कर्मवीर भाऊराव पाटील – एक महान समाज सुधारक

26

जो फक्त वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो,जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो,जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणसे जोडतो आणि जे माणसं जोडतात तेच आयुष्यात यशस्वी होतात.”महाराष्ट्रातील आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले.स्वतः सहावी शिकलेल्या कर्मवीरांनी बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका ‘हा विचार दिला आणि हजारो वर्षे दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला समता,स्वावलंबन व श्रम या तत्त्वांचा अंगीकार करावयास लावले.बहुजन समाजाला जातीपातीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे असा विचार करून बहुजन समाजाला साक्षर करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यभर अखंडपणे केले.त्यांची २२ सप्टेंबर या दिवशी जयंती.त्यानिमित्त त्यांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन ….…!

कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म त्यांच्या आजोळी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ साली झाला.भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील तर आई गंगाबाई .त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी झाले नंतर त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.तेथे जैन बोर्डिंगमध्ये राहत लहानपणापासूनच भाऊरावांना कुस्ती,मल्लखांब,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड होती.त्यामुळे त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यात राहण्याची संधी मिळाली.त्या काळी महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीचे वारे वाहत होते.शाहू महाराज हे त्यात प्रमुख होते.भाऊराव पाटील देखील सत्यशोधक चळवळीमध्ये सामील झाले.शिक्षण संपल्यावर सातारा येथे त्यांनी इंग्रजी विषयाची शिकवणी घेतली.परंतु कोल्हापूरमध्ये पुतळ्याला कुणी तरी डांबर फासले होते.त्याची खोटी साक्ष द्यावी म्हणून भाऊरावांना सांगितले गेले.परंतु त्यांनी सत्यनिष्ठा सोडली नाही त्यामुळे त्यांना चार महिने तुरुंगवास झाला.भाऊराव सत्यनिष्ठ होते.बालपणापासूनच त्यांची कामावर निष्ठा होती.

त्यांच्या गुणांमुळे त्यांना किर्लोस्कर कंपनी मध्ये नोकरी मिळाली.परंतु बहुजन समाजाच्या सर्व हालअपेष्टा दुःख त्यांनी जवळून पाहिले होते.त्यांच्या दुःखांचे मूळ कारण अज्ञान आहे हे भाऊरावानी ओळखले म्हणूनच ज्ञानप्रसार करण्यासाठी त्यांनी १९१० मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.कर्मवीर भाऊराव पाटील किर्लोस्कर कारखान्यात असताना नोकरी बरोबरच ते सत्यशोधक चळवळीचे काम करत होते.या चळवळीच्या माध्यमातून ज्ञान प्रसार व्हावा असा त्यांचा आग्रह होता यातूनच सन १९१९ साली त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.जुन्या रूढी परंपरांना फाटा देऊन नवविचार समाजात निर्माण करणे,मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा प्रसार प्रसार करून त्यांना स्वावलंबी,उद्योगी,उत्साही व शीलवान बनवणे हे काम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून हाती घेतले.मोफत वसतिगृह सुरू केले.त्यासाठी त्यांनी मुष्टीफंड ही अभिनव योजना सुरू केली.मुष्टीफंड म्हणजे गावातील प्रत्येकाने मूठभर धान्य वस्तीगृहातील मुलाकरता बाजूला काढून ठेवायचे.त्याकाळी धान्य मुबलक होते या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला.सत्यशोधक चळवळीचा प्रसार सभा-संमेलने कुस्त्यांचे फड खेळ इत्यादींमधून केला जाई.त्यात भाऊराव आघाडीवर होते.भाऊराव सत्यशोधक चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते होते.त्यांनी सातारा येथे स्वतःच्या घरी बोर्डींग हाऊस सुरू केले.जातीविरहित वसतीगृह त्यांनी चालवले.रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष आहे.संस्थेची कुठेही शाखा सुरू केली कि ती वाढते.

समाजाची सर्वांगीण प्रगती हाच शिक्षणाचा उद्देश आहे.भाऊरावांनी समाजामध्ये समता,बंधुता व न्याय या तत्वांची वाढ व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण संस्थेची स्थापना केली.त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारने इसवी सन १९५९ साली पद्मश्री तर पुणे विद्यापीठाने डि.लीट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.ज्ञानगंगा झोपडीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना यशवंतराव चव्हाण म्हणतात,कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती संस्था होती.बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले.त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन देणारी गंगा आहे.थोर समाज सुधारक भाऊराव पाटील यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन….!

✒️लेखक- बाळासाहेब सोनसळे सर (९४२३३५२७०८)

▪️संकलन:-(आष्टी प्रतिनिधी,सौ.सरस्वती लाड)