आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजला गुणगौरव सोहळा

27

🔹जास्त वेळ देवून काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव होत असतो – सुधाकर यादव

🔸कन्या शाळा गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा – सुरेश पवार

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25सप्टेंबर):-जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,जि.बीड या शाळेतील आदर्श शिक्षक सतिष दळवी(जि.प.बीड आदर्श शिक्षक),सुरेश नरोड(लोकप्रभा आदर्श शिक्षक),श्रीम.सुरेखा कुटे(स्वामी विवेकानंद पतसंस्था आदर्श शिक्षिका)यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोवीड चे सर्व नियम पाळून शुक्रवार दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी शाळेच्या सायन्स हाँल मध्ये केले होते.

गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा आष्टी नं.१ केंद्राचे मुख्याध्यापक सुरेश पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आष्टी पं.स.चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,भाऊसाहेब आहेर,आदर्श शिक्षक स्वानंद थोरवे,जेष्ठ शिक्षिका भाग्यश्री भापकर,धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख बी.टी.मस्के उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आष्टी पं.स.चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ देवून काम करणाऱ्या शिक्षकांचा नेहमीच गौरव होत असतो.म्हणूनच या शाळेतील तिघांनाही आदर्श शिक्षक म्हणून गौरवले गेले ही गोष्ट अभिमानास्पद आहे.कन्या शाळेचा मोठा नावलौकिक असून आगामी काळातही तो टिकून ठेवण्यासाठी जास्तीचे प्रयत्न व्हावेत असेही ते शेवटी म्हणाले.तसेच अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सुरेश पवार म्हणाले की,कन्या शाळा ही गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा असून अनेक उच्चविद्याविभूषित शिक्षकांची परंपरा असलेली शाळा आहे.

शाळेची गुणवत्ता कायम टिकण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त वेळ शाळेसाठी देवून प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे.यावेळी आदर्श शिक्षक स्वानंद थोरवे बोलतांना म्हणाले की,सतिष दळवी हे सहल विभाग,पर्यवेक्षकीय तासिका नियोजन व इंग्रजी अध्यापक म्हणून नेहमीच उत्कृष्ट शिक्षक राहिलेले आहेत.तर हिंदी विषयाचे उत्तम शिक्षक तथा सांस्कृतिक विभागाचे नियोजक म्हणून सुरेश नरोड यांचे काम उल्लेखनीय असून श्रीम.सुरेखा कुटे यांचे गणित विषयक अध्यापक म्हणून तसेच या शाळेत जेंव्हा सेमी वर्ग अध्यापनास सुरुवात झाली तेंव्हा पहिल्यांदा श्रीम.कुटे मँडम यांनी सेमी गणित अध्यापन करुन महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.याप्रसंगी भाऊसाहेब आहेर यांनीही आपली मनोगते व्यक्त करुन सत्कारमुर्ती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली तसेच स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात येवून प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तद्नंतर शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीम.आशाताई शिंदे यांनी गुणगौरव सोहळ्याचे प्रास्तविक केले.

प्रास्तविका नंतर शाळेतील आदर्श शिक्षक सतिष दळवी(इंग्रजी विषय शिक्षक),सुरेश नरोड(हिंदी विषय शिक्षक),श्रीम.सुरेखा कुटे(गणित विषय शिक्षक)यांचा अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी शाळेतील शिक्षकांच्या मुलांची वेगवेगळ्या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल अनुक्रमे श्रेयश सतिष दळवी(प्रज्ञाशोध),सिद्धेश देविदास शिंदे(प्रज्ञाशोध),श्रीहरी आदिनाथ औटे(मंथन),सुयश गणेश मोकाशे(एनएमएमएस)यांच्या पालकांचा यथोचित सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.तसेच यावेळी कन्या शाळेतील इंग्रजी विषयाचे माजी शिक्षक स्वानंद थोरवे व वृक्षमित्र रंगनाथ आण्णा धोंडे यांच्या वतीने श्रीम.आशाताई धोंडे यांनी सत्कारमुर्ती तिनही आदर्श शिक्षकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.

याप्रसंगी श्रीम.लतिका तरटे मँडम,देविदास शिंदे,श्रीम.स्वाती खेत्रे मँडम यांनी मनोगत व्यक्त केली.तसेच यावेळी सन्मानाला उत्तर सतिष दळवी,सुरेश नरोड,श्रीम.सुरेखा कुटे यांनी देवून शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.सदरील गुणगौरव सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचलन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले तर आभार आदर्श शिक्षिका श्रीम.ज्योती शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,प्रशिक्षक भागवत वायाळ,कर्मचारी संतोष धोंडे,श्रीम.मनिषा पिंपरे,श्रीम.सावित्रा जाधव यांनी कठोर परिश्रम घेतले.