आले.

यावेळी तत्कालीन स्थितीतील अनेक आठवणी आणि किस्से कथन केले.दरम्यान,भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून सुटत नसल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन तत्कालीन गोविंदभाई श्राफ,स्वामी रामानंद तीर्थ,बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या महान भूमिपुत्रांनी निकराचा लढा आणि बौद्धिक चातुर्य वापरून मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र करण्याचे अनोखे धारिष्ट केले हे त्यांचे कार्य अत्यंत मौलिक असल्याचा गौरवही भगवानराव बोडखे यांनी बोलताना व्यक्त केला.यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————–
मराठवाड्याच्या मातीच्या
सुगंधाचा चैतन्यमय अविष्कार!
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या तत्कालीन लढ्यातील साक्षीदार असलेले सराटेवडगावचे १०३ वर्ष वयाचे भगवानराव बोडखे यांनी तत्कालीन लढ्यातील येथील नेते आणि कार्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगाचे वर्णन केले.मराठवाड्याच्या मातीशी इमान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालत केलेल्या या स्वातंत्र्यासाठीच्या धडपडीचे किस्से ऐकतांना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले ! स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचे प्रेरणादायी वातावरण या निमित्ताने निर्माण झाले.
– दत्ताभाऊ बोडखे,आष्टी