विद्यार्थी घडेल अशी शिक्षण व्यवस्था असावी!

पूर्वीच्या शिक्षण पद्धतीच्या तुलनेत  हल्लीच्या शिक्षण पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. जीर्ण कौलांच्या शाळा जाऊन रंगबिरंगी आणि तीन चार मजल्यांच्या पक्क्या बांधकामांच्या शाळा आल्या. गुरुजी आणि बाई जाऊन सर आणि मॅडम आल्या. मातृभाषा जाऊन आंग्ल भाषेचा प्रभाव वाढायला लागला. सर्वांना परवडेल अशा शुल्कात किंवा मुफ्त शिक्षण जाऊन लाखोंच्या घरात वर्षाचे शुक्ल असलेले कॉन्व्हेन्ट आले. बालवाड्या जाऊन नर्सरी आली. आपुलकीने अर्धा तास थांबवून शिकवणारे गुरुजी जाऊन शाळेत न शिकवता बाहेर खासगी शिकवणीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल करणारे सर आले, मॅडम आल्या. शुभंकरोती, नाच रे मोरा जाऊन जॉनी जॉनी एस पप्पा आलं. आणि आता तर कोरोनामुळे त्याही पलीकडे एक पाऊल पुढे जात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा लागेल अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबून पालकांच्या खिशाला चंदन लावले. मैदानी खेळ जाऊन मुलांच्या हातात मोबाईल आला.

या सर्व कालावधीत मराठी शाळा बंद पडून आंग्ल शाळांचा उदो उदो झाला. भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला. शिक्षकांना एकेकाळी आदर्श मानल्या जात होते, त्यातूनच गुरू पूजन, शिक्षक दिवसा सारखे  उत्सव साजरे व्हायला लागले. अजूनही शिक्षकांच्या पायावर डोके ठेवून साष्टांग दंडवत घालणारे विद्यार्थी आणि त्याच योग्यतेने,तळमळीने विद्यार्थी घडवणारे शिक्षक सुद्धा शोधले तर सापडतील. पण, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षिकेची छेड काढली, अपशब्द बोलले, प्रसंगी त्याला रागावले तर चक्क शस्त्रांचा वापर करून जिवेनिशी मारण्याचा प्रयत्न केला, अशा बातम्या वाचल्या तर समाजमन सुन्न होऊन जातं.पूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल त्याला शिक्षा दिली तरी घरचे बोलत नव्हते. पण, कायद्यांत बदल झाला आणि विद्यार्थ्यांच्या पुढे शिक्षक लाचार झाला. त्यातून अभ्यासात मन न लागणाऱ्या आणि शाळा महाविद्यालयांना फक्त मौजमजा करण्याचे स्थळ समजणाऱ्या विद्यार्थ्यांचे फावले आणि ते नुसते टाईमपास करायला लागले. याला खतपाणी देण्याचे काम दिले ते आपल्या चित्रपट सृष्टीने. मनोरंजनाच्या नावाखाली काहीही दाखवायचे आणि ही आजची गरज आहे, असे बोलून जायचे. पण, या सर्वांचे समाजावर काय विपरीत परिणाम होतात, या गोष्टींकडे निर्माता, दिग्दर्शकांचे काहीच लेणे देणे नाही.

नुकतेच दिल्लीच्या बपरोला गावातील एका महाविद्यालयात दोनदा बारावीत नापास झालेल्या ललित नावाच्या एका विद्यार्थ्याला वर्गात फक्त नीट बस म्हणून विक्रांत नामक शिक्षकाने रागावले असता या गोष्टीचा राग मनात धरून ललितने शिक्षकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. संबंधित शिक्षकावर उपचार सुरू आहेत. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले असले तरी हल्ली अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. काही विद्यार्थी तर चक्क वर्गात शस्त्र घेऊन बसतात तर अनेकांच्या खिशात अंमली पदार्थ असतात,ही सत्य परिस्थिती आहे.

आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आमच्या एमआयडीसी मध्ये बाहेर जिल्ह्यांतून किंवा राज्यांतून शिक्षणाच्या नावाखाली आलेल्या काही मुली चक्क विदेशी दारुंचे घोट रिचवतांना दिसून येत होत्या. नागपूर सारख्या शहरात सुद्धा याची लागण झालेली आहे. त्यामुळे आता भारतीय शिक्षण म्हणजे निव्वळ अनागोंदीकडे वाटचाल करते की काय, असे वाटायला लागले आहे.समाजाचे आदर्श म्हणजे शिक्षक सुरक्षित रहावे आणि ज्ञान मंदिरे म्हणजे शाळा पवित्र असाव्यात यासाठी शासनाने,तसेच शाळांनी आपल्या दृष्टीने  काही उपाययोजना केल्या तर येत्या काळात सुध्दा विद्यार्थी घडतील अन्यथा बिघडतील,हे नक्की.

✒️लेखक:-लिलाधर दवंडे(८४१२८७७२२०)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED