पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरा-उपसरपंच उमेश राजूरकर

27

🔸तंटामुक्त समित्या नाममात्र

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.25सप्टेंबर):-जनता व प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे पद म्हणजे पोलीस पाटील होय. कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत सात गावामधील पोलिस पाटलांची पदे गेल्या दहा वर्षापासून रिक्त असल्याने ती तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी उपसरपंच उमेश राजूरकर यांनी गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले व आमदार सुभाष धोटे यांना निवेदनातून केली आहे.

गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमणी,बाखर्डी, लखमापूर, नवेगाव, नोकारी, गोवारीगुडा, बैलमपूर या गावांची पोलीस पाटील ही पदे मागील दहा वर्षांपासून भरण्यात आली नाही. ही पदे रिक्त असल्याने पोलीस पाटलांना आपल्या गावासह अतिरिक्त गावाचा पदभार असल्याने त्यांच्या समोर बरेच प्रश्न निर्माण होतात.

त्यामध्ये मयत वारसांन दाखला देणे, समत्ती पत्र देणे, अश्या अपुऱ्या माहितीमुळे कठीण झाले आहे. तसेच गावं दूर असल्याने पोलीस पाटलांना तेथील माहिती गोळा करतांना मोठी दमछाक होत आहे. तर तंटामुक्त समित्या मात्र नाममात्र राहिल्या आहे. त्यामुळे ही पदे भरणे गरजेचे आहे.ही बाब लक्षात घेऊन रिक्त पोलीस पाटलांची पदे तात्काळ भरावी अशी मागणी निमणी ग्रामपंचायत उपसरपंच उमेश राजूरकर यांनी केली आहे.