अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असलेल्या नोंदणीकृत संस्था/प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज आमंत्रित

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23सप्टेंबर):-अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत वर्ष 2021-2022 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मुस्लिम, बौध्द,ख्रिश्चन, शिख,पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असलेल्या नोंदणीकृत संस्था/प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव राहील. जिल्हयातील निवडलेल्या 100 प्रशिक्षणार्थीना पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे. सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना अंकगणीत, सामान्यज्ञान, चालु घडामोडी, बुध्दीमता चाचणी, मराठी भाषा व शारीरीक क्षमता या विषयांचे प्रशिक्षण देऊन पोलीस भरती पूर्व परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेणे. प्रशिक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांचेशी समन्वय साधुन प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करणे.

प्रशिक्षणासंदर्भातील (प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांचे) हजेरीपट, पत्रव्यवहार, अहवाल लेखे इ. परिपूर्ण ठेवणे .
प्रशिक्षण संस्थांच्या निवडीसाठीचे निकष पुढील प्रमाणे राहतील, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रशिक्षण संस्थेची शिफारस शासनाकडे करतील. संस्था नोंदणीकृत शैक्षणीक संस्था/प्रशिक्षण संस्था असावी. संस्थेस प्रशिक्षण विषयक कार्याचा किमान तीन वर्ष अनुभव असावा, संस्थेकडे प्रशिक्षणार्थीना मराठी भाषा आणि शारीरीक क्षमता या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षण असणे, वर्ग खोल्या (50 प्रशिक्षणार्थी साठी एक या प्रमाणे) उपलब्ध असणे, ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे आणि खेळाचे मैदान इ. सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहील.

प्रशिक्षण संस्थांना देय प्रशिक्षण शुल्क :-निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरीता सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमता चाचणी, मराठी भाषा आणि शारीरीक क्षमता हे विषय शिकविण्याकरीता दोन प्रशिक्षकांसाठी प्रतिमाह रू.30,000/- प्रमाणे दोन महिण्यासाठी रूपये 60,000/-(रूपये साठ हजार फक्त) एवढे मानधन देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षणार्थीना द्यावयाचे वाचन साहित्य आणि प्रशासकीय बाबींसाठी संस्थेस प्रत्येक प्रशिक्षणार्थी रूपये 300/- प्रमाणे अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान चाहापान व अल्पोपहार देण्यासाठी होणाऱ्या खर्चापोटी रूपये 15/- प्रतिदिन प्रति प्रशिक्षणार्थी एवढे अनुदान प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल. गणवेश साहित्यासाठी (गणवेश, बुट, मोजे, बनियन इ.) प्रत्येक प्रशिक्षणार्थीस रूपये 1000/-(रूपये एक हजार फक्त) एवढे एकरकमी अनुदान देण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत- उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत खालीलप्रमाणे राहील. इच्छूक संस्थांनी आपले अर्ज संस्थेच्या लेटरहेडवर टंकलिखित करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे.

अर्जासोबत नोंदणीचा दाखला, संस्थेची नियमावली, शैक्षणीक/प्रशिक्षण विषयक कामाचा अनुभव संस्थेकडे उपलब्ध अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षक यांची सविस्तर माहिती इ. कागदपत्राच्या प्रति जोडाव्यात. इच्छुक संस्थांनी आपले अर्ज सिलबंद लखोट्यामध्ये बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत. लखोट्याच्या वरच्या बाजुस ठळक अक्षरात पोलीस भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी अर्ज असे
लिहिलेले असावे.इच्छुक संस्थांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत.

जिल्हाधिकारी, निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून देतील आणि अशा प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी यांनी विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपासुन सुरू करणे, निवडलेल्या संस्थेवर बंधनकारक राहील. अंतिम निवड झालेल्या संस्थांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात रूपये 100/- च्या अन्यायिक मुद्रांक पेपरवर विहीत नमुन्यामध्ये करारनामा करावा लागेल. या बाबतीत अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली कळवितात.
****