कर्मकांडी उचापती: कदापि ना मुक्तिप्राती

30

(विश्वग्रंथ ज्ञानेश्वरी जयंती विशेष)

भाद्रपद कृष्ण षष्ठी शालिवाहन शके १२१२ अर्थात इ.स.१२९० साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच Pज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील संत ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. हा गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत- गीर्वाण वाणी, हिंदी, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते छापील ग्रंथ उपलब्ध आहेत. या विलक्षण ग्रंथावरील बापू उर्फ श्रीकृष्णदास निरंकारी यांचा हा माहितीपूर्ण लेख अवश्यच वाचा. – संपादक.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी ग्रंथाचे नामकरण ‘भावार्थदीपिका’ केले होते. परंतु पुढे सर्व संतमंडळींनी ग्रंथाचा उहापोह, ख्याती व महती ही ग्रंथ रचयित्याच्या नावाप्रमाणे म्हणजेच ‘श्रीज्ञानेश्वरी’ म्हणून केली. आजही तो ग्रंथराज ‘श्रीज्ञानेश्वरी’ नावानेच प्रसिद्ध व सर्वश्रुत होऊन संतांच्या हृदयात डौलाने मिरवत आहे. या महद्ग्रंथाची रचना मोठ्या पोटतिडकीने, आंतरिक तळमळीने आणि विश्वकल्याणाच्या उदात्त भावनेने झाली आहे. हे आपणास चिकित्सक अध्ययनाने व ग्रंथमंथनातून कळून येईल-

“माझा मराठाचि बोलु कौतुकें।
परि अमृतातेही पैंजा जिंकें।
ऐसि अक्षरे रसिकें। मेळविन।।”
[पवित्र श्रीज्ञानेश्वरी: अध्याय ६वा: ओवी क्र.१४].

श्रीमद्भगवद्गीता या हिंदूंच्या पवित्र ग्रंथातील आध्यात्मिक विषयानुसार एकूण १८ अध्याय- १) अर्जूनविषाद २) सांख्ययोग ३) कर्मयोग ४) ब्रह्मार्पणयोग ५) संन्यासयोग ६) अभ्यासयोग ७) ज्ञानविज्ञान योग ८) अक्षर ब्रह्मयोग ९) राजविद्या राजगृहयोग १०) विभूती विस्तारयोग ११) विश्वरूप दर्शनयोग १२) भक्तियोग १३) क्षेत्रक्षेत्रज्ञ योग १४) गुणत्रय विभागयोग १५) पुरुषोत्तमयोग १६) दैवासुर संपद्विभाग योग १७) श्रद्धात्रय विभागयोग व १८) मोक्षसंन्यास योग हे कायम- कमी अधिक न करता योजले आहेत. गीतेमध्ये एकूण ७०० मूळश्लोक आहेत. त्यांचा विस्ताराने व्यापक विश्लेषण करून भाषांतरित श्रीज्ञानेश्वरीमध्ये एकंदर ९,०३१ ओव्यांच्या मदतीने सर्व विषयांकित भावार्थ पटवून दिले आहेत. म्हणून संत नामदेवजी महाराजांनी ‘श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य’ या अभंगातून गौरवोद्गार काढले-

“अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप!
चैतन्याचा दीप उजळिला!!३!!
छपन्न भाषांचा केलासे गौरव!
भवार्णवी नाव उभारिली!!४!!”

तत्कालीन हिंदुसमाजात चातुर्वर्ण्यव्यवस्था रुढ होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यातील ब्राह्मणाने ईश्वरभक्ती करून मोक्ष व मुक्ती संपादन करावी. क्षत्रियांनी राजपाट सांभाळत प्रजेचे संरक्षण करताना लढावे, जिंकावे, करावे वा मरावे. वैश्यांनी व्यापार उद्दिम करून धनसंपत्ती अधिक जमविण्याच्या हव्यासात जीवन खर्ची घालावे. तर शूद्रादिकांनी वरील तिन्ही वर्णातील लोकांचे दास्यत्व- गुलामी करीत जीवन शिणवावे. सर्वांनी वर्ण, आश्रम, जातीपाती, धर्म, लिंग, वंश, कूळ, पंथ वगैरे बंधनात जखडूनच आयुष्य वेचावे. कोणी येथला तेथे शिरकाव करू नये. एखाद्याने कळत नकळत केलाच तर ब्राह्मण, पंडित किंवा सवर्ण समाज त्याला वाळीत टाकून विटाळ मानत. त्याच्याशी कोणीही ‘रोटी-बेटी’ व्यवहार करू शकत नसे. स्वतः श्रीज्ञोबा माउली ब्राम्हणकुळात जन्मूनसुद्धा असल्या आसुरी छळवणुकीचा अनुभव घेत होते. त्यांना श्रीमद्भगवद्गीतेच्या सखोल अभ्यासातून कळले होते की, चातुर्वर्ण्यांच्या भेदभावामुळे मानवजन्माचे अंतिम ध्येय जे मोक्ष-मुक्ती साधन अंगीकारण्यात अनेट अडचणींना तोंड द्यावे लागते. परिणामी माणूस वंचित राहून आपली जीवन यात्रा संपवतो व पुन्हा जन्ममृत्युच्या चक्रीवादळात सांपडतो. म्हणून ब्राह्मणी व पंडिती दुष्टकाव्याला धडा शिकविण्यासाठी तसेच मानवयौनीत जन्मलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या आत्मोन्नती व मोक्षाच्या प्राप्तीसाठी या महान उद्बोधक व दिशादर्शक विश्वग्रंथाची निर्मिती करण्यात आली. आज माझ्यासारख्या शूद्र मानवाच्या हातात ब्रह्मज्ञानाची गुरूकिल्ली पडली. ही केवळ त्या पुण्यशील श्रीज्ञानराज माउलींचीच खरी पुण्याई, हे येथे उल्लेखनीय!

“म्हणोनी कुळ, जाती, वर्ण।
हे आघवेचि गा अकारण।
एथ अर्जुना, माझेपण। सार्थ एक।।
तैसे क्षत्री, वैश्य, स्त्रिया।
का शूद्र, अंत्यजादि इया।
जाती तंवचि वेगळालिया।
जंव न पवती मातें।।”
[पवित्र श्रीज्ञानेश्वरी: अध्याय ९वा: ओवी क्र.४५६ व ४६०].

भक्तीमार्ग, मोक्षसाधन किंवा तात्विक जीवन यांत मानवच काय, पण प्राणी व वनस्पती किंबहुना समग्र चराचर भूतसृष्टी हे एक स्वरूप आहेत. त्यात भेदाभेदास तिळमात्रही स्थान नाही. ईश्वराची निष्काम भक्ती करून आपण सर्व मानवजात एकेक करून त्या अनंताशी तादात्म्य कसे काय पावू शकत नाही? यासाठीच संतशिरोमणी श्रीज्ञानेश्वरांनी नऊही रसांचा परिपाक चढवून गुप्त-ब्रह्मज्ञान तथा मानवाचे आद्य-परम कर्तव्य जगासमोर मांडले. नुसत्या जप, तपा, व्रत, योग, याग, विधी, मंत्रौच्चार, पूजा, पाठ, मंत्र, तंत्र, जारण, मारण, तारण, जादूटोणा, अनिष्टप्रथा, आदी कर्मकांडी उद्योगातून मोक्ष-मुक्तिप्राती होऊ शकत नाही. तीर्थयात्री, तीर्थस्नान व तीर्थसेवण केल्याने अंतःकरणातील घाण, मळ वा रोग दूर कसे पळतील? हे झाले फक्त वरपांगी, वरवरचे किंवा दिखाऊ पावित्र्य! भगवंत, भक्ती व भक्त या विषयी पटवून देतांना आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा गोष्ठी माउलींनी अन्यत्रही सांगितल्या आहेत. श्रीज्ञानेश्वरी हरिपाठ-

“योग याग विधी, येणे नोहे सिद्धी।
वायाचि उपाधी, दंभ धर्म।।”

परमपद वा मोक्षाप्रती पोचण्याचा खरा मार्ग म्हणून भक्तिमार्गाचा उल्लेख करतात. हा मार्ग सुलभ, सोपा व सर्व स्त्री-पुरुषांस सहज आचरता येण्याजोगा आणि धर्म, जाती, वर्णादि भेद आड येऊ न देणारा आहे. गीतेत याच मार्गाचा उदोउदो केला आहे. परमपिता, परमात्मा, निर्गुण व निरंकार हाच सर्व साकार अवतारातून जनकल्याण साधत असतो. देव-प्रभू-निरंकार हा एकमेवाद्वितीय आहे. हे जाण्याखेरीज खऱ्या ईश्वरभक्तीस सुरूवात होईलच कशी? निर्गुण देवस्वरुप हे वरील सर्व विवेचनांच्या पार पलीकडील असते. ते स्वरूप फक्त ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशानेच चमकते, देदीप्यमान होत असते. म्हणूनच या एकमेवाद्वितीय ग्रंथराजाचे वाचन-मनन-मंथन प्रत्येकाने आवर्जून केले पाहिजे. ज्ञानपूर्व व ज्ञानोत्तर वाचन यांत जमीन-आसमानचा फरक जाणवेल, यात शंकाच नाही. धर्मग्रंथ, शास्त्र व पुराण हे फक्त देवघरात श्रद्धेने पुजून त्याचे सणासुदीला पारायणेच करण्यासाठी नसतात; तर त्यांत सांगितल्याप्रमाणे आपल्यात योग्य वर्तनबदल व्हावे.

“आतां विश्वात्मके देवें।
येणें वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनि मज द्यावें।
पसायदान हें।।…”
[पवित्र श्रीज्ञानेश्वरी: अध्याय १८वा: ओवी क्र.१७९३].

एकेश्वरवादानुसार ग्रंथकाराने विश्वात्मक भगवंताकडे “आपल्या ग्रंथशैलीवर प्रसन्न होऊन विश्वातील सर्व चराचरांच्या कल्याणार्थ वरदान दे!” असे वरील पसायदान हे शेवटच्या अठराव्या अध्यायात ओवी क्र.१७९३ ते १८०१ या नऊ ओव्यांच्या माध्यमातून मागितले आहे… जय ज्ञानेश्वर, जय ज्ञानेश्वरी!
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त समस्त ग्रंथप्रेमी बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

✒️संतचरणरज -‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.
(भारतीय संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक तथा साहित्यिक.)द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास,
मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.मोबा- ७७७५०४१०८६.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com