संघर्षाची मशाल पेटवा..!

23

🔸जिजाऊ ब्रिगेडचे खुले आवाहन…

राजकारणात एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप, वाद तसे सर्वपरिचितच. महिला सुरक्षेचा प्रश्न तसा ऐन निवडणुकांच्या काळात विशेष रंगताना दिसायचा. मात्र हल्ली याचेही वेळापत्रक बदललेले दिसते. या आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षिततेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आज माणुसकी नावाला उरलेली नाही. स्वार्थीपणा आणि वासनापूर्तीतून जीवन काळवंडले जात आहे. ज्या भूमीत स्त्रीला मातेचा, देवीचा दर्जा दिला जातो त्याच देशात तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत. नवरात्रीत नऊ दिवस तिची पुजा करायची…आता काही दिवसात नवरात्रौत्सव सुरू होणार आणि मग स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारे हेच लोक देवीचे गुणगाण गातील, पुजाअर्चा करतील. आपण जिथे राहतो तीला भू-माता, भारत माता म्हणतो; पण आपण खरच भू मातेला ते स्थान देतो का? मानसिक विकाराने ग्रासलेल्या नराधमांच्या वासनेची स्त्री बळी पडत आहे. आपण जिच्या पोटी माणूस जन्म घेतो तिच्याच सुरक्षिततेचे आज तीनतेरा वाजवले जात आहेत. रोज गँगरेप सारख्या घटना ऐकून मन सुन्न होतेय. जग मानसिक विकारांच्या लोकांनी इतकं व्यापून गेलंय की कोण कशा नजरेने, कोणत्या हेतूने पाहतोय हे समजणे कठीण झाले आहे.

आपल्या राज्यात हल्ली बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. प्रशासनाने या प्रश्‍नी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. पण खरंच राज्यकर्ते बोलतात तसे स्त्री सुरक्षिततेविषयी ते गंभीर आहेत काय? हा खरं तर यक्ष प्रश्‍न आहे. ८ मार्चला सरकारी पातळीवर जागतिक महिला दिन साजरा करायचा, पण तो एक दिवस सोडला तर बाकीचे ३६४ दिवस महिलांचे या स्पर्धेच्या युगात स्थान काय? तिचा सन्मान कायम ठेवण्यासाठी सरकारकडे काय तरतुदी आहेत? बलात्काऱ्यांना वेळीच आवरण्यासाठी कडक कायदे, त्वरित कठोर शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी मागणी वर्षानुवर्षे होत आली आहे. अशातच ‘शक्ती’ कायदा पारित करण्यात आला पण अजून तो नियम पोट नियमांमध्येच अडकून धुळ खात पडला आहे . परंतु सामाजिक मानसिकता बदलून स्त्रीवर्गाला सुरक्षिततेची हमी मिळाली नाही. काल-परवाच साकीनाका बलात्कार प्रकरण घडलं. ते होत नाही तोच डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी गँगरेप केला. काय चाललंय काय या महाराष्ट्रात?प्रत्येक पक्ष एकमेकांना खो देत बसला आहे.

महिला आयोगाला वाली नाही, त्यातही राजकारण सुरू आहे. एक तर महिला सुरक्षित नसताना महिला आयोगाचे अध्यक्ष कोणाला करायचे, यावरून वादंग उठलाय. जर पक्षाचा वाद होत असेल तर *जिजाऊ ब्रिगेडकडे महिला आयोगाची जवाबदारी देण्यास सरकारला काय हरकत आहे?* सरकारला महिला आयोगासाठी योग्य ती आणि निष्पक्षपातीपणे काम करणारी महिला अध्यक्ष देण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी सरकारने जिजाऊ ब्रिगेडशी संपर्क साधावा… जिजाऊ ब्रिगेडशिवाय स्त्री आर्थिक सक्षमीकरणाविषयी कृती कार्यक्रम आहेत तरी कोणाकडे? यासाठी आमने-सामने चर्चा देखील करण्यास आम्ही तयार आहोत? सर्वच राजकीय पक्षांनी स्त्रियांचा वापर केवळ मतदार म्हणून केला, नव्हे मते घेऊन फसवणूकच केली. सामाजिक संघटनांनी प्रश्न विचारावे, निवेदने द्यावीत, तर सरकारदरबारी त्यालाही केराची टोपली…सध्या जे महिला अत्याचारावरून राजकारण सुरू आहे, हे पाहून खरच किव येते अन रडू ही…

गॅस दरवाढ, इंधनाच्या किमती गगनाला भिडताहेत, बेरोजगारीचा विळखा, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा इतके सगळे महत्त्वाचे कळीचे मुद्दे सोडून सत्ताधारी आणि विरोधक नको ती फाजील वक्तव्ये करतायत.महिला सुरक्षा हा राजकारणाचा मुद्दा बनत चाललाय. पिडितेला न्याय तर मिळतच नाही, उलट सत्ताधारी आणी विरोधक एकमेकांचे जाहीर वस्त्रहरण करण्यात गुंग आहेत. एकीकडे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते केंद्राच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीच्या भितीने हैराण आहेत. एकूण काय तर जनतेला आणि विशेषतः महिलांना कोणी वाली नाही. नविन चेहरा राजकारणात येऊ दिला जात नाही. तेच लोक, तेच पक्ष; सत्ताबदल झाला की इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात. त्यामुळे जर पारदर्शी, स्वच्छ, नितळ प्रशासन हवे असेल तर आम्ही देऊ योग्य त्या महिलांना संधी…आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, रडण्यापेक्षा आम्ही लढणे जाणतो व लढून जिंकणे जाणतो.

सत्तेतील व विरोधी पक्षातील लोक जे मिळून देणार नाहीत ते आम्ही देऊ, कारण…

आता झेंडा ही आमचा आणि दांडाही आमचा.
का म्हणून पुरोगामी महाराष्ट्राची एक स्त्री मुख्यमंत्री असू शकत नाही?* आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने महिलेला मुख्यमंत्रीपदाचा मान दिलेला नाही. महिलाविषयक धोरण तयार करणाऱ्यांमध्ये किती स्त्रीया सहभागी असतात? या सर्व पार्श्वभूमीवर
*मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी संभाजी ब्रिगेडमध्ये आगामी निवडणुकीत महिलांना प्रथम प्राधान्य देण्याची, इतकेच नव्हे तर संभाजी ब्रिगेडची सत्ता आल्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान हा महिलेला दिला जाईल, अशी घोषणाही खेडेकर साहेबांनी केलीय.

त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त माता-भगिनींना जिजाऊ ब्रिगेडचे खुले आवाहन आहे, की आता लढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडबरोबर मैदानात उतरा..!
महिलांपुढील जी आव्हाने दस्तक देऊन उभी आहे, त्या विरोधी लढाई तिव्र करण्याची ताकद तिला मिळावी यासाठी जिजाऊ ब्रिगेडने आता महिलांसाठी व्यवस्थापरिवर्तनाच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. स्त्रियांच्या उत्थानासाठी तसेच लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी प्रयत्न केले त्या राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, फातिमाबी, रमाई, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महान विचारधारा असलेल्या हस्तींनी संघर्षाची मशाल पेटवली ती पेटवत ठेवण्याची जबाबदारी एका मातेची आहे हे लक्षात ठेवा…आणि आपल्याला गुलामीत ठेऊ पाहणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पुढे या….

✒️माधुरी भदाणे,प्रदेशअध्यक्ष,जिजाऊ ब्रिगेड,महाराष्ट्र(संपर्क:-7588175870,9834633719)