महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लागला ब्रेक

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.24सप्टेंबर):-शांततेकडून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ रोजी करण्यात आला. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाल्याने गावागावात शांतता निर्माण झाली होती. ग्रामीण भागात छोट्या-छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण व्हावे, यासाठी ही मोहीम कामात येऊ लागली.

तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावातून निवडण्यात आलेले तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष आदींच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद या मोहिमेत नमूद असल्याने ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.

यासाठी शासनाने पुरस्कार घोषित केल्याने गावातील समस्त जनता एकोप्याने कामाला लागली. लोकांच्या एकजुटीने गावागावात शांतता निर्माण व्हायला लागली. चांगले काम केल्याने गावाला पुरस्कार घोषित करण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम थंडबस्त्यात गेल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव झाल्याने ही मोहीमच शांत पडली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED