सुरजागड खाण मंजुरी आणि विस्फोटक वापराला व्यापक विरोध

🔹शेकाप,भाकपा,माकप, बीआरएसपी आविसं सह सरपंच संघटना, जिल्हा महाग्रामसभा, पारंपरिक इलाके आणि शेकडो ग्रामसभांनी घेतला आक्षेप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.२२सप्टेंबर):-लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड यांना सुरजागड येथे बळजबरीने ३४८.०९ हेक्टर क्षेत्रावर खाणीसाठी मंजुरी देण्यात आली असून सदर मंजुरीस आमचा आणि स्थानिक आदिवासी जनता ग्रामसभांचा कायमस्वरूपी विरोध असल्याने बळजबरीने खोदल्या जाणाऱ्या खाणीत स्फोटके वापराला आणि खाण मंजुरीला तीव्र आक्षेप असून खाण रद्द करा, अशी मागणी जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधाने हरकती मागविल्या होत्या. काल शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.डाॅ. महेश कोपूलवार,जिल्हा सचिव काॅ.देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, तालुकाध्यक्ष दिपक बोलीवार, तालुका महासचिव जितेन्द्र बांबोडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार यांनी सुरजागड खाण मंजुरी आणि विस्फोटक वापराबाबत विविध मुद्द्यांवर लेखी आक्षेप सादर केला.

आक्षेपात म्हटले आहे की, स्थानिक आदिवासी जनतेचा आणि पारंपरिक ग्रामसभांचा तीव्र आक्षेप व विरोध असतांनाही दि. २९/०५/२००६ रोजी पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागातर्फे नाहरकत देण्यात आली. आणि खाण व खनिज अधिनियम, वनसंवर्धन अधिनियम १९८०, पर्यावरण अधिनियम १९८६, जैविक विविधता कायदा २००२ आणि जैविक विविधता नियम २००४ चे उल्लंघन करून दि.०३/०५/२००७ रोजी लीज करारनामा करण्यात आला आहे. पंचायत उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार)अधिनियम १९९६ व त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे प्रकरण तीन – अ च्या कलम ५४ नुसार कोणत्याही प्रकारची चर्चा होवून नाहरकतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे ग्रामसभांना असलेल्या अधिकारांचे हनन करण्यात आले आहे.

सदर खाणीत एकाच वेळी वर्ग २ चे एस. एम.ई.- ६६२८ किलो,कास्ट बुस्टर – १३३ किलो आणि वर्ग ६ चे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स ७५ नग स्फोटासाठी वापरण्यात येणार असल्याने स्फोटाचे हादरे आणि कंपनामुळे परिसर उध्वस्त आणि बेचिराख होणार असल्याने आपल्या स्तरावरुन नाहरकत देणे योग्य नाही, असेही आपल्या आक्षेपात म्हटले आहे.

बळजबरी विविध मंजुऱ्या दिलेले खाण क्षेत्र हे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) मान्यता अधिनियम २००६ अन्वये माडिया या आमच्या कृषीपूर्व समाजाचे धारणाधिकार (Primitive Velnareble Tribal Groups) नुसार वसतीस्थानात येत असल्याने आणि सुरजागड,तोडसा,वेनहारा, भामरागड (बेज्जूर) पारंपरिक ईलाक्यांचा आजतागायत कृषीपुर्व धारणाधिकाराकरीता दावा दाखल करणे बाकी असल्याने खाण सुरू करणे आणि त्याठिकाणी स्फोटक वापरने हे भारतीय संविधानाच्या तरतुदींचे व त्यान्वये असलेल्या पंचायत उपबंध १९९६, वनहक्क कायदा २००६ आणि अन्य कायदे व तरतुदींचा भंग करणारे आहे.
त्यामुळे सक्षम प्राधिकारी या नात्याने लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड यांनी सुरजागड लोह अयस्क खाणीत खाण विस्फोटा करीता मागीतलेली नाहरकत प्रमाणपत्राची परवानगी नाकारण्यात यावी. तसेच सदर खाण कायमस्वरूपी रद्द करण्यास्तव केंद्रीय खाण मंत्रालय आणि खाण महानिदेशक, भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांना वतीने कळविण्यात यावे, अशी मागणीही या पक्षांनी आपल्या आक्षेपांमध्ये केली आहे.

दरम्यान स्फोटक वापराची नाहरकत नाकारुन सुरजागड खाण कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी स्थानिक शेकडो ग्रामसभा, पारंपरिक इलाके, जिल्हा महाग्रामभा संगठना, कोरची, कुरखेडा, धानोरा तालुका सरपंच – उपसरपंच संगठना, आदिवासी विद्यार्थी संघ यांनीही व्यापक विरोध करीत आक्षेप सादर केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED