आदर्श शिक्षक, परखड पत्रकाराच्या जाण्याने शिक्षक संघटना पोरकी : प्रा. बी. एन. चौधरी

24

🔹पी.आर.हायस्कूलमध्ये स्व.शरदकुमार बन्सी यांना सहकाऱ्यांची भावपूर्ण श्रद्धांजली 

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.27सप्टेंबर):-आदर्श शिक्षक, परखड पत्रकार आणि माणूसपण जपणारा सामाजिक कार्यकर्ता याचा त्रिवेणी संगम म्हणजे स्व. शरदकुमार बन्सी होते. कोरोनाने एक अजात शत्रूला आपल्यातून हिरावून नेले आहे. त्याच्या जाण्याने शिक्षक संघटना पोरकी झाली अशा भावना माजी मुख्याध्यापक तथा साहित्यिक, पत्रकार प्रा. बी. एन. चौधरी यांनी पी. आर. हायस्कूल मध्ये स्व. शरदकुमार बन्सी यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रध्दांजली सभेत व्यक्त केली.गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांचा शरद हा आधार स्तंभ होता. त्याने जाती, धर्मापलीकडे मैत्रीचं जाळं विणलं होतं.अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे होते.

सर्व प्रथम स्व. शरदकुमार बन्सी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साऱ्यांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली. एक वर्षांपूर्वी आपल्यात हाडामासाने वावरणाऱ्या, आपल्याच सहकाऱ्याला अशी श्रध्दांजली देतांना प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी चिंब आणि चेहऱ्यावर एक हताश आगतिकता पसरली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पवार यांनी केले. त्यात त्यांनी स्व. शरदबन्सींच्या कार्याचा वेध घेतला.एनसीसी मेजर डी.एस. पाटील यांनी स्व. शरद बन्सी यांच्या शिक्षक संघटनेतील भरीव योगदानाची माहिती देत, त्यांच्या निधनाने शिक्षकांचा हितचिंतक हरपला अश्या शब्दात श्रध्दांजली वाहिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी पी. आर. हायस्कूलचा एक खांब निखळून पडला या शब्दात शरदकुमार बन्सी यांच्या जाण्याची मनातील बोच उलगडून दाखवली. शरद म्हणजे आमच्या शाळेचा हुकमाचा एक्का होता असं ते म्हणाले. या प्रसंगी स्व. शरद बन्सी यांचे मोठेबंधू ईश्वर बन्सी आणि त्यांचा पुतण्या मनोहर बन्सी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक एस.के.बेलदार यांनी तर आभार प्रदर्शन जी.आर. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाला पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या महाविलयीन, माध्यमिक, प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्रध्दांजली प्रसंगी अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. त्यांना आपल्या अश्रूंवर ताबा ठेवणं कठीण जात होते.