सत्यशोधक समाज

(२४ सप्टेंबर – सत्यशोधक समाज स्थापना दिवस विशेष लेख)

आपल्या देशातील अनेक समाजसुधारकांनी वेगवेगळ्या पंथ तथा संस्थांची स्थापना केली.आर्य समाज, ब्राह्मो समाज,भारत सेवक समाज, प्रार्थना समाज . मात्र, यामध्ये बहुजनांचे हित होईल, अंधश्रद्धा कर्मकांडातून समाज बाहेर पडेल, असे फार काही नव्हते.सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी, या देशातील शोषित वंचित पीडित समाजाला जागृत करण्यासाठी एखादे विचारपीठ असावे म्हणून तात्यासाहेब राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची (सप्टेंबर १८७३) स्थापना केली.सत्यशोधक समाजाने प्रमुख तीन तत्त्वे स्वीकारली होती.

१. निर्मिक म्हणजे ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व इतर प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत.

२- ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला पूर्ण अधिकार आहे.आईवडीलांची सेवा करण्यास किंवा त्यांना संतुष्ट करण्यास जशी मध्यस्थाची आवश्यकता नसते,तशी परमेश्वराची भक्ती करण्यास भट दलालाची आवश्यकता नाही.

३- मनुष्य जन्माने ( जातीने ) श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो.

मानवी उत्कर्षाचे व स्वातंत्र्याचे सत्यतत्त्व तात्यासाहेबांनी सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या तत्त्वात प्रतिपादन केले आहे. ह्या गोष्टी लक्षात घेता सत्यशोधक समाजाची किती उदार, समतोल व सत्यमय तत्वे आहेत, याची कोणासही कल्पना येईल.

लग्न, मृत्यु आदि संस्कार भट दलालांच्या मध्यस्थीने संस्कृत भाषेतून करवून न घेता, मातृभाषेतून करता यावे म्हणून आपल्या भाषेतून मंगलाष्टके प्रसिद्ध केली. मनुष्य म्हटल्याबरोबर उच्चार न करताही जसा त्याचे हात, पाय, डोके इ. अवयवांचा बोध होतो, तसाच ‘ सत्यशोधक समाज ‘ म्हटला म्हणजे तेथे गुलामगिरीचा नायनाट, स्त्री जातीच्या मानवी हक्काचा पुरस्कार, शिक्षणाची चळवळ, दीन-दुबळ्या, आंधळ्या -पांगळ्या वर भूतदया, सत्यवर्तन, सत्यनिष्ठा, स्वातंत्र्य या गोष्टींचा आपोआपच बोध होतो.

अशा सत्यशोधक समाज स्थापनेची चर्चा सगळीकडे पसरली. त्याचे धोरण व उद्देश काय आहेत ? हे समजून घेण्यासाठी लोक रोज तात्यासाहेबांकडे यायचे. सुरुवातीला चळवळ फार फोफावली. अनेक लोक यात जुळले. सन १८७६ मध्ये सभासद संख्या ३१६ झाली होती. समाजोपयोगी कार्यही वेगाने होत होती. ब्राम्हणात मात्र पुन्हा खळबळ उडाली. धर्म बुडाला, पृथ्वी प्रलय आता नक्की होणार, हा धर्मद्रोह आहे, ब्रम्हद्वेश आहे, हा कलीचा महिमा आहे,असे ते घरोघर जाऊन लोकांना सांगू लागले. कोणी सत्यशोधक समाजाचा सभासद झाला किंवा होणार आहे ,असे समजल्यास त्याच्या घरी जाऊन त्याच्या भोळ्या आईबापास किंवा त्याच्या बायकोला ब्रम्हनिंदेची व ब्रम्हशापाची भीती घालून सत्यशोधक समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत. एखादा सरकारी नोकर सभासद झाला तर त्याच्या खात्यातील लहान मोठे सर्व भट अधिकारी त्याच्या विरोधात खोटेनाटे आरोप लावून, गोऱ्या साहेबांस त्याच्या चुगल्या सांगून नोकरीवरून काढायला भाग पाडीत. अशाही स्थितीत तात्यासाहेब डगमगले नाही. असल्या फुसक्या विरोधाला भिवणारे कच्च्या हिंमतीचे नव्हते. पुढे सत्यशोधक समाजाच्या अनेक शाखा झाल्या. पुणेला मुख्य शाखा होती.

धनंजय कीर यांच्या मते ,’ आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व पुनर्रचनेची मागणी केली. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले ज्या माळी जातीतील आहेत ,आज त्या जातीतील अनेक लोक शिकुन साक्षर झालेले आहेत. लहान मोठ्या पदावर आहेत, मात्र फुलेंच्या विचारांपासून दूर गेलेले आहेत.( जे विचारांशी जुळले आहेत, त्यांना वंदन ) जे खाऊन पिऊन सुखी आहेत, ज्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याची गरज वाटली नाही, फुलेंनी आमच्यासाठी काहीच केले नाही असे समजून , तात्यासाहेबांना दलितांचे कैवारी समजून , फुले दलितांना दत्तक दिल्याचे सांगून ,फुलेंच्या विचारांशी प्रतारणा करीत आहेत. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,सनातन संस्था यांसारख्या ब्राम्हण पुरस्कृत कट्टरवादी संघटनांची पालखी वाहण्यात स्वतः ला धन्य समजतात. फुलेंच्या फोटोला मालार्पन करणारी पण ब्राम्हणी विचाराने ग्रासलेली अर्थात भटाळलेली जमात नव्याने निर्माण झालेली आहे.

ग्रामीण भागातील धार्मिक अवडंबर तसेच दशक्रिया, वर्षश्राद्ध , सत्यनारायण, नारायण नागबळी, शनीपूजा इ. देवाधर्माच्या, तीर्थयात्रेच्या निमित्ताने अनुत्पादित खर्च करण्यात गढून गेलेला आहे. यामुळे अर्थसंकटात सापडला आहे. विस्कळीत असलेला, सुस्त पडलेला, नेतृत्वहीन समाज आहे. त्याच्या धार्मिक , सांस्कृतिक परिवर्तनासाठी , त्यांना वैज्ञानिक दृष्टी येण्यासाठी तात्यासाहेबांच्या चळवळीला गतीशील केल्याशिवाय अन्य पर्याय नाही.

संदर्भ –
▪️महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्र. ले. पंढरीनाथ सि. पाटील.
▪️क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले. ले. नवनाथ शिंदे
▪️सत्यशोध. ले. प्रा. श्रीकृष्ण बनसोड.

✒️लेखक:-अशोक मांदाडे, गडचिरोली

▪️संकलन – पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल धरणगाव)

आध्यात्मिक, गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED