पौळ पिंपरीत शॉर्टसर्किटमुळे 10 एकर ऊसा जळून खाक; महावितरणची पंचनामा करण्यास टाळाटाळ

28

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.24सप्टेंबर):-शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे तब्बल दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना पौळ पिंपरी येथे घडली असून शेतकऱ्यांना महावितरणने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.बबन नरहरी पौळ व यूवराज बालासाहेब पौळ या दोन शेतकऱ्यांनी दहा एकर उसाची लागवड आठ ते दहा महिन्यापूर्वी केली होती.मात्र दोन तीन दिवसापूर्वी शेतातून जात असलेल्या विद्युत तारांमध्ये अचानक स्पार्किंग झाली. त्यामुळे उभ्या ऊसाने अक्षरशः पेट घेतला.सकाळची वेळ असल्यामुळे आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.पण आगीने उग्र रुप धारण केले.या वेळी दोन शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळून खाक झाला.

सध्या साखर कारखाने सुरू नसल्यामुळे जळालेल्या उसाचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.या नुकसानीची दखल महावितरणने घेत पंचनामा करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होऊ लागली आहे. उसाचे पीक घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज देखील घेतले आहे कृषी विभागाने पंचनामा केला असला तरी महावितरण अडेलतट्टू ची भूमिका घेत याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.